– सौ. मीरा प्रभूवेर्लेकर
काणकोणच्या कै. शांताराम किन्नरकरांची ज्येष्ठ सुकन्या तू, कारवारच्या रावबहादूर तेलंगांच्या घरात स्नुषा म्हणून १९४३ साली पदार्पण केलंस. कमल तुझं नाव होतं. कमळ जसं भ्रमरांना पाकळ्यांमध्ये मिटून घेऊन स्वत:चा मधुरस चाखू देते, तसंच तुही नावाप्रमाणेच तुझ्या काळजातल्या प्रेमरसाचा आस्वाद आयुष्यभर सर्वांनाच दिलास. सासरी तू कमलची सुनीति झालीस. तुझ्या सुजाण, सुशील, सुयोग्य वर्तनाने ‘सुनीति’ हे नाव तू सार्थ केलंस. २८ जूनला तू या जगाचा शांतपणे कायमचाच निरोप घेतलास. आणि त्या दिवसापासून माझ्या बालपणापासूनची तुझी स्मृतीचित्रं मन:चक्षूसमोरून भराभर सरकू लागली…
मागे वळून पाहताना थक्कच व्हायला होतं की, कसं ते सगळं सांभाळलंस, सावरलंस, निभावलंस गं तू? अशा कसल्या संस्काराचं बाळकडू तुझ्या आई-वडिलांनी तुला पाजलं की तू समर्थपणे एकत्र कुटुंबातील ज्येष्ठांपासून कनिष्ठांपर्यंतच्या ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ची मर्जी राखून कुणाच्याही विरोधात ब्र न काढता चुपचाप भरलं घर सांभाळत राहिलीस? सर्वांची मनं तू अचूक वाचायचीस बघ. घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याबरोबर, कुणाच्याही वेळाचा नियमितपणा न मोडता सर्वांची कामं वेळेवर करून देण्याचा तू जणू चंगच बांधला होतास! तेही सतत सत्तर वर्षे? सग्गळी वार्षिक देवकार्य, सण-समारंभ, शास्त्रशुद्ध पद्धतीने पाळणे, गंध-चंदन उगाळण्यापासून देवपूजेची रोज तयारी करून ठेवणे, सावळ्यात किंवा ओलेत्यानेही रोजचा अन्नाचा नैवेद्य बनवणे, दुपारी साडेबारापर्यंत शाकाहारी-मांसाहारी माणसांसाठी वेगवेगळा स्वैंपाक तयार ठेवणे, आमच्या शाळा-कॉलेजच्या वेळा पाळणे, सतत अचानक येणार्या पाहुण्यांची न कंटाळता सरबराई करणे अशी त्या काळात यंत्रांच्या मदतीविना केलेली तुझी कसरत पाहून, या आरामदायी यंत्रयुगातल्या आम्ही तुझ्या मानसिक आणि शारीरिक ताकदीसमोर नतमस्तक होतो.
तू कै. काकांची कौतुकास्पद पत्नी, आमची ममताळू आई, तुझ्या भावंडांची जीवाभावाची ताई तसंच कुणाची लाडकी काकी, मामी, ‘अपुरबाये’ची मावशी आणि मोगाळ आजी-पणजी होतीस. तुझी सख्खी चुलत (खरं सांगायचं तर चुलत हे नाव तू कधी मानलंच नाहीस) भाचरं – पुतण्यांना, सुट्टीत एकत्र जमल्यावर पानपोळे, थालीपीठ, एलाप्पे, सांजणं असा त्यांच्या त्यांच्या आवडीचा नाश्ता प्रत्येक दिवशी करून घालण्यात तू किती आनंद मानायचीस! आमच्या बालपणी बेळगाव, मुंबईहून सहकुटुंब माहेरपणाला येणार्या नणंद-दीरापासून ते अलिकडे तुझ्या लेकी-जावई-नातवंडापर्यंत सर्वांसाठी तू राबलीस. हे तर झालं आपल्याच माणसांसाठी. परंतु घरी वेगवेगळ्या कामांसाठी वावरणार्या मंडळीची तू आदरणीय वैनी होतीस. कुणाच्याही आर्थिक परिस्थितीवरून, कामकाजावरून, जातीपातीवरून कमी लेखणे, दुजाभाव दाखवणे हे तुझ्या स्वधर्मातच नव्हतं. सर्वांशी समानतेने वागायचीस. मग तो दादांचा मित्र, ब्रिटिश अधिकारी आर्थर हॉलंडसाहेब असो वा शेतमजूर बाबनी! रावबहादूरांची थोरली सून म्हणून त्यांच्यावर अधिकार गाजवून कधीही मोठेपणा मिरवला नाहीस. सौजन्य तुझ्या नसानसात भिनलेलं होतं. त्यामुळे या प्रेमळ वैनीकडे द्रोणातली ‘आमली’, पापड, लोणचं, आमटी असं हक्काने मागून नेण्यास ती मंडळी कधी कचरली नाहीत. दुसर्यांना देण्यांतला तुझा आनंद खरोखर काही औरच असे. तू सर्वांना सढळहस्ते द्यायचीस तेव्हा काका तुला ‘तुकारामाचा अवतार आहे हा’ असं थट्टेने म्हणायचे. दारांत येणारा भिकारी असो वा वेडा ‘आमा भूक लागली’ असं त्यांनी म्हणण्याचाच अवकाश की तुझी जेवणाची पत्रावळी त्यांच्यासमोर तयार व्हायची. तुझ्या मनाच्या मवाळपणाबद्दल काय नि किती बोलू? दया, माया, कणव, सहानुभूति अशा संमिश्र प्रेमरसात डुंबलेलं तुझं काळीज लगेच विरघळायचं. घरात बनलेल्या नाश्त्यातला वाटा प्रत्येक कामकर्यासाठी (कामवाली, मासेवाली, फुलवाली, घरातली मदतनीस, माड शिंपणारा वगैरे) बाजूला काढून ठेवणार्या तुझ्यासारख्या गृहिणीला आठवल्यावर, चौकोनी कुटुंब चालवताना जीवाची घालमेल होणार्या आम्ही आजच्या गृहिणी अचंबितच होऊन जातो.
तुला गोड आवाजाची देवदत्त देणगी होती. पण त्याकाळी वडील मंडळीसमोर गुणगुणणंही त्यांना अवमानास्पद वाटे. गाणं, भरतकाम, नाट्यवेड, वाचनवेड हे सारे तुझे छंद गृहकृत्याखाली तू दडपूनच टाकलेत कसे! सहनशीलता, शालीनता, नम्रता या स्त्रीसुलभ गुणालंकारामुळे आणि तुझ्या सुसंस्कृत वर्तनाने तुझं व्यक्तिमत्व तुझ्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला लोभसवाण वाटायचं.
पोर्तुगीजांच्या राजवटीत गोवा-मुंबईला येणारे-जाणारे अगणित गोवेकर आदी मॅट्रिकच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी आमच्या घरी मुक्कामाला असत. अजूनही ते तुमच्या ऊबदार आदरतिथ्याची आवर्जुन आठवण करतात. ‘देवमाणसं होती ती’ हे त्यांनी तुमच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार एकले की ऊर अभिमानाने भरून येतो. खरंच, ‘आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही’ या गीतपंक्तीची प्रचीति तू आम्हांला दिलीस. बाप्पा (तुझे वडील) पोर्तुगीज फाजेंदमध्ये नोकरीला होते. त्यांचे वरिष्ठ पोर्तुगीज अधिकारी आंद्राद, इश्केरांव हे अंजदीवच्या भेटीदरम्यान सपत्निक तुला भेटायला कारवारला घरी यायचे, ही तर किती अभिमानाची गोष्ट होती तुझ्यासाठी!
वाड-वडिलांच्या दुसर्या पिढीतील शेवटची एकमेव राहिलेली तू, देवाधर्माची बंधनं असलेल्या या घराची सोबत अखेरच्या श्वासापर्यंत न सोडण्याच्या निर्धाराने तिथंच हट्टाने राहिली होतीस. परंतु नाइलाजास्तव तुला तुझ्या देवरूप वास्तूपासून दूर न्यावं लागलं. शेवटी ‘घर-घर’ अशी घरघर लागलेल्या तुझ्या परतव्याकडे डोळे लावून राहिलेल्या त्या शताब्दी गाठलेल्या घरालाही आमच्याबरोबरच पोरकं करून तू निघून गेलीस. इतकी वर्ष नुसती वाचत आलेल्या ‘आईविना भिकारी होणे’ म्हणजे काय याची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही तुझी लेकरं आज घेतोय. तू देहाने आमच्यात नसलीस तरी, सर्वा-सर्वांसाठी अक्षरश: चंदनाप्रमाणे झिजून मायेचा सुगंध पसरवल्यामुळे सर्वांच्या हृदयातला एक कोपरा तुझ्यासाठी नक्कीच राखून ठेवला जाईल अशी पक्की खात्री आहे. तू आयुष्यभर झिजलीस तरी जीवन जिंकलंस गं आई!!
………