पूर्ण दर्जाच्या केंद्रासाठी प्रयत्न : श्रीपाद
कालपासून पणजी दूरदर्शनवरील कोकणी / मराठी कार्यक्रमाची वेळ दीड तासांवरून वाढवून ती तीन तासांवर आणली आहे. दरम्यान, तीन तासही पुरेसे नसून आणखी वेळ वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
वाढीव वेळेच्या शुभारंभप्रसंगी कार्यक्रमास केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. दूरदर्शन जनतेचे हित नजरेसमोर ठेवून चांगले कार्यक्रम प्रक्षेपित करते. चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत, असेही पर्रीकर यांनी सांगितले. पणजी दूरदर्शन केंद्राला पूर्ण स्वरुपाचा दर्जा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
दीड तासाचा कार्यक्रम तीन तासांवर आणण्यासाठी दूरदर्शन केंद्रावरील कर्मचारी वर्गानेही बरेच परिश्रम घेतल्याचे नाईक म्हणाले. वरील निर्णयामुळे गोमंतकीय जनतेलाही समाधान होईल व स्थानिक कलाकारांनाही वाव मिळेल, असे नाईक म्हणाले.