मडगाव नव्या मार्केटमधील भीषण आगीत ५ दुकाने खाक

0
104
मडगाव नवीन मार्केटमधील दुकानांना आग लागल्यानंतर दाखल झालेले अग्निशामक दलाचे जवान आग विझवताना. (छाया : गणादीप शेल्डेकर)

३५ लाखांचे नुकसान
अग्निशामक दलाला उशिरामुळे नाराजी
येथील नव्या बाजारातील दुकानाला आग लागून पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून ३५ लाख रुपयांची हानी झाल्याचे दुकान मालकांनी सांगितले. अग्निशामक दलाला पोहचण्यास उशीर झाल्याने आग वेगाने पसरली. त्यातच बाजारात बसविलेल्या फायर हायड्रटला पाणी नसल्याने हाहाकार माजला.
काल सकाळी ७.१५ वाजता ही आग लागली. लगेच तेथे जाऊन पहाणी केली असता सैयद गनी याच्या कपड्याच्या दुकानातून आगीचा आवाज येत असल्याचे आढळून आले. तात्काळ अग्निशामक दल व पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे बंब काही मिनिटात पोहचले. त्यावेळी सर्व दुकाने बंद होती. दलाला दुकाने फोडून आग विझवावी लागली. लगेच बाजारकर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांना माहिती देण्यात आली. सुरवातीस उपनगराध्यक्ष धनंजय मयेकर तेथे पोहचले. तात्काळ त्या दोघांनी बाजारकराना बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
पाण्याचे बंब सुसज्ज नव्हते
दुर्दैवाने मडगाव अग्निशामक दलाच्या बंबांमध्ये अर्धेच पाणी असल्याने ते पाणी भरण्यासाठी गेले व ते पोहचण्यास एक तास उशीर झाला. तोपर्यंत आगीने आणखी तीन दुकानांनी पेट घेतला. बाजारात बसविलेल्या ‘फायर हायड्रंट’ खोलून पाणी उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही पाणी नव्हते. त्यामुळे घबराट निर्माण झाली. पाऊण तासाने सावर्डे व वेर्णा येथील बंब पोहचले व आग विझवण्याचे काम जोरात सुरू झाले. अडीच तासानंतर आग विझवण्यात दलाला यश आले. आग विझविण्यासाठी बाजारातील व्यापार्‍यांनी जीवाची पर्वा न करता धाव घेतली व अडथळे दूर केले. मडगाव अग्निशामक दलाची एक गाडी नादुरुस्त असल्याने आग विझविण्यास विलंब झाला.
या आगीत सैयद गनी यांचे १० लाखांपेक्षा जास्ती नुकसान झाले. तसेच सदानंद कुंकळयेकर व रोहिदास कुंकळयेकर यांच्या दोन दुकानांचे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले तर मोहन गजरा, सदानंद बोरकर यांच्या दोन्ही दुकानांचे १० लाखांहून अधिक नुकसान झाले. कपड्याच्या दुकानाला आग लागताच ती पसरून फटाक्यांच्या दुकानाला आग लागली. बाजारात दाटीवाटीने दुकाने असून दुकानामधोमध जाण्यासाठी वाट नव्हती. दुकानातील विस्तार व अडथळ्यामुळे अग्निशामक दलाला आगीच्या स्थानी पोहचण्यास विलंब झाला. आगीचे वृत्त समजताच सर्व व्यापारी वर्ग धावून आला. माजी मंत्री बाबू आजगावकर, आमदार विजय सरदेसाई यांनी तिथे जाऊन पहाणी केली. पाण्याच्या टाकीला पाणी नसल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला. गेल्या दहा वर्षांपासून पालिकेकडे मागणी करूनही पाण्याची व्यवस्था केली नाही.
पालिकेवर मोर्चा
संतापलेल्या बाजारकरांनी सकाळी १०.३० वाजता आमदार विजय सरदेसाई, बाबू आजगावकर, विनोद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा नेला व मुख्याधिकारी नारायण सावंत यांना जाब विचारला व तात्काळ पाण्याची टाकी बसविण्याची मागणी केली. आठ दिवसांत हे काम न झाल्यास सोपो देणे बंद करण्याचा व रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.