शिवसेना-भाजप यांची युती संपुष्टात आल्याच्या घोषणेपाठोपाठ कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचीही १५ वर्षांची युती तुटल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले असून सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती तुटण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप केला. या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला कधीच दुर्लक्षित केले नाही असे पवार म्हणाले.
भाजप-शिवसेनेप्रमाणेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीचीही गत झाली होते. आगामी विधानसभा जागा वाटपात हे दोन्ही पक्ष गुरफटत गेले. बुधवारी रात्री कॉंग्रेसने आपल्या ११८ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उभयतांची युती तुटण्याबाबत चर्चेला जोर आला होता. ही उमेदवार यादी जाहीर करण्याची युती हा आपल्याला मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली.
‘बुधवारी कॉंग्रेसने उमेदवारी यादी जाहीर केली. आम्ही ज्या जागांबाबत त्यांच्याशी चर्चा करत होतो त्या जागांचे उमेदवारही त्यांनी जाहीर केले’ अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीने आपल्या युतीबाबतच्या चर्चेदरम्यान युती सत्तेवर आल्यास मुख्यमंत्रीपद आळीपाळीने बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र हा मुद्दा योग्य नसल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे होते. त्याऐवजी कॉंग्रेसने राष्ट्रवादीला १२४ जागा देऊ केल्या होत्या. परंतु राष्ट्रवादीने तो प्रस्ताव नाकारला.