आज हजारो हातांद्वारे ‘स्वच्छ भारत’चा शुभारंभ

0
88

गांधी जयंतीनिमित्त आज देशभरात जी ‘स्वच्छ भारत’ ही साफसफाई करण्याची जी मोहीम हाती घेण्यात येणार आहे त्याचाच भाग असलेल्या ‘स्वच्छ भारत नितळ गोंय’ या मोहिमेत आज राज्यभरातील हजारो सरकारी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, बिगर सरकारी संघटना व स्वच्छता प्रेमी सहभागी होणार असून राज्यात प्रथमच अशी व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे.
राज्यातील ५८ हजार सरकारी कर्मचार्‍यांना सकाळी ९ ते ११.३० या दरम्यान आपापली कार्यालये व आसपासचा परिसर स्वच्छ करण्याची सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेली असली तरी या साफसफाई मोहिमेची सक्ती करण्यात आलेली नसल्याने या ५८ हजार सरकारी कर्मचार्‍यांपैकी नेमके किती कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील हे सांगता येणार नसल्याचे सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जॉन नाझारेथ यांनी सांगितले.
मात्र, स्वच्छता मोहिमेसारख्या समाज कार्यात जास्तीत जास्त सरकारी कर्मचारी सहभागी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून जास्तीत जास्त सरकारी कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील अशी संघटनेला आशा असल्याने संघटनेने कर्मचार्‍यांना त्या संदर्भात वेगळे आवाहन केले नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांमध्ये व विशेष करून प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता मोहिमेविषयी कमालीची उत्सुकता दिसून येत होती. शाळा व शाळेच्या परिसराची साफसफाई करण्याबरोबरच काही शाळांनी लोकांनी अत्यंत घाणेरडे करून टाकलेले काही परिसरही स्वच्छ करण्याची योजना आखली असल्याचे दिसून आले. काही बिगर सरकारी संघटनानीही या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पणजी महापालिकेचे कर्मचारीही आज आपले कार्यालय व परिसराची साफसफाई करण्याचे काम हाती घेणार आहेत.
म्हापसा नाल्याची साफसफाई
पणजीतील सांतइनेज नाल्याच्या साफसफाईचे काम मंगळवारी हाती घेतलेल्या जलसंसाधन खात्याने काल म्हपासा शहरातील नाल्याच्या साफसाफईचे काम हाती घेतले.
मोदी दिल्लीत करणार शुभारंभ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा दिल्लीत शुभारंभ करतील. येत्या पाच वर्षांच्या काळात भारत स्वच्छ करण्याचे मोहिमेचे लक्ष्य आहे. मोदी स्वत: इंडिया गेट येथे झाडूने कचरा साफ करून मोहिमेचे प्रतीकात्मक उद्घाटन करतील. शिवाय ते ‘स्वच्छता शपथ’ही देणार आहेत. दरम्यान, मोदी आज गांधी स्मृतिस्थळास तसेच दलित वस्तीत भेट देणार आहेत.