‘अल्कॉन ग्रुप’च्या वटवृक्षाचे मूळ सदाशिव नायक-खंवटे

0
197

शब्दांकनसौ. नंदिनी रेगे

उद्योगपतींची आपल्याकडे वाण नाही. पण समाजाभिमुख उद्योगपती अगदीच विरळा! अशा इन्यागिन्या विरळ्यांमध्ये अग्रेसर असणारं एक उमदं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अनिल खंवटे! आपल्या अनेक उद्योगधंद्यांबरोबरच शिक्षण, समाजकार्य, संस्कृती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग झेप घेणारं एक आगळं रसायन! आपल्या अल्कॉनउद्योगसमूहाचं जाळं विणून त्यांनी गोव्याच्या औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी तर बजावलीच आहे; पण आपल्यासोबत गोव्याचंही नाव अल्कॉनच्या उत्पादनांद्वारे जागतिक औद्योगिक स्तरापर्यंत उंचावलेलं आहे. स्वतःच्या कुटुंबासोबत, आज हजारो कुटुंबांचा पोशिंदा बनण्याची फार मोठी समाजसेवा त्यांच्या हातून घडते आहे. संपूर्ण गोव्यालाच नव्हे तर भारतालाही अभिमान वाटावा असं सामान्यातून घडलेलं हे असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री. अनिल खंवटे! आता हे असामान्यत्व काही एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी असतात वर्षानुवर्षांचे कष्ट! परिस्थितीवर मात करण्याची जिद्द! त्या जिद्दीला अखंड परिश्रम, चिकाटी, प्रामाणिक वृत्तीची जोड द्यावी लागते. दूरदृष्टी आणि कल्पकता, नावीन्याची ओढ तर हवीच हवी! चारचौघांत मिळूनमिसळून राहण्याची आवड आणि त्यांना आपल्याबरोबर ठेवण्याची ताकद असावी लागते. आपण आपल्या कुटुंबाचं, समाजाचं काही देणं लागतो याची जाण असावी लागते. हे गुण मुळातच अंगी असावे लागतात. आडात असलं की पोहर्‍यात आपोआपच येतं. कै. सदाशिव धर्मा खंवटे हे अनिल खंवटेंचे वडील. त्यांच्या अंगी असलेल्या या सद्गुणांचा पुरेपूर वारसा सुदैवी अनिलजींना मिळाला हे त्यांचं मोठंच भाग्य! त्यांच्या वडिलांचंकै. सदाशिव धर्मा नायक खंवटे यांचंहे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या जीवनचरित्रातच आपल्याला अनिल खंवटेंच्या कर्तव्याची मुळं सापडतात.

३१ जुलै १९११ साली प्रियोळ येथे सदाशिव धर्मा नायक खंवटे यांचा जन्म झाला. वडील धर्मा ऊर्फ नंदा हे कुळागरांची देखभाल करायचे. परिस्थिती तशी बेताचीच होती. पण ते सुशिक्षित होते. कोर्टकचेरीच्या कामात वाक्‌बगार होते. लोकांच्या उपयोगी पडायची वृत्ती होती. त्यामुळे सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी लोक त्यांच्याकडे यायचे. पोर्तुगीज राजवटीतल्या त्या काळात लोकांना त्यांचा खूप मोठा आधार वाटायचा. वृत्ती धार्मिक होती आणि सामाजिक कार्याची खूप आवड होती. ते समाजात मिळूनमिसळून राहत असत. त्यामुळे त्यांना गावात चांगला मान होता.

वयाच्या सहाव्या वर्षीच सदाशिव धर्मा खंवटे यांची आई हे जग सोडून गेली आणि आईच्या मायेविना मोठं होण्याचं दुःख त्यांच्या नशिबी आलं. मळापणजी येथील श्री सरस्वती विद्यालयातून त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. थोडंफार पोर्तुगीज शिक्षणही झालं. त्यावेळी लवकर लग्न उरकण्याची प्रथा होती. त्यामुळे १९३० साली म्हणजे वयाच्या २० व्या वर्षीच त्यांना बोहल्यावर चढवण्यात आलं आणि म्हापशाच्या सुप्रसिद्ध कलाकार सावकार घराण्यातल्या कु. चंपा अनंत सावकार (वसंत सावकारांच्या भगिनी) सौ. इंदिरा सदाशिव खंवटे बनून त्यांच्या संसारात प्रवेशल्या.

ठेविले अनंते तैसेचि राहावे…’ अशा वृत्तीचा समाज अवतीभवती पसरलेला होता. पण सदाशिव खूप महत्त्वाकांक्षी होते. ‘चित्ती असो द्यावे समाधानवगैरे ऐकायला ठीक असलं तरी बेताच्या परिस्थितीत, प्रियोळसारख्या ठिकाणी राहून आणि कुळागरं सांभाळून वाढत्या संसाराचा बोजा सांभाळणे कठीण आहे हे लक्षात यायला त्यांना फारसा वेळ लागला नाही. जिद्दी स्वभावाने परिस्थितीशी झगडून वर यायचंच असा त्यांनी ठाम निश्‍चय केला. आजूबाजूला नजर टाकली. एखाद दुसरं भुसारी दुकान होतं. तीच वाट धरता आली असती, पण त्यांना मळलेल्या वाटेनं जायचं नव्हतंच. त्याकाळी घरोघर बायकाच कपडे शिवायच्या. बहुतेकांकडे सिंगर शिवण मशीन असायचं. पण त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नसत. त्यांनी या सुट्या भागांचं दुकान प्रियोळला उघडलं. हे सुटे भाग ते त्याकाळी परदेशातून आयात करायचे. दुकानात बसून भागायचं नाही हे लक्षात आल्यावर हे सुटे भाग घेऊन सायकलवरून त्यांनी प्रियोळ ते पणजी अशा वार्‍या करायला सुरुवात केली. एक आणि दोन नव्हे तर तब्बल सात वर्षे ही वणवण सुरू होती. पण या अफाट कष्टी जीवनातदेखील त्यांची सजग निरीक्षणशक्ती बघून थक्क व्हायला होते. सुटे भाग पोचवण्याच्या निमित्ताने अनेक ख्रिश्‍चन घरांतून त्याचं जाणंयेणं व्हायचं. त्यांच्या नजरेनं टिपलं की इथं सौंदर्यप्रसाधानांचा नियमित वापर होतोतर ती पुरवण्याचा जोडव्यवसाय आपण का करू नये? त्या समाजाकडे चांगले घरोब्याचे संबंध प्रस्थापित करून आपल्या चालू असलेल्या व्यवसायाबरोबरच हाही नवा व्यवसाय त्यांनी सुरू केला.

१९३८ साली त्यांनी आपलं बिर्‍हाड आल्तिनोपणजीला हलवलं आणि पणजीच्या क्लब नॅशनलखाली स्वतःचं दुकान थाटलं. धंद्यात जम बसू लागला होता, पण प्रकृतीला पणजीची खारी हवा मानवेना. दम्यानं उचल खाल्ली. १९४० साली म्हणजे वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सगळं सोडून पुन्हा प्रियोळ गाठावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही. पुरेशी विश्रांती घेतली. प्रकृती ताळ्यावर येताच १९४२ साली पुन्हा नव्या जोमाने झरीकडे पणजी येथे बिर्‍हाड थाटले. पुनश्‍च हरी ओम्! पण धंद्यात पुन्हा जम बसवला आणि १९५४ मध्ये सध्या जिथं सालसेत फार्मसी आहे, तिच्याजवळ नव्यानं दुकानाचा शुभारंभ केला. सौंदर्यप्रसाधनांबरोबर पॅरोमॅक्स शिलाई मशिनांची आयात करून विक्री सुरू केली. काळाची पावलं ओळखून त्याबरोबर चालण्याची धमक आणि हुशारी दाखवली. नेमका हाच गुण अनिल खंवटेंकडे आहे. रुळलेल्या वाटेनंच जाण्याऐवजी परिस्थितीनुसार वेगळ्या वाटा धुंडाळायच्या, आव्हानात्मक गोष्टी स्वीकारायची लवचिकता त्यांच्याकडे आहे. .सी.सी.च्या सहकार्यानं गोव्यातली पहिली सिमेंट फॅक्टरी सुरू करण्याचा मान फक्त अनिलजींकडे जातो.

१९५४ ते १९५७ या काळात सदाशिव खंवटे धंद्यात थोडे स्थिरस्थावर झाले. त्याचवेळी म्हणजे १९५२ साली त्यांचा मोठा मुलगा जयराम मॅट्रिक पास झाला. पुढे शिकायची खूप इच्छा होती, पण धाकटी भावंडेही शिकत होती. धंदा वाढवायचा तर सदाशिवरावांना कुणाचा तरी आधार हवा होता. मग जयरामांनी मोठा मुलगा या नात्यानं ती जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली. मोठ्या मनानं आणि घट्ट काळजानं आपलं शिक्षण थांबवलं. पण आपल्या धाकट्या भावंडांना पुढं जाऊ दिलं आणि आपलं सगळं लक्ष वडिलांच्या धंद्यात घातलं. ‘कोंटोही परदेशी मशीन आयात केली. त्यांच्या विक्रीद्वारे धंद्याचा विस्तार केला.

मध्यमवर्गीयांना उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही यावर सदाशिवरावांचा ठाम विश्‍वास. त्यातून जर ते शिक्षण स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात घेता आलं तर सेने पे सुहागा ठरतं, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यांच्यामागे जयरामांनी आपली स्वतः पुढे शिकायची अपुरी राहिलेली इच्छा आपल्या धाकट्या भावंडांना शिकवून पूर्ण केली. कुणाच्याही शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही.

अनिल (सिव्हिल इंजिनिअर), प्रकाश (मेकॅनिकल इंजिनिअर), उदय (फार्मसीमध्ये पदव्युत्तर) आणि दिनेश (डॉक्टरनाक, कान, घसा तज्ज्ञ) अशा तर्‍हेने प्रत्येकाच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांची शिक्षणं पूर्ण करण्याचं श्रेय श्री. (कै.) जयरामांनाच जातं. या कामात त्यांच्या पत्नी मीलन यांनी त्यांना पूर्ण साथ दिली. त्यांच्याबरोबरीनं घरची आघाडी जयरामांची धाकटी बहीण ललिता हिनं वयाच्या १४ व्या वर्षापासून सांभाळली आणि आईच्या मायेनं धाकट्या भावंडांच्या खस्ता खाल्ल्या. या कामात त्यांना धाकटी बहीण शरदचीही मदत झाली. जयरामांनी सगळ्यांची लग्नं, संसार वेळच्यावेळी मार्गी लावून दिले. आज त्यांच्या पाठच्या बहिणी ललिता दामोदर कामत, शरद सुर्लकर, सुलभा नायक आपापल्या संसारात स्थिरस्थावर झालेल्या आहेत. आज श्री. अनिल खंवटेही घराण्यातला शैक्षणिक वसा पुढे चालवताना आपल्याला दिसतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच गोव्यातील युवकांनाही आधुनिक शिक्षणाच्या सर्व सोयी येथे गोव्यातच उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनिलजींनी फार मोठे योगदान दिलेले आहे. वयाच्या २६ व्या वर्षापासून ते पणजीतील मुष्टिफंडसारख्या नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत कार्यरत आहेत.

अनिलजींनी खंवटे घराण्याला फक्त गोव्याच्याच नव्हे तर जागतिक औद्योगिक क्षेत्रातही चांगलं नाव, प्रतिष्ठा मिळवून देऊन वडिलांचे आणि थोरल्या भावाचे पांग फेडले आहेत.

सदाशिव खंवटे यांचा ५ फेब्रुवारी १९८० साली मृत्यू झाला. त्यावेळी ते ६९ वर्षांचे होते.

एक आदर्श नागरिक म्हणून त्यांनी समाजात स्थान मिळवलं. ते निर्व्यसनी होते. त्यांची परोपकारी वृत्ती, प्रामाणिकपणा, आधुनिक विचारसरणी हे गुण समाजासाठी नेहमीच दिशादर्शक ठरतील. धंद्याबरोबरच कुटुंबावरील सुसंस्कारात त्यांनी कुठेही कुचराई केली नाही. घरात साहित्यिक कलाकारांची नेहमी येजा असायची. कुटुंबातला एकोपा टिकून राहावा यासाठी ते नेहमीच दक्ष राहिले. घरातल्या प्रत्येक लहानथोरांना त्यांनी आदरानं वागवलं. अभिजात संगीत, नाटक या कलांची त्यांना आवड होती. १९५० ते १९६१ या काळात पणजीतल्या महालक्ष्मीच्या देवळाजवळ त्यांचं वास्तव्य होतं. येथे चैत्रपौर्णिमेकर समाजाची नाटकं व्हायची. त्या उत्सवात ते नेहमीच उत्साहाने सहभागी व्हायचे. त्याकाळी दिवाळीला नरकासुराच्या रात्री ताशा वाजवायची पद्धत होती, तर ते स्वतः आवडीने ताशा वाजवायचे.

संसाराच्या ओढाताणीत पैशाअडक्याची विवंचना असायची. पण ती त्यांच्या दानतीच्या आड कधी आली नाही. आपल्यापेक्षा गरजू लोक खूप आहेत आणि झेपेल तेवढी मदत त्यांना करणे हा माझा धर्म आहे, याचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. या सगळ्या वाटचालीत पत्नी इंदिराबाईंनी आपल्या समाधानी, समजूतदार आणि सोशिक वृत्तीने नेटका प्रपंच केला.

या सगळ्या गुणांना आपल्यात पुरेपूर समावून घेत आज उद्योगपती अनिल खंवटे यांनी स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. अखंड काम आणि प्रामाणिकपणा, सचोटी आणि माणसं जोडण्याची वृत्ती, दानत आणि परोपकार हे गुण वडिलोपार्जित संपत्तीच्या रूपाने त्यांना मिळालेले आहेत. जीवनात यशस्वी आणि सुखी होण्यासाठी ही संपत्ती त्यांनी जीवापाड जपली आणि जोपासली आहे. साधा, नम्र स्वभाव ढळू दिला नाही. म्हणूनच समाजातल्या सर्व थरांत आज ते लोकप्रिय आहेत. सर्व प्रकारचं ऐश्‍वर्य त्यांच्यापाशी आहे. पण त्याचा मोठेपणा मिरवण्याची सवय त्यांनी आजतागायत स्वतःला जडू दिलेली नाही. वाडवडिलांकडून मिळालेले सुसंस्कार जपायचे आणि त्यात भर घालून पुढच्या पिढीकडे ते सोपवायचे यासाठी लागणारं नैतिक बळ त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडेही आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे पावलोपावली भेटत असताना आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहणार्‍या या खंवटे घराण्याबद्दल म्हणूनच लोकांना आदरयुक्त प्रेम आहे, आपलेपणा आहे; ज्यांचं मोल कधीही करता येणार नाही.