आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकचा गोळीबार चालूच
येथील आंतरराष्ट्रीय सिमेवर पाकिस्तानी लष्कराच्या रेंजर्सचा बेधूंद गोळीबार चालूच आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने तात्काळ गोळीबार थांबवावा, तो दोन्ही बाजूंच्या नागरी वस्त्यांना धोकादायक ठरू शकतो, असे काल भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी रेंजर्सना कळवले आहे. गेल्या चार दिवसांत ९ वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
परवा रात्री जम्मूच्या अर्निया सेक्टर येथे तिन्हीसांजेला पाकिस्तानच्या बाजूने भारताच्या चार चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा पहाटे ३ वा. गोळीबार व रॉकेटचा मारा सुरू झाला. तेव्हा भारतानेही चोख प्रत्यूत्तर दिले. लष्करी अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात भारतीय हद्दीत असलेल्या गावातील दोघे जखमी झाले तर रॉकेटच्या मार्यात दोन बैल मृत्युमुखी पडले.
परवा पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात एक १६ वर्षीय मुलगी ठार झाली होती तर ३० घरांचे नुकसान झाले होते.
महिनाभर शांततेनंतर २ ऑक्टोबरपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार चालू केला आहे.