पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट

0
128

मोदीलाट ओसरली?; उत्तर प्रदेशात मोठा धक्का
चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत बलाढ्य विजय मिळविलेल्या भाजपला, परवा झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये मतदारांनी धक्का दिल्याचे कालच्या निकालांनी स्पष्ट केले. भाजपची सर्व मदार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेविषयीही या निकालांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यांतील एकुण २३ जागांसाठी झालेल्या मतदानात १३ जागा भाजपने गमावल्या.
दोन महिन्यांपूर्वी बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश राज्यांतील निराशाजनक निकालानंतर मोदी लाटेविरुद्ध बोलणारा हा दुसरा निकाल आहे.
दरम्यान, तीन लोकसभा मतदारसंघांसाठीच्या पोटनिवडणुकीत एक जागा भाजपच्या वाट्याला आली. वडोदरा (गुजरात), मैनपुरी (उत्तरप्रदेश) आणि मेढक (तेलंगण) या तीन लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती.
दरम्यान, दहा राज्यांतील ३३ विधानसभा जागांपैकी नऊ राज्यांची मतमोजणी काल झाली. यात भाजपला १२, कॉंग्रेसला सात, समाजवादी पक्षाला आठ तर टीडीपी, तृणमूल, एआययूडीएफ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली. दरम्यान, सध्या भाजपकडे असलेल्या छत्तिसगढच्या अंतगढ जागेसाठीची मतमोजणी २० सप्टेंबरला होणार आहे.
पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का उत्तर प्रदेशमध्ये बसला. लोकसभा निवडणुकीत ८० पैकी बहुतेक जागा या राज्यात भाजपला मिळाल्या होत्या. आता पोटनिवडणुकीत गेल्यावेळी भाजपकडे असलेल्या १० जागांवर समाजवादी पार्टी निवडून आली आहे. शिवाय भाजपचा मित्रपक्ष अपना दलही समाजवादी पार्टीच्या उमेदवाराकडून पराभूत झाला आहे. या निकालांनी उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या समाजवादी पार्टीला थोडा दिलासा दिला आहे. पोटनिवडणुकीत न उतरण्याचा बहुजन समाज पार्टीने निर्णय घेतल्याने भाजप-सप अशी थेट लढत होती. भाजपने ‘लव्ह जिहाद’ सारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती.
भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्येही चारपैकी तीन जागा कॉंग्रेसच्या खात्यात गेल्या. खुद्द गुजरातमध्ये भाजपकडे असलेल्या नऊ जागांपैकी तीन जागा जिंकण्यात कॉंग्रेस यशस्वी ठरला.
उत्तर प्रदेश (११), गुजरात (९), राजस्थान (४) या राज्यांतील सर्व जागा भाजपकडेच होत्या व या जागांवरील आमदार खासदार बनल्याने पोटनिवडणूक झाली होती.
दरम्यान, कालच्या निकालांत भाजपसाठी एकमेव दिलासा होता तो म्हणजे पश्‍चिम बंगाल विधानसभेत पहिल्यांदाच भाजपने प्रवेश करण्यात यश मिळवले आहे. तेथे भाजपला एक जागा मिळाली.