प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर : लसीकरण

0
181

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

मध्येच इबोलाची त्सुनामी आली. त्याकरता एक आठवडा आपल्याला थांबावे लागले. राजधानी एक्सप्रेस रेलगाडी धावत असेल तर इतर गाड्या बाजूला सारल्या जातात त्यासारखीच ही गोष्ट!

तर लसीकरणाविषयी बीसीजी, पोलिओ, डीपीटी यातील ‘डीपीटी’ची लस याबद्दल आम्ही जाणून घेतले. आता सुरुवात आम्ही डी… पासून करू. डी.पी.टी.तील ‘‘डी’’ म्हणजे ‘‘डिफ्तेरिया’’ म्हणजेच ‘‘घटसर्प’’. कोकणीमध्ये आम्ही त्याला ‘कोटेल’ म्हणतो. तो जंतू म्हणजे सी. डिफ्तेरि – भयंकर विषाणू ज्याने घशाला संसर्ग होऊन घशावर, टॉन्सिल्सवर लवचीक पदार्थ साचला जातो व त्या रोगात मूल दगावण्याचा धोका जास्त असतो.
‘‘पी’’ म्हणजे ‘‘परट्यूसिस’’ – ‘‘हुपिंग कफ’’. हूपचा खोकला, कोल्हे खोकला(डांग्या खोकला). या रोगाचा संसर्ग झाल्यावर रोगी कोल्ह्याप्रमाणे ‘‘कुई’’सारखा आवाज काढत खोकायला लागतो. या रोगात मुलांची छाती भरून येते. न्यूमोनिया होऊन मूल दगावण्याचा धोका जास्त असतो.
‘‘टी’’ म्हणजे ‘‘टिटॅनस’’- ‘धनुर्वात’. हा महाभयंकर रोग म्हणून चर्चिला गेला. तुम्हाला माहीत असेल सटवाई आई ही एका मुलाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी मुलाला न्यायला यायची. सगळी घरातील लोकं त्या रात्री जागवायची. दरवाजावर आडवी झोपायची. डबे, ढोल वाजवायची.
खरे म्हणजे या अंधश्रद्धेमागे खोच होती. त्या काळात गरोदर बायका आपल्या घरातच बाळंत व्हायच्या. गावातील सुईण बाई घरी यायची. घरातील एक खोली सारवायची, साफ करायची, मग सगळे बाळंतपण घराच्या त्या खोलीतच उरकायची. मुलाची नाळ कुठल्याही धारदार वस्तूने कापायची. एकेकदा ठेचायची. त्याने मुलांना धनुर्वात व्हायचा व सात दिवसांच्या आत मूल मरायचे.
आज धनुर्वातावर टीटी या लसीचे गरोदर बाईला एक किंवा दोन इंजेक्शने देतात. दुसरे बाळंतपण पहिल्यानंतर दोन वर्षांच्या अगोदर आले तर एकच इंजेक्शन नाहीतर दोन.
मूल जन्मल्याबरोबर दीड महिना त्याच्या रक्तात आईच्या रक्तातील अँटीबॉडीज आलेल्या असतात. तेव्हा डीपीटीचे पहिले इन्जेक्शन मुलांना दीड महिन्यावर, दुसरे व तिसरे दर ४ ते ६ आठवड्यानंतर म्हणजे सगळी तीन इन्जेक्शन. मग दीड वर्षानंतर डीपीटीचे बुस्टर डोस व त्यानंतर पाचव्या वर्षी डीटीचा बुस्टर डोस. बुस्टरचा डोस नेहमी रोगाविषयी रक्तात तयार झालेल्या प्रतिकारशक्तीची तीव्रता तशीच ठेवण्याकरता असतो.
मुलांना १० वर्षानंतर मूल जेव्हा पाचवीत असते तेव्हा टीटीचे इन्जेक्शन देता येते. मग १५ वर्षांनंतर १० वीत असल्यावेळी. त्यांच्या मधल्या काळात या लसीकरणाची गरज नाही. लसीकरण हे फक्त मुलांमध्येच विचारात घेतलेले आहे. आम्ही वैद्यकीय क्षेत्रातले लोक अंधश्रद्धेविषयी बोलणार नाही.
धनुर्वाताचा जंतू म्हणजे सी. टिटॅनी- हा जखमांमधून आपल्या शरीरात प्रवेश करतो. तो जंतू मातीत असतो… धुळीत असतो. हा जंतू शरीरात ‘टिटॅनो स्पाझमिन’ नावाचे विष निर्माण करतो व हे विष मज्जातंतूंवर हल्ला करते. रोगी लवकरच दगावू शकतो. डीपीटीच्या लसीकरणाने मरणाचे प्रमाण खालील टक्केवारीने कमी झाले…
घटसर्प – ९५% ; हुपिंग कफ – ८० ते ८५% आणि धनुर्वात – १००%.
पूर्वी अमेरिकेत वर्षाकाठी धनुर्वाताच्या ५८० केसेस दिसायच्या. त्यातल्या ४७२ दगावत असत. आज लसीकरणानंतर वर्षाकाठी फक्त ४१ रोगी सापडतात व त्यातले ४ दगावतात.
कोल्हेखोकला हा रोग संसर्गजन्य आहे. त्याला ‘‘शंभर दिवसांचा खोकला’’ असेही म्हटले जाते.
दर वर्षी लसीकरणाअगोदर या रोगाने जगभर ४८.५ लाख रोगी सापडायचे व त्यातले तीन लाख मरायचे. १९९० साली तो आकडा एक लाख ६७००० वर पोहोचला तर २०१० मध्ये ८१००० रोगी दगावले. १९१२ साली अमेरिकेत सोळा राज्यात या रोगाचा प्रसार झाला. वॉशिंग्टन, विरमॉंट, विनकॉनसीन या राज्यात रोगी. कारण कोणते?…
ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना या रोगाविषयीची लस घेण्यास अटकाव केला त्यांनाच हा रोग झाला. आज परत एकदा लसीकरण मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे व हा रोग तेथे आटोक्यात आलेला आहे.
त्यानंतर आपण विचार करणार आहोत- ‘‘गोवर (मिझल्स)’’ या रोगावरील लसीकरणाविषयी. ही लस लहान मुलांना इन्जेक्शनद्वारे देण्यात येते. पहिला डोस नऊ महिन्यावर देण्यात येतो तर सव्वा वर्षावर ‘एम.एम.आर.’चा डोस दिला जातो. ०.५ सीसी याप्रमाणे त्वचेखाली डोस दिला जातो.
गोवर या लसीचा शोध १९६३ साली लावण्यात आला व १९६८ साली लस तयार झाली. एम.एम.आर.ची लस १९६७-६९ या दरम्यान तयार झाली व मुलांना ही लस १९७१ सालापासून देण्यात आली.
गोवर’लाही लोक मग देवीच मानायचे. कांजण्यासारखेच दोन्ही रोग व्हायरसमुळेच होतात. खूपच संसर्गजन्य रोग आहे हा. गावातील सगळी मुले आजारी पडायची. न्यूमोनियाने रोगी मुले दगावायची. आज लसीकरणामुळे मरणार्‍यांची संख्या खूपच कमी झालेली आहे.
लसीकरण केल्यावरही मुलांना ‘‘गोवर’’ होतो?
हो..! लसीकरण केल्यावरही हा आजार मुलांना होऊ शकतो कारण गोवर या रोगाचे जंतू तीन ते चार प्रकारात मोडतात. एकाच प्रकारावर लस उपलब्ध आहे, बाकीच्यांची नाही. तेव्हा वेगळ्या प्रकारचे गोवरचे जंतू जर शरीरात प्रवेश करते झाले तर मुलांना गोवरचा आजार होऊ शकतो. पण लसीकरण केलेल्या मुलांना कमी प्रमाणात पुरळ उठतो. तापाचे प्रमाण पण कमीच असते.
अमेरिकेत गोवर २००० सालापासून नेस्तनाबूद झाला. तरीही भारतात २००५ साली गोवरचे रोगी सापडले. ज्या मुलांना त्यांच्या पालकांनी लसीकरण करविले नव्हते त्यांच्यातच हे रोगी सापडले.
आज लसीकरणात भर पडलीय ती दोन लसींची-
१. हिपॅटायटीस-बी आणि २. जापनीज एन्सेफेलायटीस (मेंदूज्वर).
१) हिपॅटायटीस-बी ची लस १९८१ पासून तयार झाली. या दोन सालात भारत सरकारने आपल्या या लसीकरण कार्यक्रमात या लसीचा अंतर्भाव केला.
या लसीचे तीन डोस एक महिन्याच्या अंतराने दिले जातात. हे डोस डिपीटीबरोबर दीड-अडीच-साडेतीन महिन्यावर बालकाला दिले जातात. या लसीमुळे २५ वर्षापर्यंत मुलाला प्रतिकारशक्ती मिळते.
या लसीमुळे मुलामध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाले आहे.
२) मेंदूज्वर ची लस अमेरिका, ऑस्टे्रलिया व युरोप राष्ट्रांत २००९ सालापासून देण्यात येते. ही लस इन्जेक्शनद्वारे ९ व्या व १८ व्या महिन्यात देण्यात येते.
हा लसीकरणाचा कार्यक्रम ठरला. मुलांना लसीकरणाबरोबर व्हिटामिन ‘अ’चे डोस देण्यात येतात.
मंडळी, तुमच्या मुलांना देण्यात येणार्‍या प्रत्येक लसीविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या लसीमुळे कोणत्या रोगांपासून तुमचे मूल मुक्त राहू शकते ते जाणा- व माझ्यावर तेवढे तरी उपकार कराच! काळजी घ्या!
……………….