भेसळयुक्त मिठाईवाले, फळविक्रेत्यांविरोधात धाडसत्र
मधुमेह, कर्करोग, हृदयविकार या रोगांचे राज्यातील वाढते प्रमाण लक्षात घेऊनच तसेच भेसळयुक्त मिठाई व रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे ग्राहकांनी खाऊ नये यासाठीच सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने वरील प्रकाराविरुध्द मोहीम सुरू केली आहे. तसेच या माध्यमातून जनतेला सावध करणे व आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करणे हा धाडसत्रामागील प्रमुख हेतू असल्याचे वरील खात्याचे संचालक सलीम वेलजी यांनी सांगितले.
राज्यात प्रत्येक सणाच्यावेळी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई व रसायनांचा वापर करून पिकविलेली फळे बाजारात आणली जातात. सर्वसामान्य ग्राहकांना त्याचे ज्ञान नसते. भडक रंग वापरून तयार केलेली मिठाई, खाजे, ग्राहकांना आकर्षित करते. प्रशासनाच्या या जागृती व दंडात्मक कारवाई करण्याच्या मोहिमेमुळे राज्यातील अनेक लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे, असे वेलजी म्हणाले.
प्रशासनाने गेल्या आठ दहा दिवसांपासून हजारो रुपये किमतीची मिठाई जप्त करून ती नष्ट करून टाकल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या किनारी भागासह, फोंडा, पणजी, म्हापसा, मडगाव, वास्को, सावर्डे या सर्वच भागात प्रशासनाने अधिकार्यांची पथके पाठविली आहेत. फोंडा व म्हापसा येथे फळांची प्रमुख यार्डे असल्याने तेथे रसायनाचा वापर करून फळे पिकविण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे अशा यार्डांवरील प्रकारांची माहिती मिळविण्यासाठी खास खबर्यांनाही तैनात केले आहेत. त्यामुळे कोणत्याहीक्षणी रसायनाचा वापर करून पिकविलेली फळे ताब्यात घेतली जातील, असे सांगण्यात आले.
ग्राहकांनी भडक रंग असलेली मिठाई खरेदी करताना अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन वेलजी यांनी केले आहे. जिलेबीत मोठ्या प्रमाणात ङ्गएलमम या रसायनाचा वापर करण्याचे प्रकार चालू आहेत. एलम या रसायनाचा अशा कारणासाठी वापर करण्यास बंदी आहे. जिलेबीत या प्रकाराचा वापर केला आहे की नाही, हे सामान्य ग्राहकांना कळणे कठीण होते. त्याची तपासणी करण्यासाठी पदार्थ प्रयोग शाळेतच पाठवावा लागतो, असे वेलजी यांनी सांगितले.