मच्छीमारी खात्याच्या योजनेसाठी केंद्राकडून १० कोटी रु. मंजूर
मासळीची बियाणे असलेले पिंजरे समुद्रात ठेवून मासळीची पैदास करण्यासाठीच्या मच्छीमारी खात्याच्या योजनेसाठी केंद्र सरकारने यावर्षी खात्याला १० कोटी रु. मंजूर केले असल्याची माहिती खात्याच्या संचालक शामिला मोंतेरो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिली. गेल्या वर्षी पहिल्यांदाच वरील प्रकारे मासळी पैदास करण्याची योजना मच्छीमारी खात्याने सुरू केली होती. या याजनेसाठी केंद्राने खात्याला अडीच कोटी रु. एवढा निधी दिला होता. आता यावर्षी केंद्राने १० कोटी रु. मंजूर केल्याने खात्याचा उत्साह वाढला असल्याचे मोंतेरो यांनी सांगितले.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पोळे येथेच समुद्रात पिंजरे सोडून मासळी पैदास करण्यात येईल. मच्छीमारांसाठी ही योजना असून गेल्या वर्षी मच्छीमारांनी पैदास केली होती. उत्तर गोव्यातील मच्छीमार पुढे आल्यास उत्तर गोव्यातही पैदास करण्यात येणार असल्याचे मोंतेरो म्हणाल्या. गेल्या वर्षी ५० पिंजर्यातून ‘चणक’ व ‘मोडसो’ या मासळीची पैदास करण्यात आली होती. यंदाही याच मासळीची पैदास करण्यात येणार असून अतिरिक्त २५ पिंजर्याची सोय करण्यात येणार आहे.
त्याशिवाय यंदा नदीत व पाण्याच्या काही धरणांमध्येही वरील प्रकारे मासळीचे पीक घेण्यात येणार आहे. या ठिकाणी ‘अमेरिकन पापलेट’ या मासळीचे पीक घेण्यात येणार आहे. धरणाच्या पाण्यात ‘पंगेशयिन’ या जातीच्या मासळीचे पीक घेण्यात येईल. तर नद्यात ‘अमेरिकन पापलेट’चे पीक घेण्यात येणार आहे. त्याशिवाय नद्यात ‘शिनाणे’ या शिंपल्यातील मासळीचेही पीक घेण्यात येणार आहे. यंदा १० कोटी रु. मंजूर झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा योजनेला व्यापक स्वरुप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.