ऑनलाईन पाणी बिले भरण्याची व्यवस्था लवकरच

0
87

साबांखा मंत्री ढवळीकरांची माहिती
पुढील पंधरा दिवसात ऑन लाईन पध्दतीने पाण्याची बिले भरण्याची व्यवस्था होणार असून डिसेंबर २०१६पर्यंत चोवीस तास पाणी पुरवठा होणारी यंत्रणा तयार होईल, असे सांगून जपानी अर्थ सहाय्याने यापुढे गोव्यात वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
०.७५ ते १.३० टक्के व्याजदराने जपानकडून कर्ज मिळते. स्वस्त व्याजाचा दर व दहा वर्षांनंतर त्याची परतफेड यामुळे जपानी अर्थसहाय्य फायदेशीर असल्याचे ढवळीकर म्हणाले. वर्षभराच्या आत पाण्याच्या गळतीचे प्रमाण सध्याच्या ४० टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न असेल. वाया जात असलेल्या या पाण्यामुळे सरकारला नुकसानी होते. राज्यातील सुमारे एक हजार किलोमीटर लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याला ३४५ कोटी रुपयांची मदत देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी लवकरच त्यांची आपण भेट घेवून मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
जुने गोवे-पणजी रस्ता रुंदीकरण प्रक्रिया सुरू
जुने गोवे ते पणजी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण प्रायोजिक तत्वावर करण्याची प्रक्रिया सुरू असून वर्षभरात ते काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर याच धर्तीवर राज्यातील तिन्ही महामार्गांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाईल. अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ भारत या योजनेखाली दि. २३ रोजी गोवा कला अकादमी संकुलात पथनाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील यशस्वी पथके राज्यभर स्वच्छतेच्या बाबतीत जागृती करतील असे ते म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात सरकारने अनेक कामे पूर्ण केली. पुढील काळात सर्व प्रकल्पाचे काम पूर्ण करणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.