आणखी काहींना निलंबित करणार : जॉन
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जे पक्ष स्वच्छ करण्याचे व तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटित करून पक्ष बांधण्याचे काम आपल्यावर सोपवले ते चालू असून शिस्तभंगाच्या कारवाईखाली आणखी काहींना पक्षांतून निलंबित करणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सर्व गट समित्या बरखास्त करून फेररचना करण्याची त्यांनी घोषणा केली.
आपली प्रदेश अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली असती तर त्याची माहिती आपल्याला मिळाली असती. पक्षश्रेष्ठींची इच्छा असेपर्यंत आपण या पदावर राहून काम करणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. शिस्तभंग करणार्यांवर कारवाई करू नये म्हणून आपल्यावर दबाव असता तर कारवाई केलीच नसती, असेही ते म्हणाले.
काल कॉंग्रेसभवनमध्ये घेतलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरू यांचा विधानसभा परिसरात पुतळा उभारण्याची मागणी करणारा ठराव संमत केला आहे. सरकारला यासंबंधीचे निवेदन सादर करतानाच सभापतींनाही पत्र देणार असल्याचे फर्नांडिस यांनी संागितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत नगरनियोजन खात्यासह सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार असल्याचे स्पष्ट केले आहे. भ्रष्टाचार निपटून काढणे ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्यास ते अपयशी ठरल्याने सरकारच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी फर्नांडिस यांनी केली. राज्यपालांनाही निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.