जीवनाचं गणित सोडवू

0
265

– रश्मिता राजेंद्र सातोडकर, शासकीय महाविद्यालय, साखळी

 

जन्माला आलोच आहोत,
जगू अखेरच्या श्‍वासापर्यंत
जीवन नावाचं गणित सोडवू
अखेरच्या श्‍वासापर्यंत…

जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधीतरी मरणारच असतो. त्याचे मरण आयुर्मान पूर्ण होऊन झालेले असेल किंवा नैसर्गिकरित्या किंवा त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल तर. पण जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करून स्वत:चे जीवन संपवते तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील जीव नावाचे गणित मात्र सोडवता आलेले नसते.
असं म्हणतात की माणूस आपले नशीब जन्मत:च घेऊन येतो. पण असे असते का? तसे असते तर आपण आपले जीवन रंगीबेरंगी रंगांनी भरले असते. जीवन जगत असताना कोठेतरी काटेे टोचणारच. पण ते लागणार म्हणून आपण चालायचे थांबायचे का? जीवनात दु:ख हे हवंच; कारण नेहमी जर आपल्या जीवनात सुख नांदू लागले तर संघर्ष, चिकाटी, जिद्द, आत्मविश्‍वास, हे सगळे शब्द कुठेतरी आपल्या आयुष्यात हरवून जातील. आज आपण २१ व्या शतकात पदार्पण केले आहे. व्हॉट्‌सअप, फेसबुक, हाईक मेसेंजरचे जीवन आल्या कारणाने प्रत्येकजण प्रत्यक्षात संवाद साधण्यापासून दूर जात आहेत. म्हणूनच आत्महत्येसारखे प्रकार वाढत चाललेले दिसत आहेत.
आज सर्वसामान्यांपासून ते लखपती सारख्या लोकांच्या आत्महत्येतील संख्येत वाढ झालेली दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिन्याकाठी लाखो रुपये जरी घरात येत असले तरी त्या लोकांना जीवन कसे जगायचे हे कळलेलेच नसते. अशा लोकांना जीवन जगायला लावणार्‍या शाळांची अत्यंत गरज आहे. ऐशोआराम जीवन जगणारे लोकही काहीवेळा आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतात. याचे मुख्य कारण म्हणजे ती आपल्या जीवनात अपूर्ण असतात. त्यांना संकट किंवा अपयश कसे पचवावे हेच मुळात बहुतेकदा कळत नसावे.
अपयश, निराशा, बेकारी पदरी आल्यामुळे माणूस आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. खरं तर अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. अपयशाने खचून न जाता आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देणे गरजेचे असते. आपल्या आयुष्यात फक्त एकच धागा सुखाचा असतो आणि शंभर धागे दु:खाचे एकत्र येतात तेव्हा एक सुखाचा धागा बनत असतो. पण त्या सुखाचा आनंद आपल्याला लुटता आला पाहिजे आणि जेव्हा अशा सुखाचा आनंद जो माणूस लुटतो तोच माणूस खर्‍या अर्थाने आपल्या आयुष्यात यशस्वी होत असतो. शेवटी मनात प्रश्‍न असा राहतो की आत्महत्या ही एकच गोष्ट आहे का सगळ्यापासून पळ काढण्याची?
२१ व्या शतकात भारत देश महासत्ता होणार होता. पण आज प्रगती होण्याऐवजी अधोगती होताना दिसत आहे. जर एखादा माणूस प्रगतिशील झाला तर त्याचे कुटुंब प्रगतिशीलच होते. तसेच समाज, समाज प्रगतिशील झाल्यानंतर संपूर्ण देश प्रगतिशील होतो. आणि जेव्हा एखादा देश प्रगतिशील होतो तेव्हाच तो देश महासत्ता होऊ शकतो. पण आज आपल्या देशातील माणूसच म्हणावा तसा प्रगतिशील झाला नसल्याकारणाने आपण फक्त महासत्ता होण्याची स्वप्नेच पाहावीत काय? हा प्रश्‍न मनात कायम घर करून राहतो.
या वाढत्या आत्महत्यांमुळे एक वेगळे चित्र डोळ्यापुढे उभे राहत आहे. देवाने आपल्याला एवढे सुंदर आयुष्य दिले, त्याचा अंत अशा पद्धतीने होणे ही लांछनास्पद गोष्ट आहे. अडचणी सगळ्यांनाच येत असतात. अपयश पचवणे प्रत्येकालाच कठीण जाते. प्रत्येकजण स्पर्धेतील प्रयोगात जिंकलंच पाहिजे हा अट्टहास आत्महत्येस प्रवृत्त करतो. आज एका कुटुंबातील व्यक्ती आत्महत्येच्या आहारी गेली, तर त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब हादरून जाते. या धक्क्यातून सावरणे प्रत्येकालाच जमते असे नाही. एकाच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबाला सोसावे लागत असल्याने प्रत्येकाने जीवन नावाचे गणित सोडवणे खूप महत्त्वाचे आहे.
……….