महाराष्ट्र जलसंपदा प्रधान सचिवांची माहिती
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्यावतीने उभारण्यात आलेला तिळारी जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाला तरी तिळारी येथील कार्यकारी अभियंता मुख्य कार्यालय कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. तसेच ज्या प्रकल्पग्रस्त कामगारांना कमी करण्यात आले आहे, त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मलिनी शंकर यांनी तिळारी येथे दिली.
यावेळी कार्यकारी अभियंता धीरज साळे कुरणे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी शनिवारी सकाळी १० वाजता तिळारी प्रकल्प येथे प्रकल्प अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकार्यांनी पूर्वकल्पना न देता ३५-४० कामगारांना कमी केल्याकडे लक्ष वेधले असता, कामगारांवर अन्याय होणार नाही, असे सांगितले. सध्या निवडणूक आचार संहिता असल्याचे निवडणुकीनंतर कामगारांच्या प्रश्नांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, प्रकल्प कार्यालयाविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या, प्रकल्प जरी पूर्ण झाला तरी येथील कार्यालय बंद केले जाणार नाही. प्रकल्पांवर काम करणारे कारकून प्रकाश रेडकर यांच्यावर सेवा निवृत्तीबाबत झालेला अन्याय दूर करण्यासाठी व प्रकल्पातील कर्मचारी निवृत्त झाले त्यांना निवृत्ती वेतन देण्याबाबत, अधिकार्यांनी जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रधान सचिवांच्या भेटीबाबत अधिकार्यांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.