स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसाराम बापू यांना जोधपूर येथील कथित बलात्कारप्रकरणी जामीन देण्यास काल सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
आरोग्याच्या कारणावरून आसाराम बापू यांना जामीन देण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे तातडीने जामीन देण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले व जामीन अर्ज फेटाळला. तथापि न्या. टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने असेही नमूद केले की कोणत्याही उपचारासाठी आवश्यकता भासल्यास त्यांना तुरुंगातून एखाद्या इस्पितळात नेण्यास मान्यता दिली जाऊ शकते.
याप्रकरणी पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यावेळी महत्त्वाच्या साक्षीदारांना न्यायालयासमोर उपस्थित करण्याचे निर्देश न्यायालयाने राजस्थान सरकारला दिले. कालच्या सुनावणीवेळी आसाराम यांच्या वकीलांनी पीडितेच्या वयासंदर्भात प्रथम युक्तीवाद करण्यास आपल्याला संधी देण्यात यावी अशी विनंती केली. पीडित अल्पवयीन नसल्याचे कारण त्यांनी यावेळी दिले. मात्र न्यायालयाने ती विनंती नाकारली. पीडित अल्पवयीन आहे की नाही हा मुद्दा नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आरोपीचे वकील सुनावणीत अडथळा आणत असल्याची टिप्पणीही न्यायाधीशांनी केली. जोधपूर येथील आश्रमात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळणुकीप्रकरणी जोधपूरमधील न्यायालयात आसाराम यांच्याविरुद्ध बलात्कार, गुन्हेगारी कटकारस्थान व अन्य आरोपांसह आरोपपत्र दाखल झाले आहे.