सिमेवरील २२ चौक्यांवर  पाकचा गोळीबार

0
82

१३ गावांनाही केले लक्ष्य; दोन मृत्यूमुखी
पाकिस्तानी लष्कराने काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सिमेवरील २२ चौक्यांवर व १३ गावांच्या दिशेने बेधुंद गोळीबार आणि रॉकेटचा मारा केला. यात दोन ग्रामस्थ मृत्युमुखी पडले तर एका बीएसएङ्ग जवानासह अन्य सहा जण जखमी झाले आहेत. लष्कराने गावातील सुमारे ३ हजार लोकांना गाव खाली करून सुरक्षित स्थळी हलवले आहे.
परवा मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सुरू करण्यात आलेल्या या गोळीबाराचे तितक्याच उत्कटपणे सिमा सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्यूत्तर दिले. गोळीबार सकाळी ७ वा. पर्यंत चालू होता. गेल्या पंधरवड्यात पाकिस्तानकडून १६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.
दरम्यान, २००३ शस्त्रसंधी कराराच्या सातत्याने होत असलेल्या उल्लंघनाची भारताने गंभीर दखल घेतली असून लष्कराला त्याबाबत अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, सिमेवर पहारा देणार्‍या जवानांना भारत-पाक सिमेनजीक एक भूसुरूंग आढळून आला. दहशतवादी व इतरांना घुसखोरीसाठी तो वापरला जात असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
लष्कराकडून संयुक्त बैठकीची मागणी
दरम्यान, सिमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या लष्कराने काल दोन्ही देशांच्या लष्करी कारवायासंबंधी सरसंचालकांच्या बैठकीची भारताकडे मागणी केली.