आसामातील महापुरात १५ जण मृत्यूमुखी

0
84

गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे आसामात महापुराने हाहाकार माजवला असून या प्रलयात १५ लोकांचे बळी गेले आहेत. हवाई दलाची विमाने, लष्कराचे जवान तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा व राज्य आपत्कालीन यंत्रणा मदत कार्यात युद्ध पातळीवर कार्यरत झाल्या आहेत. या प्रलयाचा सर्वाधिक तडाखा गोलपारा जिल्ह्याला बसला असून तेथे पुराने ५ जणांचे बळी घेतले आहेत. तेथे ५० हजार लोकांवर बेघर होण्याची पाळी ओढवली असल्याची माहिती जिल्हा उपायुक्त प्रीतम सायकिया यांनी दिली. दरम्यान, काल पावसाने किंचित उसंत घेतल्यानंतर पुराने वेढलेल्या दुधतोई, कृष्णाई व बोलबोला या भागांमध्ये अडकून पडलेल्या लोकांना सुखरूप हलविण्यासाठी हवाई दलाची हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली. या लोकांच्या निवार्‍याची सज्जताही ठेवण्यात आल्याचे सायकिया यांनी सांगितले.
गुवाहाटी येथेही दोघेजण मरण पावले असून तेथील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.