बायणात घरे खाली करण्यास सांगितलेल्यांना ‘आधी पुनर्वसन, नंतर स्थलांतर’ या मागणीसाठी आज दि. ५ रोजी धडक मोर्चा दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर नेणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा विस्थापितांचे नेते ऍड्. थालमन परेरा यांनी येथे सांगितले. दि. ५ रोजीपर्यंत बायणा समुद्र किनार्यावरील घरे खाली करण्याची नोटीस सरकारने बजावली असता येथील विस्थापित त्यांना न जुमानता गेले चार दिवस मुरगांव पालिका इमारतीसमोर ठाण मांडून निदर्शने करून एक प्रकारे नोटीसीला आव्हान दिले आहे. या आंदोलनात महिलांचा तसेच चतुर्थीची सुटी असून सुध्दा शाळेचा गणवेश घालून विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश करण्यात आला. गेले चार दिवस ऍड्. परेरा यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदोलनात घरे खाली करण्याची नोटीस सरकारने मागे न घेतल्यास सर्व विस्थापितांना घेऊन आल्तिनोवरील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला होता. या इशाराची आज शेवटचा दिवस होता. याला अनुसरून आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज चौथ्या दिवशीही विस्थापित मुलाबाळांना घेऊन मुरगाव पालिका इमारतीसमोर ठाण मांडून सरकार विरोधी नारेबाजी सुरू होती.