रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पुत्राविरुध्द एका अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार पोलीसांत दाखल केली असून या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई होईल अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्त केली आहे. तर सदानंद गौडा यांनी आपल्या पुत्राविरुध्द हे कुभांड असल्याचे म्हटले आहे. मूळ मॉडेल असलेल्या सदर अभिनेत्रीने सदानंद गौडा यांचे पुत्र कार्तिक गौडा यांच्याशी आपला विवाह झाला होता असा दावा केला असून त्यांच्या कुटुंबियांनी आपल्याला सून म्हणून स्वीकारावे अशी मागणी केली आहे. कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा मंजुळा मनसा यांनी सदर अभिनेत्रीच्या बहिणीने आपल्याशी या संदर्भात संपर्क साधला होता असे सांगितले. कार्तिक गौडा यांच्याशी आपली मे महिन्यात ओळख झाली व कार्तिक यांच्या ड्रायव्हरच्या उपस्थितीत आपला त्यांच्याशी जून महिन्यात विवाह झाल्याचा दावा सदर अभिनेत्रीने केला आहे.