‘गुगल’चे ऍन्ड्रॉइड फोन बाजारात

0
81

जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन ठेवण्याचे लक्ष्य
उच्च दर्जाचे स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध करून देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून इंटरनेट क्षेत्रातील बादशहा असलेल्या ‘गुगल’ कंपनीने काल आपल्या नियोजित ऍन्ड्रॉइड श्रुंखलेतील बहुप्रतिक्षित ऍन्ड्रॉइड वन स्मार्टफोन बाजारात आणले.
कार्बन स्पार्कल र्ीं, मायक्रोमॅक्स कॅन्व्हास ए१, स्पाइस ड्रीम उनो, असे तीन गुगलने दाखल केले आहेत. त्यांचे मूल्य अनुक्रमे रु. ६३९९, रु.६४९९ व रु.६२९९ असे आहे. हे फोन काल दुपारी ३.३० वा.पासून ऑनलाईन रिटेलर्सद्वारे उपलब्ध करण्यात आले.
कार्बन स्पार्कल हा चार विविध रंगांत असून तो ‘स्नॅपडील’कडे, स्पाइस उनो ‘फ्लिपकार्ट’द्वारे, तर मायक्रोमॅक्स कॅन्व्हास ए१ हा फोन ‘ऍमेझॉन’मार्फत मागवता येईल.
गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर पिचाई यांनी माहिती देताना सांगितले की, जगभरात १.७५ अब्ज लोकांकडे सध्या स्मार्टफोन्स आहेत. पण तरीही एका मोठ्या लोकसंख्येकडे ते नाहीत. जास्तीत जास्त लोकांनी स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन व्हावे व माहितीचा मोठा साठा त्यांना उपलब्ध व्हावा, असा कंपनीचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. वर्षअखेरपर्यंत कंपनी हे फोन इंडोनेशिया, फिलीपीन्स व इतर काही दक्षिण आशियाई देशांच्या बाजारपेठांत दाखल करणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
या सर्व फोन्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. तसेच दोन सिम कार्डांची तरतूद, एफ एम रेडिओ, अतिरिक्त मेमरीसाठी मायक्रो एसडी कार्डसाठी जागा असेल. तसेच जी-मेल, गुगल मॅप्स, यू ट्यूब, गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेट असे ऍप्सही त्यात असतील. या सर्व फोन्सना ४.५ इंच स्क्रीन, ५ मेगापिक्सचा कॅमेरा, वायफाय, ब्लू टूथ, ४ जीबी फोन मेमरी असेल. ही मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविता येण्यासाठी तरतूद असेल.