(योगसाधना २४७)
(स्वाध्याय – १५)
– डॉ. सीताकांत घाणेकर
शास्त्रकार सांगतात की पूर्वसुकृतानुसार प्रत्येकाचे जीवन घडत असते. खरेच, किती सत्य आहे हे! विविध व्यक्तींच्या जीवनांचा जवळून अभ्यास केला तर याची प्रचिती येते. म्हणून जीवनविकासाकरिता वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास अति आवश्यक आहे.
रामायणाचा अभ्यास केला की तिथे वेदशास्त्र पारंगत व शिवभक्त रावण दिसतो. विकार व वासनांमुळे राक्षस ठरला व अधोगतीला गेला. महाभारतातील दुर्योधन व त्याचे इतर सहकारीसुद्धा एवढे शक्तिशाली असून स्वार्थ व अहंकारामुळे दुष्ट व कपटी निघाले.
विचारांती असे देखील लक्षात येते की संचिताबरोबर संस्कारही महत्त्वाचे आहेत. चांगले संस्कार होण्यासाठी सुसंगती तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच महापुरुषांनी स्वाध्यायाचे महत्त्व सांगितले आहे. रावणावर राक्षस कुळातील आईकडून कुसंस्कार झालेत. तो वासनाग्रस्त झाला. याउलट त्याचाच भाऊ बिभिषण- त्याच्यावर ब्राह्मण वडलांकडून सुसंस्कार झाले. तो रामभक्त ठरला. त्याचे जीवन सफल झाले.
तसाच दुर्योधन- सुरुवातीलाच वडील-धृतराष्ट्राकडून द्वेष शिकला व पुढे शकुनीमुळे या वाईट गुणाला आणखी पुष्टी मिळाली. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या गांधारीनेही दोघांच्या स्वार्थी वागण्याकडे कानाडोळा केला. शेवटी महायुद्धात कुरुकुलाचा नाश झाला. इथेसुद्धा पांडवांवरील सुसंस्कारामुळेच ते कृष्णभक्त ठरले. वासुदेवाने प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी त्यांना मार्गदर्शन केले. सत्याचा त्यांनी क्षणोक्षणी पाठपुरावा केला. एवढ्या दुःखद घटनांनंतरही सुराज्य स्थापन केले.
उत्तानपाद राजाचा पुत्र छोटा ध्रुव! सावत्र आई-सुरुचीने वडलांच्या मांडीवरून खाली खेचले.. नंतर विष्णूच्या शोधात जाऊन तपश्चर्या केली त्याला प्रसन्न करून घेतले त्यामुळे अढळ असे ध्रुवपद त्याला प्राप्त झाले.
हिरण्यकश्यपुचा पुत्र बाळ प्रल्हाद.. वडलांचे राक्षसी संस्कार त्याने घेतले नाहीत तर नागकन्या व त्याची माता कयाधुकडून सुसंस्कार आत्मसात केले. तोसुद्धा महान विष्णुभक्त झाला.
या विविध व्यक्तिमत्त्वांबद्दल चिंतन करण्याचा हेतू हाच की पूर्वसुकृताबरोबर संस्कारदेखील फार महत्त्वाचे आहेत. केव्हा केव्हा मनात विचार येतो की या पूर्वसुकृतामुळे तशी चांगली किंवा वाईट संगती मिळते का? की प्रत्येकाने सद्सद्विवेक बुद्धी वापरून आपल्या जीवनाची दिशा ठरवायची? उत्तर सापडत नाही. आणखी सखोल चिंतन व साधना केल्यावर कदाचित उत्तरे मिळतील.
एक उदाहरण रामायणातले- महर्षी नारद वाल्या कोळ्याला ज्ञान देतात… तो महर्षी वाल्मिकी बनतो. अगदी जवळजवळ तशीच घटना भगवान बुद्धांच्या जीवनात आहे. पूर्वाश्रमीचा राजपुत्र सिद्धार्थ- समाजातील दुःख, वार्धक्य, रोग, मृत्यू बघून राज्यत्याग करून शांतीच्या शोधार्थ जातो. ध्यानावस्थेत सिद्धार्थाला सुख-शांती कशात आहे, ती कशी मिळवायची याचे ज्ञान होते व तो बुद्ध होतो. अवतार मीमांसेप्रमाणे कृष्णानंतर बुद्धावतारच भारतात मानला जातो.
जंगलातील आश्रमात राहून अनेक व्यक्तींची जीवने परिवर्तित होतात. बुद्धसंघ निर्माण होतो. एवढा त्याग करूनही त्याला राजघराण्यातील व शेजारील राज्यातल्या लोकांकडून त्रास होतो. पण बुद्धाच्या सद्भावनेमुळे त्यांच्यातही बदल घडून येतो. एक दिवस बुद्ध आपल्या शिष्यांसोबत शेजारच्या गावात जाण्यास निघतात. तो रस्ता जंगलातून जात असतो. तिथे अंगुलिमल नावाचा एक भिल्ल राजा असतो. तो तिकडून जाणार्या वाटसरूंना लुटतो व त्यांची बोटे कापून त्याची माळ करतो. ती माळ तो त्याच्या जंगली देवीला प्रसन्न करण्यासाठी वापरतो कारण त्याला सिद्धी प्राप्त होतील असे त्याला कुणीतरी सांगितले होते. त्यामुळे गावातील लोक त्या रस्त्याने जाणे सोडून देतात.
बुद्धांना त्यांच्या शिष्यांनी असे सांगितले. पण बुद्ध म्हणाले की त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही. भयापासून मुक्त झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. ते म्हणाले की ते त्याच रस्त्याने जातील. त्यांना भयानक परिणामांची जाणीव होती. म्हणून शिष्यांना त्यांनी त्यांच्याबरोबर जाण्याची शक्ती केली नाही. बुद्ध जंगलात शिरले. थोड्या वेळाने अंगुलीमलने त्यांना पकडले. त्यांना आपली पद्धत सांगितली. बुद्धांनी त्याला सांगितले की आपली बोटे कापून त्याला सिद्धी प्राप्त होणार असतील व सुख-शांती मिळणार असेल तर त्यांची काही हरकत नाही. पण त्यामुळे त्याचा जीवनविकास होणार नाही. त्या विचारहीन भिल्लाला हे मोठे शब्द काय कळणार? आजच्या तथाकथित शिकलेल्यांनाच तर कळत नाही.
दोघांची फार चर्चा झाली. अंगुलीमलालादेखील वाटले की ही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण इतर लोक भीतीने कापत होते तर बुद्ध शांत राहून बोलत होते.
शेवटी अंगुलीमलला बुद्धांचे म्हणणे पटले. त्याने बुद्धांचे पाय पकडले व त्यांना सांगितले की त्याला आपल्या दुष्ट, स्वार्थी कृतीबद्दल पश्चात्ताप होत आहे, त्याला मुक्तीचा मार्ग सांगावा. अशा तर्हेने अंगुलीमल त्यांचा शिष्य झाला. त्याला त्यांनी अहिंसक नाव दिले.
गावात ही बातमी पसरली. सर्वांना आश्चर्यच वाटले. अहिंसक आश्रमात भिक्षू बनून राहू लागला. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे अहिंसक गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. तिथे लोकांनी त्यांना ओळखले. त्या सर्वांचा त्याच्यावर राग होताच. त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. पण अहिंसक तो मार मुकाट्याने सहन करू लागला. त्याचे शरीर रक्तबंबाळ झाले तरी लोक त्याला मारतच होते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की एवढा दुष्ट माणूस बदलू शकतो म्हणून!
तेवढ्यात तिथे एक वयस्कर स्त्री आली नि तिने लोकांना सांगितले की अहिंसक आता खरेच बदलला असून तो बुद्धांचा शिष्य झाला आहे. नंतर तिने एका घटनेबद्दल त्यांना सांगितले. ‘‘मी एका गरोदर बाईला घेऊन बैलगाडीने एका गावाहून दुसर्या गावाला जात होते. तेव्हा वाटेतच तिला प्रसूती वेदना व्हायला लागल्या. तिच्या वेदना वाढतच होत्या पण ती बाळंत होत नव्हती. मी व बैलगाडी चालक दोघेही असहाय्य होऊन भगवंताची प्रार्थना करीत होतो. तेवढ्यात तिथे अहिंसक आला. त्या बाईची स्थिती पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तोसुद्धा प्रार्थना करू लागला. पण काही प्रगती होईना. आम्हाला वाटले की कदाचित ती बाई मरेल.
तेवढ्यात अहिंसक म्हणाला, ‘थांबा, मी लगेच बुद्धांकडे जाऊन येतो. ते आम्हाला काहीतरी मार्ग दाखवतील. अहिंसक बुद्धांकडे जातो. त्यांना सर्व परिस्थिती सांगतो. बुद्ध शांतपणे ऐकून घेतात व त्याला एक उपाय सांगतात – ‘‘तिथे जाऊन अहिंसकने असे म्हणायचे– ‘मी आजपर्यंत अनेक लोकांवर अत्याचार केले ते स्वार्थ व अज्ञानामुळे केले आहेत. पण आता मला माझ्या कुकर्माचा पश्चात्ताप होतो आहे. आता परत मी त्या वाईट मार्गाने जाणार नाही. ही माझी आंतरिक इच्छा आहे. हे जर खरे असेल तर आणि हे भगवंता त्या बिचार्या बाईला वेदनांपासून मुक्त कर व तिच्या मुलाला सुखरूप ठेव व या जगात जन्म घेऊ दे’’.
ती बाई पुढे सांगते, ‘आणि काय चमत्कार! थोड्याच वेळात ती बाई सुखरूपपणे प्रसूत झाली व बाळही सुखरूप होते. आता तुम्हीच ठरवा- अहिंसक बदलला आहे की नाही ते…’’
गावकर्यांना ते पटले. त्यांनी लाठ्या खाली टाकल्या. अहिंसकाची क्षमा मागितली. पण अहिंसक शांतपणे म्हणाला, ‘माझ्या अघोर पापांमुळे मला ही शिक्षा भगवंताने दिली आहे. तुमची काही चूक नाही. तुम्ही निमित्तमात्र आहात’.
अशा तर्हेने विविध गोष्टी अभ्यासण्यामागे विविध हेतू असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘उत्तम संस्कार’, चांगले विचार व तेही नित्य-नेहमी. त्याकरिताच स्वाध्याय आवश्यक आहे.
कठोपनिषदातील श्लोकानुसार रथाचा(शरीर) मालक आत्मा आहे. बुद्धीरूपी सारथी जेव्हा त्याला चांगला मार्ग दाखवते तेव्हा त्याला आत्मज्ञान होते. अनेक वेळा तो बदलू शकतो. कोण केव्हा बदलेल हे कुणीही सांगू शकत नाही. कोण रावण-दुर्योधन असतील नि कोण अंगुलीमल असेल हे सांगू शकत नाही. पण प्रयत्न चालूच ठेवायला हवेत. शास्त्रशुद्ध योगमार्गाच्या सर्व पैलूंचा अभ्यास योगसाधकाने करावयास हवा. या साधनेमुळे स्वतःला तर फायदा होईलच पण समाजालाही अत्यंत उपयुक्त ठरेल ते. आजच्या काळाची ही गरज आहे!!