४० ही समित्या निष्क्रिय बनल्याने निर्णय
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने काल राज्यातील सर्व ४० ही मतदारसंघातील गट समित्या बरखास्त केल्या. त्या जागी नव्या गट समित्या निवडण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल सांगितले.
बरखास्त करण्यात आलेल्या समित्या या २०११ पूर्वी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका व हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकात कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर या ४० ही गट समित्या निष्क्रिय झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या समित्या बरखास्त करण्याचा निर्णय प्रदेश कॉंग्रेस समितीने घेतल्याचे जॉन फर्नांडिस यांनी सांगितले.
बहुतेक मतदारसंघातील गट समित्यांचे सदस्य हे विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या पराभवानंतर खचून गेल्याचे व पक्षासाठी काहीच काम करीत नसल्याचे प्रदेश कॉंग्रेस समितीला दिसून आले होते. त्यामुळे या गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय प्रदेश कॉंग्रेस समितीने शेवटी घेतल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
प्रक्रिया १ सप्टेंबरपासून
नव्या गट समित्या स्थापन करण्यासाठीची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रदेश कॉंग्रेस समितीच्या सरचिटणीसांवर त्यासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका एका सरचिटणीसावर प्रत्येकी चार गट समित्यांची जबाबदारी असेल. ४० ही गट समित्यांवर नव्या दमाच्या लोकांची निवड करण्यात येईल. गट समित्यांची स्थापना झाल्यावर उत्तर व दक्षिण गोवा या दोन जिल्हा समित्यांची स्थापना करण्यात येईल. दोन्ही जिल्हा समित्यांवर प्रत्येकी २० जणांची निवड करण्यात येईल. तसेच नंतर दोन्ही जिल्हा समित्यांवर प्रत्येकी १० जणांची नियुक्ती करण्यात येईल, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.