– प्रा. रमेश सप्रे
गीता हा समुपदेशनाचा ग्रंथ आहे. समुपदेशकसुद्धा साक्षात् भगवंत आहेत. तसं पाहिलं तर प्रत्येक गीताध्यायाच्या समाप्तीनंतर जे संकल्पवाक्य येतं त्यात ‘श्रीकृष्णार्जुन संवादे’ असा उल्लेख येतो. पण संपूर्ण गीतेत ‘श्रीकृष्ण उवाच’ म्हणजे ‘श्रीकृष्ण (अर्जुनाला) म्हणाला’ असं एकदाही येत नाही. सर्वत्र ‘भगवान उवाच’- भगवंत म्हणाले असं येतं. याचा अर्थ काय? स्वतः भगवंतांनीच म्हणजे श्रीकृष्णानंच याचं उत्तर दिलंय. ज्यावेळी अर्जुन महाभारत – युद्ध संपल्यानंतर, युधिष्ठिराला हस्तिनापुरला राज्याभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णाला पुन्हा एकदा कुरूक्षेत्रावर युद्धापूर्वी केलेला उपदेश म्हणजेच गीता सांगायला सांगतो तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो- ‘अर्जुना ते आता शक्य नाही. कारण त्यावेळी तुला ज्या समुपदेशनाची गरज होती ते करण्यासाठी मी योगारूढ अवस्थेत होतो. तुझा मित्र, देवकीचा पुत्र साधा कृष्ण नव्हतो तर भगवान् होतो’. याचा अर्थ स्पष्ट आहे गीता सांगणारा ‘योगेश्वर कृष्ण’ हा योगाच्या सर्वोच्च अवस्थेत असल्यामुळे गीतेची शिकवण ही सर्व काळाला सुसंगत आहे. केवळ धार्मिक उपदेश करणारा ग्रंथ नसून गीता हा मानसिक तसेच आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा विश्वग्रंथ आहे.
भगवंताचा भर जीवनातील, उपासनेतील सातत्य, नित्यनेम यावर अधिक आहे. शिवलिंगावर करावयाच्या अभिषेकाची दीर्घकाळ चालणारी संततधार महत्त्वाची आहे. उगीच बादल्या बादल्या पाणी एकदम ओतून शिवलिंगाभिषेक करायचा नसतो. कोणत्याही उपासनेत असा नित्यनेम अपेक्षित आहे. तपश्चर्या करताना ती किमान एक तप म्हणजे बारा वर्षे तरी करावयाची असते. जे तत्त्व (चैतन्य) शाश्वत (कॉन्स्टंट) आहे त्याची क्षणभर (इन्स्टंट) पूजा करून काय साध्य होणार?
भगवंत परत परत सांगतात ‘तस्मात् सर्वेषु कालेषु’ म्हणून सर्वकाळी (सदा सर्वदा) साधना चालू ठेवली पाहिजे. अंशकाल (पार्ट टाइम) नव्हे तर पूर्णकाळ (फूल टाइम), देहाच्या पातळीवर कोणतीही कृती सदासर्वकाळ करता येणं शक्य नाही. सोळा उपचारातला एकही उपचार अखंड चालू ठेवणं कसं शक्य आहे? प्रत्येकाला भोजनं – विश्रांती – मलमूत्र विसर्जन यांसारखे देहधर्म आहेत. हे सारं पार पाडताना षोडशोपचार चालू ठेवणं कसं जमू शकेल?
म्हणून अध्यात्मात नवविधा भक्तीची संकल्पना आली. त्यातही श्रवणं – कीर्तनं – वंदनं – अर्चनं – पादसेवनं सतत कसं शक्य आहे? दास्य – सख्य हे कृतीच्या पातळीवर सदैव जमू शकेल काय? – एकच साधन असं आहे की ज्यात कृती नव्हे तर भाव मुख्य आहे. ते म्हणजे नामस्मरण! त्यातही ‘नामजप’ करावा लागतो म्हणजे कृती आली. ‘श्रीराम जयराम जयजयराम’ म्हणणं हे व्यवहारातलं इतर बोलताना खंडित होणारच आहे. ॐकाराचा उच्चार अखंड शक्य आहे. पण नामाचं स्मरण – चिंतन – ध्यान कोणतीही सांसारिक कृती करताना, प्रापंचिक कर्तव्य पार पाडताना कायम चालू ठेवणं सहज शक्य आहे. सोपं नसलं तरी अशक्य नाही. ‘तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर युध्य च’ असं भगवंत सांगतात तेव्हा त्यांना हे अभिप्रेत असतं.
तसंच भगवंत असंही म्हणतात – ‘तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन’ त्यावेळीही असं नित्य साधनच त्यांना सुचवायचं असतं. ‘माम् अनुस्मरम्’ म्हणताना भगवंताचा भर ‘नामावर’ अधिक असतो. ‘सर्वकाळी माझं (नाम) स्मरण करत रहा’- असं त्यांना सुचवायचं असतं. पण जेव्हा ‘सर्वेषु कालेषु योगयुक्त भव’ असं सांगायचं असतं त्यावेळी सर्वकाळी माझ्याशी जोडलेला रहा’ असं म्हणताना ‘सर्वकाळी’ असं त्यांना आग्रहानं सुचवायचं असतं.
म्हणून जीवन मरणाचा विचार करताना भगवंत मृत्यूच्या वेळी ‘काळ’ कसा असावा याचं मार्गदर्शन करतात. हे वाचताना डोळ्यासमोर तिथी – वार – नक्षत्र इ. सांगणारं पंचांग किंवा निसर्गातली परिस्थिती किंवा मरणसमयीचं वातावरण येतं. पण भगवंताना तसं बिलकुल सुचवायचं नाही. कारण आपण ज्यांना संतमहात्मे म्हणतो त्यांच्या मृत्यूच्या वेळी तशी परिस्थिती नसते. शुक्ल पक्षात मरण येणार्यांना मुक्ती असं म्हटलं तर संत ज्ञानेश्वर – एकनाथ – तुकाराम – रामदास – गोंदवलेकर महाराज – स्वामी स्वरूपानंद आदी मंडळी तर वद्य पक्षातच मरण पावली आहेत. मग काय त्यांना मुक्ती नाही मिळाली?
भगवंत असं वरवरचं ढोबळ सांगत नाहीयेत तर सूक्ष्म अर्थ सांगणारं एक सुंदर रूपक (मेटॅफर) वर्णन करताहेत. या संदर्भात भीष्माचार्यांचं उदाहरण फार अर्थपूर्ण आहे. एकाच वेळी शाप व वरदान लाभलेलं अनोखं जीवन आहे भीष्माचार्यांचं. मूळचे अष्टवसूंपैकी ‘द्यु’ नावाचे वसु. ऋषी वसिष्ठांच्या आश्रमातील नंदिनी या कामधेनूचा अपराध केल्यामुळे वसिष्ठांनी मनुष्य जन्माचा व मनाविरुद्ध दीर्घ जीवनाचा शाप दिला. म्हणून बघू नये ते द्रौपदी वस्त्रहरण बघावं लागलं. करू नये ते युद्ध कौरवांच्या म्हणजेच अधर्म अनीतीच्या बाजूनं करावं लागलं. हे सारं पिताश्री शांतनूंनी इच्छामरणाचा वर दिलेला असतानाही सहन करावं लागलं. पण त्यांचा मृत्यू अत्यंत धीरोदात्त स्वरूपाचा झाला.
रणांगणात अर्जुनाच्या बाणांनी विद्ध झालेल्या अवस्थेत शरशय्येवर अनेक दिवस ते उत्तरायणाची वाट पाहात राहिले. ते उत्तरायण वरवर जरी पंचांगातलं वाटलं तरी त्याला फार सूक्ष्म अर्थ आहे. कारण याच काळात आपल्यामुळे हे महायुद्ध व त्यातला संहार झाला म्हणून शोकविव्हल झालेल्या युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी योग्य उपदेश करून शांत केलेलं आहे. महाभारतातील शांतिपर्व व अनुशासनपर्व या दोन मोठ्या पर्वातील हा भीष्म-युधिष्ठिर संवाद काळाच्या दृष्टीनंही खूप प्रभावी आहे.
जीवन धन्यतेनं कसं जगावं, हे सांगताना सर्व धर्मांचं (म्हणजे पितृधर्म – पुत्रधर्म, गुरूधर्म – शिष्यधर्म इ. कर्तव्यांचं) पालन करून शांतपणे शेवटचा क्षण व अखेरचा श्वास साजरा करत मुक्त कसं व्हावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भीष्माचार्यांचं जीवन व मरण आहे. गीतेत या संदर्भात भगवंताचं स्पष्ट मार्गदर्शन आहे. – भगवान म्हणतात…
यत्र काले तु अनावृत्तिं आवृत्तिं चैव योगिनः|
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ॥
म्हणजे – ज्या काळी प्रयाण केल्यावर (देह ठेवल्यावर) पुनर्जन्म घ्यावा लागतो (आवृत्तिम्) किंवा घ्यावा लागत नाही (अनावृत्तिम्) तो काळ (किंवा मार्ग) मी तुला सांगतो. भगवंतानी दोन मार्ग सांगितले आहेत. एक पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचा (बंधनाचा) मार्ग ज्याला धूममार्ग (अंधारी मार्ग) किंवा पितृयान म्हटलेलं आहे. अशी व्यक्ती पितरांच्या (पूर्वजांच्या) लोकात जाते. आपल्या जन्मात केलेल्या पाप-पुण्यानुसार नरकवासाचं दुःख किंवा स्वर्गवासाचं सुख भोगते. हे संपलं की पुन्हा मृत्युलोकात (पृथ्वीवर) जन्माला येते.
भगवंत दुसरा मुक्तीचा मार्ग सांगतात याला अर्चिमार्ग (प्रकाश मार्ग) किंवा देवयान म्हणजे पुन्हा जन्माला न येण्याचा म्हणजेच मुक्तीचा मार्ग म्हटलंय.
हे वर्णन अर्थातच चिंतनासाठी व जीवनासाठी आहे. केवळ मृत्यूसाठी व चिंतेसाठी नाही. हे सर्वप्रथम ध्यानात ठेवलं पाहिजे.
केव्हा मृत्यू आला असता (खरं म्हणजे कसा – कशा अवस्थेत – मृत्यू आला असता) माणूस बंधनात सापडून, वासनेत अडकून पुन्हा जन्माला येतो त्याचं वर्णन केलंय-
धूमो रात्रिः तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् |
तत्र चांद्रमसं ज्योतिः योगी प्राप्त निवर्तते ॥
याचा अर्थ लक्षात घेणं आवश्यक आहे.
१. धूमो रात्रिः तथा कृष्णः – रात्र आहे, धूसर वातावरण आहे आणि रात्रीचा प्रकाश कमी होत जाणारा कृष्णपक्ष आहे यावेळी येणारा मृत्यू पुनर्जन्माच्या बंधनात टाकणारा असतो. भगवंताला मरणार्या व्यक्तीची अवस्था वर्णन करायची आहे. अंधार म्हणजे अज्ञान, वासना, अतृप्त इच्छा, भय, चिंता यांचा प्रभाव. त्याचप्रमाणे देहाची अवस्था – इंद्रियं क्षीण झालीयत. स्पष्ट दिसत नाहीये – ऐकूही येत नाहीये – स्मृती नष्ट होऊ लागलीय – शरीरमनाची घुसमट – तगमग वाढलीय. काहीतरी अजूनही अर्धंअधुरं आहे याची दुःखद जाणीव आहे अशी तळमळ, अतृप्ती अनुभवत जो जीव मरतो तो निश्चित पुन्हा या जन्ममृत्यूच्या बंधनात अडकणार हेच भगवंताना सुचवायचंय.
२. षण्मासा दक्षिणायनम् – दक्षिणायनाच्या सहा महिन्याच्या कालावधीत जो देह ठेवतो तो अंधार्या मार्गानं जाऊन पुन्हा जन्माला येतो. वीस जून हा सर्वांत जास्त लांबीचा म्हणजेच प्रकाशाचा (लॉंगेस्ट अँड ब्राइटेस्ट डे) असतो तर वीस डिसेंबर हा सर्वांत कमी लांबीचा दिवस (शॉर्टेस्ट डे) म्हणजे जास्त रात्रीचा -अंधाराचा – दिवस असतो. याचा अर्थ जूनपासून डिसेंबरपर्यंतच्या सहा महिन्यांचा काळ दक्षिणायनाचा असतो. मृत्यू ही अंधारासारखी नकारात्मक – अभावात्मक अवस्था मानली जाते. साहजिकच मृत्यूच्या देवतेचं – यमराजाचं – राज्य दक्षिणेकडे मानलं गेलंय. दक्षिणाभिमुख घर असू नये, दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, घरातील देवाच्या मूर्तींचं तोंड दक्षिणेकडे असू नये या समजुती या मरणविषयक कल्पनेतून निर्माण झाल्या.
या उलट आध्यात्मिक दृष्ट्या दक्षिणाभिमुख मारूती, दक्षिणामूर्ती शिवशंकर यांची उपासना (केवळ पूजाअर्चा नव्हे) अधिक फलदायी-प्रभावी समजली जाते. अशा उपासनेत पूजेपेक्षा पूज्य भावावर, स्तोत्रपठण – ग्रंथपारायणापेक्षा मनन – चिंतनावर, नामस्मरण – ध्यानावर अधिक भर असतो.
अग्निः ज्योतिः अहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् |
तत्र प्रयाता गच्छंति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः॥
३. अग्निः ज्योतिः अहः शुक्लः – या सर्वांचा अर्थ प्रकाशाचा काळ. अग्नी प्रज्वलीत केलेला आहे, सर्वत्र प्रकाश (ज्योतिः) पसरलेला आहे आणि रात्रीही वाढत जाणार्या चंद्रप्रकाशाचा शुक्लपक्ष आहे. अशा काळी म्हणजे अशा स्थितीत जो मरण पावतो तो मुक्त होतो – ब्रह्माला प्राप्त करतो (ब्रह्म गच्छंति) अशा व्यक्तींना ब्रह्मज्ञानी – आत्मज्ञानी म्हटलंय (ब्रह्मविदो जनाः) हेही अर्थात प्रतीकात्मक वर्णनच आहे.
जीवनातील सर्व सकारात्मक – होकारात्मक – भावात्मक – कल्याणकारी (पॉझिटिव्ह किंवा कन्स्ट्रक्टिव्ह) गोष्टींना ‘प्रकाश’ म्हटलं जातं. अग्नी, ज्योती, शुक्ल पक्ष सारे प्रकाश सुचवणारे शब्द आहेत. प्रकाश म्हणजेच मनबुद्धीची मृत्यूसमयीची प्रकाशित, प्रसन्न अवस्था. विचार शुद्ध, स्पष्ट आहेत. भावभावना कशात अकारण गुंतलेल्या नाहीयेत. भयचिंताना मनात स्थान नाहीये. कोणत्याही अतृप्त इच्छा, भोगवासना उरलेल्या नाहीयेत. याचा परिणाम म्हणून इंद्रियांची क्षमता बर्यापैकी जागृत आहे. स्मृती टिकून आहे. अशा अवस्थेत येणार्या मृत्यू मुक्तिदायक असतो. परमात्म्याशी चिरमिलन (जीवशिवअद्वैत) घडवणारा असतो. एखादे शंकराचार्य आनंदात हिमसमाधी घेतात. तर एखादे ज्ञानेश्वर शांततृप्त होऊन समाधानानं संजीवन समाधी घेतात. एखादा नित्शेसारखा तत्त्वज्ञानी ‘प्रकाश .. आणखी प्रकाश (लाइट, मोअर लाइट)’ म्हणत त्या दिव्य प्रकाशात प्राणज्योत विलीन करतो. एखादे गौरांग प्रभू चैतन्य अथांग सागराच्या निळाईत निळ्या अनंताशी एकरूप होतात. हे सारे मुक्त होणारे योगी असतात. त्यांच्या कोणत्याही कामना-वासना उरलेल्या नसतात. तृष्णा-इच्छा सार्या शमलेल्या (शांत झालेल्या) असतात. सारे प्रवासी असतात अनंततेचे – चिरंजीवित्वाचे – मुक्तीचे – प्रकाशाचे…
४. षण्मासा उत्तरायणम् – हा प्रकाश वाढत जाणारा सहा महिन्यांचा (डिसेंबर ते जून) काळ – उत्तरायण! उत्तरोत्तर प्रगती करत व त्यामुळे बंधनात न अडकता मुक्त होत सद्गती (मुक्ती) प्राप्त करण्याचा काळ. ‘उत्तर’ ही अखंड पूर्णत्वाकडे नेणारी प्रक्रिया आहे तर उत्तम ही पूर्ण झालेली अवस्था आहे. सारं पूर्णच असलं (पूर्णमदः पूर्णमिदम्) असलं तरी मानवजन्मात अपूर्णतेची (इम्पर्फेक्शन) जाणीव झाल्यावर पूर्णत्वाचा ध्यास लागतो. पूर्णत्व प्राप्त करणं हे जीवनाचं ध्येय बनतं. अखंड ध्यान राहतं पूर्णत्वाचंच, यालाच निदिध्यासन (नित्यध्यास) म्हटलं जातं. भगवंत यालाच ‘सदासर्वकाळी’ असं म्हणतात-
तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव अर्जुन ॥
मुक्ती हा मुक्काम(मंजिल) नसून सतत चालू असणारा नित्यप्रवास आहे. या मार्गावरचं प्रत्येक पाऊल मुक्तीकडे नेणारं .. मुक्त करणारं .. मुक्तीचा अनुभव-आनंद देणारंच असतं. ‘सर्वेषु कालेषु’ म्हणताना भगवंताना जीवनाच्या कण (पदार्थ) – प्राण (शक्ती) – क्षण (काळ) या तीन अंगांबद्दल सुचवायचं असतं. या तिन्हीतल्या चैतन्यस्पंदनांनाच मुक्त जीवन म्हणायचं असतं. असंच जगायचं असतं. मनबुद्धीत सतत स्मरण (अनुस्मरण) याच ऋषिमंत्राचं ठेवायचं असतं-
असतो मा सद्गमय| तमसो मा ज्योतिर्गमय|
मृत्योर्मा अमृतं गमय .. अमृतं गमय … अमृतं गमय॥
……………………………………………………………