– सौ. संगीता प्र. वझे, बोरी, फोंडा
महालय संपून नवरात्रोत्सव सुरू होईल. सगळीकडे या उत्सवाची पूर्वतयारी चालू आहे. चतुर्थीनंतर म्हाळ/श्राद्धविधी करून नवरात्रीची धामधूम, देवस्थानांची साफ-सफाई, मखरे तयार करण्याचे काम चालू आहे. नवरात्रात दुर्गेची नऊ रूपे वेगवेगळ्या पद्धतीने सजविली जातात. काही घरांत दसर्यापर्यंत रोज गोडधोड जेवण असतं. अशा वेळी धार्मिक कार्यक्रम, सप्तशती पाठ, नवचंडी करून घेतल्या जातात. दसर्यापर्यंत सगळीकडे अतिशय उत्साही वातावरण असते. जो तो आपल्याला जसे शक्य होईल तशी जगदंबेची सेवा करतो. मखरात बसलेल्या देवीला हिंदोळे घेताना पाहणे म्हणजे स्वर्ग-सुखाचा अनुभव! त्या क्षणी ती महामाया जगदंबा पृथ्वीवर प्रकटल्याचा भास होतो. पहाटेचा नौकाविहार पाहायलाही तेवढीच गर्दी जमते. एरवी सुशेगाद म्हणवणारा प्रत्येक गोंयकार मात्र यावेळीच नव्हे तर प्रत्येक सणावारात आळस झटकून उमेदीने वावरताना दिसतो. रोज देवळात संध्याकाळी असणार्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते.
नवरात्रोत्सव हा देवीचा, जगदंबेचा उत्सव आहे. नऊही दिवस जगदंबेची काही शांत तर काही उग्र रूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक स्वरूप निर्माण होण्यामागे विशिष्ट हेतू आहे. नवदुर्गेचे प्रत्येक रूप काही तरी संदेश देणारे आहे. जगदंबा हीच सर्व जगाची जननी असून सर्व देवदेवता तिच्यातूनच अस्तित्वाला आले असे आपण मानतो. हीच जगदंबा कधी विष्णूची लक्ष्मी, कधी शंकराची पार्वती तर कधी ब्रह्मदेवाची सरस्वती! म्हणजे प्रत्येक रूपात तीच शक्ती वावरत असते. पण आपलं सामान्य ज्ञान इथेच संपतं, कारण आपल्याला वाटतं की देवी फक्त देवळातल्या किंवा घरातल्या मूर्तीतच असते. पण हे सत्य नव्हे आणि सुज्ञ आणि जाणत्यांना सांगावे लागत नाही की देवीचे वर्तमानातील स्वरूप म्हणजे प्रत्येकाच्या घरात अहोरात्र वावरणारी स्त्री! मग ती तुमच्या गृहलक्ष्मीच्या रूपात असो किंवा आई, आजी, ताई, मावशी, काकू, मामी ही सर्व तिचीच रूपे आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की अष्टौप्रहर तिची सेवा करणारे किंवा देवळात नित्य नेमाने जाणारे तिचे भक्त मग ते कुठल्याही जातिधर्माचे किंवा कुठल्याही वयोगटातील असोत, आपल्या बायकोला, म्हातार्या आईला, विवाहित बहिणीला किंवा कुठल्याही स्त्रीला- मग ती घरातील किंवा बाहेरची असो, तिच्यामध्ये तुम्हाला देवी दिसली का? किंवा तिच्यातील स्त्री-शक्तीची तुम्हाला जाणीव होते का? तिच्याशी तुम्ही साध्या माणुसकीने किंवा समानतेने कधी वागता का?
प्रत्यक्षात पाहता देवळातील तुमची कुलदेवी म्हणा किंवा ग्रामदेवी तुमच्याच घरात, तुमच्या आसपास वावरते आहे. खरे तर देवळातील देवी आणि कुठल्याही काळातील स्त्री यात जास्त अंतर नसावे. कारण स्त्री ही नेहमीच शक्तीचं प्रतीक असते, मग ती स्वर्गातील असो अथवा पृथ्वीवरील! प्रत्येक घर हे त्या घरातील स्त्रीचं असतं. त्यातील माणसे ही तिने संस्कारित केलेली, तिने घडवलेली, सांभाळलेली असतात. पूर्वीची स्त्री किंवा आजची सुशिक्षित बाई कुणीही असो, प्रत्येक घरामागे तीच शक्ती उभी आहे. म्हणूनच सर्व जगातील कारभार व्यवस्थित चाललाय. आजची स्त्री तर सर्व शक्तिनिशी आपली नोकरी/व्यवसाय आणि घरच्या जबाबदार्या सहजपणे पेलताना आपण पाहतो. पुरुष मंडळी निर्धास्त होऊन घराबाहेर निघतात, कारण त्यांच्यामागे एक आई किंवा बायको उभी आहे म्हणूनच ना? म्हणूनच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते आणि ते योग्यच आहे. कारण पुरुषाचा जन्मच स्त्रीच्या पोटी आहे आणि त्याला शेवटपर्यंत सांभाळणारीही स्त्रीच असते.
आज आपण बघतोय की, आधुनिक स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात पाऊल ठेवलंय. चूल आणि मूल सांभाळून समस्त जग सांभाळायची ताकद एकट्या स्त्रीमध्येच असते. कुठल्याही प्रसंगात किंवा कर्तव्यपालनात ती नेहमीच सर्व शक्ती पणाला लावून समर्पित होऊन जाते. महादेवाची शक्ती ही पार्वतीमध्ये आहे; विष्णूचे पाय चेपणारी लक्ष्मी आणि चातुर्मासात त्याला गाढ निद्रेत झोपवणारी निद्रादेवी, भगवती महामाया, ब्रह्मदेवाला आपल्या वीणा वादनाने शांत करणारी सरस्वती आणि आपल्या घरातील मुलांना सांभाळणारी, नवर्याची सेवा करणारी, आजी होऊन नातवंडांवर प्रेम करणारी सामान्य स्त्री यांत फरक तो काय?
पण त्या पाषाणी मूर्तीच्या पायावर डोके ठेवणारा पुरुष आपल्या सहचारिणीला समानतेची वागणूक का देत नाही? पाहा ना, देवीप्रमाणेच सामान्य स्त्रीचीही तीन रूपे आहेत. कुमारिका, भार्या आणि वृद्धा. प्रत्येक रूपात ती सर्वांना आनंद आणि सुखच देते. असे असताना तू कुठे तरी कमी पडतेस असं तिला का भासवलं जातंय? पुरुषांना ती भोगाचीच वस्तू दिसते. तिच्यातील सात्त्विक रूप कुठल्याच अहंकारी पुरुषी दृष्टीला का दिसू नये? आजचा प्रत्येक माणूस शिक्षणाने आणि बुद्धीने सर्व स्तरावर प्रगतिपथावर पोचलेला आहे. असे असताना एक उच्चशिक्षित स्त्री आणि गरीब अडाणी स्त्री यांच्या समस्या एकसारख्याच का? माणूस चंद्रावर पोचला तरी स्त्री मात्र काळोख व्हायच्या आधी घरी परतते. एवढं भीतीयुक्त वातावरण का? आज रोज पेपरात आपल्याला खून, बलात्कार, छळ अशा अनेक घटना वाचायला मिळतात. यात मग दोन वर्षांची चिमुरडी असो किंवा सत्तरीतली म्हातारी! कुणीही अपवाद नाही. अंगप्रदर्शन केलेली स्त्री किंवा संपूर्ण अंग झाकलेली असो दृष्टिकोन एकच असतो ना! कधीतरी प्रश्न पडतो की देवाने स्त्रीला फक्त अत्याचार सहन करण्यासाठीच जन्म दिला आहे का? नाहीतर तिने स्वतःबरोबर आपल्या मुलांना घेऊन आत्महत्या केलीच नसती. प्रत्यक्षात स्त्री-शक्तीवर घाला घालणे म्हणजे त्या जगदंबेचाच अपमान करणे नाही का? आणि हे काळच सर्वांना पटवून देईल. दुःखाची गोष्ट अशी की स्त्रियांना छळण्यात फक्त पुरुषच नाही तर बर्याचदा स्त्रियाही काही कमी नाहीत. म्हणजे सासू-सून, नणंद-भावजय अशा भांडणांमध्ये स्त्रीचीच अधोगती आहे आणि दोन स्त्रियांच्या भांडणामागे नेहमीच एक पुरुष असतो.. हेही नसे थोडके!
पण जगात प्रत्येक वाईट गोष्टीला अपवाद असतातच. आजही कित्येक नवरे किंवा पुरुष आपल्या बायकोला आदराने वागवताना आपण पाहतो. पण ही संख्या फक्त हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतपतच! मला प्रत्येक सुज्ञ नागरिकाला नम्र विनंती करावीशी वाटते की त्या पाषाणी मूर्तीवर नाक घासण्यापेक्षा तुमच्या घरात वास्तव्यास असलेल्या जिवंत शक्तीला ओळखा. तिचं कौतुक करा. तिला सुख-प्रेम-वात्सल्य द्या आणि तुमच्या घराचं नंदनवन बनवा. मुळातच स्त्री आणि पुरुष ही एकमेकांना पूरक निर्माण केलेली आहेत. त्यांनी एकमेकांना मानाने वागवून एकजुटीने राहिले तर चांगलं आहे. अन्यथा सगळा विनाश! प्रत्येक स्त्री ही क्षमेचे आणि दयेचे स्वरूप आहे. तुम्ही मारलेली कौतुकाची थाप तिच्यासाठी प्रेरणादायी असते. म्हणूनच तुमच्या भोवताली असणार्या स्त्रियांना माणूस म्हणून वागवा. तिला प्रसन्न करा. अन्यथा कुठल्याही देवतेचे आशीर्वाद तुम्हाला कधीही लाभणार नाहीत. गरज आहे आपली विचारसरणी बदलण्याची. जगातील स्त्री सीता झाली तरच राम जन्माला येईल, जिजामाता झाली तरच शिवबा जन्माला येतील. जगातील प्रत्येक स्त्री जेव्हा समाधानी होईल तेव्हाच जगात शांतता निर्माण होईल. सद्गुरू सांगतात, स्त्री ही शक्ती स्वरूपी आहे पण तुम्ही जसं तिच्याकडे पाहाल तशी ती होईल म्हणजे तुम्हाला वाटलं की तिने फक्त आपल्या देहाचीच तृप्ती करावी तर ती तेवढ्यावरच थांबेल आणि तिला तिच्या शक्तीची जाणीव करून दिलीत तर ती यशाची सर्व क्षेत्रे पादाक्रांत करील. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या स्त्रीला कितीही अपमानाची किंवा कितीही हीन दृष्टी टाकलीत तरी नुकसान तिचं नाही, कारण तिच्यात परमेश्वरी शक्ती आहे. त्यामुळे ते तुमच्याच पतनाचे कारण ठरेल. तुम्ही मान्य करा किंवा न करा! चला तर मग नवरात्रोत्सवाचा खरा अर्थ समजून आपल्या आया-बहिणींसकट प्रत्येक स्त्रीला समानतेची आणि माणुसकीची वागणूक देऊ, अशी त्या नवदुर्गेच्या पायाशी शपथ घेऊया, तिला प्रसन्न करुया!!