– गोपिनाथ विष्णु गावस
विद्यामंदिर मग ते खेड्यातले, गावातले असू द्या किंवा शहरातले. तिथे दिले जाणारे शिक्षण हे उपक्रमशीलच असायला हवे. उपक्रमशील शिक्षण असले तर विद्यार्थी ङ्गक्त शिकत नाही. तो सर्वांगाने आपल्याला विकसित करतो. चार भिंतीत आणि पुस्तकाच्या चौकटीतील शिक्षण नावाचा अभ्यासक्रम घड्याळ्याच्या काट्याला धरून शिकवला, म्हणजे शिक्षण पूर्ण झाले असे म्हणता येत नाही. पुस्तकातील पाठाच्या बाजूला असलेली रिकामी जागा, दोन शब्दांतले अथवा वाक्यामधील अंतर स्पष्टपणे सांगणे शिक्षकाला जमले पाहीजे. म्हणजेच अभ्यासक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना संधी देण्याचे कौशल्य शिक्षकास कळणे हे अत्यावश्यक आहे. विद्यार्ध्यांना संधी देण्याचा विचार जर शिक्षकाने मनात आणला तर आपल्या शाळेत जीवन शिक्षणाचे उपक्रम राबवल्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवणे हे शिक्षकाला समजणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा शिक्षकाच्या डोक्यात असते की विद्यालयातले उपक्रम म्हणजे कथाकथन, निबंधलेखन, चित्रकला, क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलन हे उपक्रम आहेतच. या अतिरिक्त अभ्यासक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून अनेक उपक्रम राबवता येतात, ज्या उपक्रमांतून शाळेतल्या विद्यार्थ्यांना जीवन शिक्षणाचे धडे सहज प्राप्त होऊ शकतात. या उपक्रमाद्वारे जीवन शिक्षणाची संधी दरेक विद्यार्थ्याला प्राप्त होऊ शकते. बोलणे, लिहीणे आणि वाचणे शिकवताना जितके मुलांचे चेहरे ङ्गुलत नाहीत तितके ते उपक्रमशील शिक्षण देताना ङ्गुलतात, बहरतात.
शिक्षण खात्याच्या शिक्षण तज्ञाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करणे हे त्या त्या विद्यालयातील शिक्षकांना करावेच लागते. शैक्षणिक अभ्यासक्रमाला धरून अनेक उपक्रम शिक्षकाने राबवता येण्यासारखे असतात. शिक्षक या नात्याने धडपड केली तरच ते शक्य आहे. भाषा, विज्ञान आणि इतिहास या विषयांचा जर आपण अभ्यास केला तर त्यात असे कितीतरी पाठ अथवा धडे असतात ज्यांबद्दल चार भिंतीत शिक्षक ङ्गक्त ज्ञान देऊ शकतो. मग त्या धड्यामध्ये असलेल्या माहितीचा अनुभव अथवा प्रात्यक्षिकाचे काय? एका वर्गाच्या पाठ्यपुस्तकात आमचा गाव, गावची तळी, कारखान्याला भेट, गावातील वाचनालय अशा स्वरूपाचे जर पाठ असतील तर त्या शाळेतील भाषा, विज्ञान अथवा इतिहासाच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्या गावात महिन्यातून एक पदभ्रमण ङ्गेरी काढली तर अनेक विषय प्रात्यक्षिकासह स्पष्ट होतात.
अनेक शिक्षण तज्ञांनी केलेल्या उपक्रमशील शिक्षणाच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. हे थोडे जिकरीचे कार्य असते; परंतु विद्यार्थी जे काय शिकतात ते जीवनात कधीच विसरत नाहीत. कारण ते उपक्रमातून शिकत नसतात तर अनुभवत असतात. अशा उपक्रमांतून विद्यार्थी ङ्गक्त अभ्यासक्रम शिकत नाहीत तर गावजीवन, समाजशास्त्र, गावचा इतिहास, व्यवस्था, जीवनशैली त्याचबरोबर गावची कृषी संस्कृती आणि पर्यावरण याचे जीवंत अनुभवाचे दर्शन लाभते, जे वर्गात देणे अशक्य असते. पर्यावरणाचे अनेक पाठ असतात. आपण पर्यावरणाशी संबंधित उत्सव साजरे करतो, परंतु त्यांना जर आपण गावाशेजारी असलेल्या नर्सरीत नेले, प्रत्यक्ष त्यांना वृक्ष सृजनाचा अनुभव दिला. मातीत हात रंगवण्याची संधी दिली, तर तो पर्यावरणाचा धडा समजवण्याची शिक्षकावर पाळीच येणार नाही, हेही तितकेच खरे.
जून महिन्यात सगळ्याच शाळा वनसंवर्धन, वनमहोत्सव साजरे करतात. पंचायतीच्यावतीने दिलेली झाडे विद्यार्थ्यांना दिली की आपला वनमहोत्सव मावळतो. पण याच निमित्त जर विद्यालयात वनसंवर्धनाचे चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवले तर वनमहोत्सवातल्या भाषणाचा जितका परिणाम त्यांच्यावर होत नाही तितका चित्रपटाने होतो. त्यांतून त्यांचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलण्यास मदत होते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील एखाद्या देशातील एखाद्या गावाचा इतिहास शिक्षकाला शिकवावा लागतो. आणि तो शिकवतोही. पण गावच्या इतिहासाचे काय? त्या गावचा संदर्भ घेऊन जर एक ङ्गेरी गावाला असा उपक्रम राबवला तर त्या गावातील मंदिर, विहीर, तळी, देवराई, नद्या, शेती, कुळागर, डोंगर आणि ऐतिहासिक स्थळे यांचा अभ्यास होईल. यातून खरे गावचे गावपण विद्यार्थ्यांना उलगडेल. इतिहास विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावातील खर्या जिवनाचा अनुभव घेता येईल. वर्षभर विद्यालयात मुले सकाळी येतात ती दुपारपर्यंत शिकतात. सरळ शाळेत जायचे आणि तसेच घरी परतायचे. हा पालकांचा हुकुम असतो. पाण्यात खेळू नका, पावसात भिजू नका, हे करू नका आणि ते करू नका. आणि म्हणून शाळेत जायला हवे. शाळेत गेलेच पाहीजे असे म्हणणारे विद्यार्थी खूप कमी. सहल किंवा वनभोजन म्हटले की त्यांना शाळेत जाण्याची घाई असते. याचे कारण काय? कारण तिथे त्याला स्वतःला काही तरी करण्याची संधी मिळणार याची जाणिव असते.
अशा वेळी जर आपण विद्यार्थ्यांना गिर्यारोहण, जंगलातील पदभ्रमण, नदितून परिक्रमा असे उपक्रम राबवून नदीत पोहायला, दोरीवरून नदी पार करायला, दगडांवरून चढायला, सर्प हाताळणे, दोरीवरून झाडावर चढणे अशा प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थी वर्षभरात वर्गात शिकत नाहीत ते एका दिवसाच्या या उपक्रमातून शिकतात. हे खरे त्यांच्यासाठी जीवन शिक्षणच असते. जीवनात आत्मविश्वास, धाडस, चिकाटी, जिद्द आणि परिश्रम ती शिकतात. या उपक्रमातून त्यांच्या जीवनात येणार्या प्रसंगाला ती सहजतेने सामोरे जाऊ शकतात. अशा उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जीवनात हात वर करण्याची पाळी कधीच येत नाही.
अनेक विद्यार्थी आपल्या शाळेतून उत्तीर्ण होऊन जातात. शाळेच्या व्यवस्थापनाला शंभर टक्के निकाल हवा असतो. सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शिक्षणाच्या चौकटीतल्या सगळ्या विषयांमध्ये सगळ्या शाळांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाला पाहीजे असा मुख्याध्यापकाला हुकुम असतो. विद्यार्थी पासही होतात. सर्व विषयांत उच्चश्रेणी! जीवनात येणार्या एकाही खडतर प्रसंगाला सामोरे जाता येत नाही. दुःख पचवता येत नाही. प्रसंगाला पोहता येत नाही. प्रमाणपत्र आहे, पोट भरता येत नाही. भाषेची पदव्युत्तर पदवी आहे, भाषा अभिव्यक्ती नाही. शिक्षण आहे पण उपयोग करता येत नाही. सगळे असूनही प्रमाणपत्र जगायला शिकवत नाही. याचाच अर्थ सगळ्या विषयांमध्ये जरी उच्च श्रेणी असली तरी जीवन विषयात जो अनुत्तीर्ण झाला तो वाया गेला. महाराष्ट्रातील एका विद्यालयात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त तीस प्रकारचे कौशल्यात्मक पारंपरिक व्यवसाय आधारित उपक्रम राबवले जातात. या तीस उपक्रमांपैकी निदान दोनसुद्धा कौशल्ये एखाद्या विद्यार्थ्याने आत्मसात केली तर त्याला आपल्या जीवनात कुणासमोरच हात पसरवण्याची पाळी येणार नाही. पुस्तकी शिक्षणाद्वारे जीवन शिक्षणाची सांगड घालणारे हे शिक्षण. अशा शिक्षणाची आज खरी गरज आहे.