पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरण : पुढील सुनावणी २३ रोजी
आमदार बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी आमदार जेनिफर आणि इतर ३५ आरोपींवर पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केल्याप्रकरणी म्हापसा येथील केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी काल सकाळी झाली. मोन्सेरात यांचा आव्हान अर्ज यावेळी न्यायालयाने फेटाळला व आरोप कायम ठेवले.
पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणात आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या ९ साथीदारांविरुध्द सीबीआय न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सुनावणीसाठी बाबूश मोन्सेरात आणि इतर आरोपी न्यायालयात काल हजर राहिले होते.बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात म्हापसा सीबीआय न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या विरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. आरोप पत्रात याप्रकरणी आरोपी विरुध्द विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. यावर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावतीने अरूण डिसा तर सरकारच्यावतीने कमरपाल सिंग यांनी युक्तीवाद केले. १९ फेब्रुवारी २००८मध्ये झालेल्या पणजी पोलिस स्थानकावरील हल्ला प्रकरणात आमदार बाबूश मोन्सेरात त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्यासह ३५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोन्सेरात यांना अटकही करण्यात आली होती.