भारताची हॅट्ट्रिक; अजिंक्य रहाणेचे शतक : शिखर धवनला लय गवसली
अजिंक्य रहाणेचे पहिले एक दिवसीय शतक आणि त्याने शिखर धवनच्यासाथीत केलेल्या १८३ धावांच्या भागीवर भारताने ९ गडी आणि ११७ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.
या विजयासह टीम इंडियाने २४ वर्षांनंतर इंग्लिश भूमीवर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा पराक्रमही केला. याआधी १९९०मध्ये भारताने इंग्लंडमध्ये द्विपक्षीय मालिका जिंकली होती, दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताने लीडस येथे ६ गडी राखून आणि नॉटिंगॅममध्ये ५ गडी राखून विजय मिळविला होता.
नाणेफेकीच्या अनुकूल कौलानंतर भारताने इंग्लंडला प्रथम फलंदाजीस पाचारण करून ४९.३ षट्कात २०६ धावात उखडले आणि नंतर ३०.३ षट्कात केवळएका गडयाच्या मोबदल्यात उद्दिष्ट गाठीत सलग तिसर्या विजयासह मालिका जिंकली.
जवळ जवळ एकतर्फी ठरलेल्या या लढतीत अजिंक्य रहाणेने इंग्लिश गोलंदाजी निष्प्रभ ठरविताना १०० चेंडूत १० चौकार आणि ४ षट्कारांच्या आतषबाजीत १०६ धावा चोपल्या. अजिंक्यच्या खेळीपासून स्फूर्ती घेत शिखर धवननेही लय साधताना ११ चौकार आणि ४ षट्कारासह नाबाद ९७ धावा चोपल्या. अजिंक्य आणि शिखऱने टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया रचताना २८.४ षट्कात १८३ धावांची सलामी दिली.
नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत १-३ अशी दारूण हार पत्करावी लागलेल्या धोनीच्या धुरंधरानी ५० षट्कांच्या क्रिकेटमध्ये नाटयमय पुनरागमन करताना पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत ३-० अशा विजयी आघाडीसह आपले श्रेष्ठत्व सिध्द केले.
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी शिस्तबध्द आणि प्र्रभावी गोलंदाजीत चौथ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडला ४९.३ षट्कात अवघ्या २०६ धावांत उखडले. मोईन अलिने थोडा प्रतिकार दर्शविताना ६७ धावा केल्या. मोईन अलिच्या या दुसर्या एक दिवसीय अधर्ंशतकांमुळेच इंग्लंडला दोनशेचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडचे अन्य तीन फलंदाजच विशी ओलांडू शकले. अलिने ५० चेंडूत चार चौकार आणि तीन षट्कार ठोकले. भारतातर्फे मोहम्मद शामीने २८ धावात ३ बळी घेतले आणि त्याला उत्तम साथ देताना भूवनेश्वर कुमार (२-१४) आणि रविंद्र जडेजा (२-४०) यांनी प्रत्येकी २ तर रविचंद्रन अश्विन (१-४८) आणि सुरेश रैनाने एकेक बळी घेतला. पहिला वन-डे खेळणार्या धवल कुलकर्णीला (० -३५) मात्र ७ षट्कात एकही बळी मिळविता आला नाही.
भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेकीच्या अनुकूल कौलानंतर क्षेत्ररक्षणाचा निणर्ंय घेतला आणि गोलंदाजांनी शिस्तबध्द कामगिरीत तो योग्य ठरविला. गेल्या दोन सामन्यात अर्धशतकी सलामी दिलेले ऍलिस्टर कूक (९) आणि ऍलेस हेलसला (६) भूवनेश्वरकुमारने स्वस्तात बाद केले तर मोहम्मद शामीने गॅरी बॅलान्सला तंबूत पाठवित यजमानांची ३ बाद २३ अशी नाजूक स्थिती बनविली. पहिल्या सत्रात प्रभावी गोलंदाजी करताना पाचव्या षट्कात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीराना बाद केलेल्या भूवनेश्वरने आठ षट्कातील तीन निर्धाव टाकीत केवळ १४ धावा दिल्या. कुमारने पाचव्या षट्कातील पहिल्याच चेंडूवरील इन-स्विंगरवर हॅलसला त्रिफळाचित केले आणि चौथ्या चेंडूवर कुकला गलीमधील रैनाकरवी झेलबाद केले.
गेल्या सामन्यात घोटा मुरगळलेल्या मोहित शर्माच्या जागी भारताने धवल कुलकर्णीला खेळविले तर इंग्लंडने तीन बदल करताना अंगठा दुखावलेल्या इयान बेलच्या जागी गॅरी बॅलान्सला तर जेर्मंस ट्रेडवेल आणि बेन स्टोकसच्या जागी अनुक्रमे मोईन अलि आणि हॅरी गर्नेयला खेळविले. कसोटी मालिकेतील विलक्षण यशानंतर वन-डेत ढेपाळलेल्या इंग्लंडला अर्धशतकांसाठी १९व्याषट्कापर्यंत रखडावे लागले. मोईन अलि वगळता ज्यो रूट (४४), इयान मॉर्गन (३२) यांनीच थोडा प्रतिकार दर्शविला.