म्हापसा पालिका बाजारपेठेतील मासळी मार्केट जवळील ‘सॅमसंग स्मार्टफोन’ नामक मोबाईल दुकानचे पुढील शटर्स वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून आतील वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे ८६ मोबाईल चोरल्याची तक्रार दुकानाचे मालक केवलपुरी गोस्वामी यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे. दुकानाचे मालक केवलपुरी गोस्वामी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की शुक्रवारी रात्री ८.४५ वा. दुकान बंद करून आपण घरी गेलो होतो. नंतर काल सकाळी आपला भाऊ ७.३० वाजता दुकान उघडण्यास आला असता त्याला दुकानाचे पुढील शट्र्स वाकविलेले दिसले. आत पाहिले असता मोबाईल चोरीला गेल्याचे आढळले. दरम्यान, गेल्या आठवड्यात याच रांगेतील एका दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. येथे विजेची सोय नसल्याने अशा चोर्या करण्यास चोरट्यांना संधी मिळत असल्याचे एका व्यापार्याने सांगितले.