‘गडकरी आणि आम्ही’ परिसंवाद रंगला

0
119
माधव गडकरींच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना परेश प्रभू. सोबत श्रीराम पचिंद्रे, सचिन परब, संजय ढवळीकर, राजू नायक व प्रभाकर ढगे. (छाया : किशोर नाईक)

माधव गडकरींच्या जयंतीनिमित्त आयोजन
पत्रकार माधवराव गडकरी यांच्या जयंतीनिमित्ताने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी आम्ही हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात दै. हेराल्डचे संपादक संजय ढवळीकर, दै. गोवादूतचे संपादक सचिन परब, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, दै. पुढारीचे गोवा प्रमुख प्रभाकर ढगे, दै. गोमंतकचे संपादक श्रीराम पचिंद्रे तसेच दै. लोकमतेच राजू नायक हे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना श्री. ढवळीकर म्हणाले की, वर्तमानपत्र हे अन्यायाविरोधात चीड व्यक्त करणारे माध्यम आहे मात्र ते आज कुणीतरी कंट्रोल करत आहे. त्यामुळे चौकटीच राहून काम करावे लागते. गडकरींच्या चौफेर या सदराचा उल्लेख करून श्री. ढवळीकर म्हणाले की, त्यावेळी पत्रकारांमागे समाजाचे बळ असायचे, व्यवस्थापनाचा पाठिंबा असायचा.
श्री. प्रभू म्हणाले की, गोव्यात मराठी पत्रकारितेची परंपरा १४४ वर्षे जुनी आहे. गडकरी यांनी अनेक माणसे घडवली. वाढवली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जिव्हाळा होता. वर्तमानपत्र हे शक्तीकेंद्र असले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांची शैली साधी, सोपी पण वज्रघाती होती. असा हा गोमंतक हे त्यांचे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
श्री. परब म्हणाले की, गडकरींच्या रुपात आमच्यापुढे दीपस्तंभ पत्रकारितेच्या क्षेत्रात दिसतो. त्यांनी गोव्यात पत्रकारितेचा पाया रचला. त्यांनी घालून दिलेल्या वाटेनेच पत्रकाराला पुढे जावे लागेल. संपादकाच्या पलीकडे एक कार्यकर्ता ज्या व्यक्तीत दडलेला असतो तोच गडकरींसारखे कार्य करू शकतो.
श्री. ढगे यांनी, गडकरी या जाज्ज्वल्य पत्रकाराने महाराष्ट्र आणि गोवा यांचा पूल सांधला. पत्रकारितेच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. पत्रकारितेची कारकीर्द कशी प्रेरणादायी ठरू शकते याचे उदाहरण म्हणजे गडकरी होय असे सांगितले.
राजू नायक यांनी, कुठल्याही क्षेत्रात भूमिका घेऊन उभे रहावे लागते याची जाणीव देऊन गडकरींनी कार्य केले. त्यांच्यात उत्साह, तळमळ आणि माणुसकी होती. मला १९८५ ते ९१पर्यंत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी सामाजिक परिषद, समांतर साहित्य संमेलन सुरू केले. अनेक प्रश्‍नांवर ते लढले. त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली, असे सांगितले.
या परिसंवादाचा समारोप करताना श्री. पचिंद्रे म्हणाले की, आज आपल्या हाती असलेल्या माध्यमाचा चांगल्याप्रकारे उपयोग केला तर कोणीही बंधन घालू शकणार नाही. गडकरींनी हे करून दाखवले. त्यांनी लेखणीद्वारे परिवर्तन घडविले आहे. सद्गुण जोडण्याचे व दुगुर्णवार प्रहार करण्याचे काम त्यांनी केले. सिंहाच्या वाट्यापेक्षा खारीचा वाटा महत्त्वाचा असतो असे त्यांनी स्पष्ट केले. समारोपाच्यावेळी हिंदू असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नायक यांच्या हस्ते सुरेश द्वादशीवार यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गडकरींचे जावई प्रसाद प्रधान व चंद्रशेखर काळे उपस्तित होते. संजय हरमलकर यांनी स्वागत केले. नितीन कोरगावकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, माजी खासदार अमृत कासार, माजी उपसभापती शंभू बांदेकर, ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे, समीक्षक एस. एस. नाडकर्णी, कला अकादमीचे माजी सदस्य सचिव पांडुरंग फळदेसाई उपस्थित होते.