– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
रामभाऊ नेहमीप्रमाणे लांब टांगा टाकत बाजाराला चालले होते. स्वत:शीच पुटपुटत, काहीसे वैतागलेले, हातातल्या सामानाच्या यादीकडे नजर टाकत होते. घरात सगळी मंडळी तापाने फणफणत होती. काही खोकत होती तर काहींचे डोके ठणकत होते. रामभाऊंचेही सर्वांग दुखायला लागले होते. तापाची चाहुल लागली होती.
‘‘बरं झालं सदाभाऊनी सांगितलं म्हणून नाहीतर या उपायाविषयी मला समजलंच नसतं!’’ रामभाऊ स्वत:शीच पुटपुटत होते. समोर काकासाहेब दत्त म्हणून ठाकले काय समजले नसते? अहो, काय झाले… रामभाऊनी काकासाहेबांना कथानक सांगायला सुरूवात केली. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे कट्ट्यावर जमलेले. चर्चा सुरू झाली. सदाभाऊनी बरोबर अंग्रेजी पेपर आणला होता. सकाळी पेपर वाचताना जर एखादी चांगली चर्वण करण्यासाठी बातमी असेल तर ते येताना तो पेपर किंवा कात्रण आणायचे आणि मग कट्ट्यावर चर्चा रंगायची.
कालची बातमी अशी होती – चिकन खाणार्या माणसांनी सावध राहावे. त्यांच्या रक्तात अँटिबायोटिक्सची इम्युनिटी तयार होते आहे. त्याचा अर्थ सदाभाऊनी समजाविला तो असा आहे. पॉल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना अँटिबायोटिक्सचा डोस मोठ्या प्रमाणात दिला जातो. ते त्या कोंबड्या खाणार्या माणसांच्या रक्तातही औषधे जातात. तेव्हा पुढे – मागे जर त्यांना काही आजार झाले तर ती औषधे त्यांना लागू पडणार नाही.
नेमके हेच गमक रामभाऊनी पकडले. तेथून सगळी आजारी पडलेली. पहिल्यांदा ते फार्मसीमध्ये गेले. तेथून तापाच्या गोळ्या व खोकल्याचे झांडूचे औषध घेऊन आले. ह्या डॉक्टरांची ऍलोपॅथिक औषधे घेऊन बेजार आलाय. त्यांनी तोंड फुलते. जेवण घशाखाली जात नाही. केव्हा केव्हा शौचास एवढे साफ होते की जीव घामाघूम होऊन जातो. शौचास न होणार्यांनी डॉक्टरांकडे जावे व अँटिबायोटिक्स घ्यावी म्हणजे शौचास साफ – पाटणकर काढा घ्यायची बिलकुल गरज नाही. तेव्हा झांडूंचे औषध व तापावरच्या गोळ्या घरी पोहचवून आले.
आता जो प्रयोग सदाभाऊनी यशस्वीरित्या आपल्या घरात केला तोच रामभाऊनी आपल्या घरी करायचे ठरवले. रामबाण व जालिम उपाय होता तो. म्हणजे डॉक्टरांकडे जायची गरज भासणार नव्हती. त्यांच्या भरमसाठ फीची बचत. वर सांगतो ना, सध्या श्रावण सुरू झालाच आहे. सगळे लोक महिनाभर भाज्याच खाणार. बरे झाले आपल्याला मुबलक प्रमाणात चांगले व स्वस्त चिकन मिळणार. आम्हांला श्रावणात ते चालते. तेव्हा आज घरी बेत चिकनचा व आजच नव्हे तर आजपासून चार दिवस घरात फक्त चिकनचेच प्रकार! त्याकरता सौ. कडून यादीच बनवून घेतली आहे. रोजचा मेन्यू पण ठरवून टाकलाय. चार दिवसांत चार वेगवेगळ्या चिकनच्या डिशेस… त्यावर चिकनचे सूप सर्वांनी घ्यायचे.
काकासाहेबांना याचा काहीच बोध लागला नाही. डोके खाजवूनदेखील डोक्यात प्रकाश काही पडला नाही. रामभाऊना विच्चारावेच लागले. ‘‘काय हो राव, समजलं नाही!’’ ‘‘मला वाटलंच होतं, तुम्हांला ते समजणारच नाही. तुम्हांला काय पुष्कळजणांना ते समजलं नाही. डोक्यात नुसते बटाटे भरलेत!’’ रामभाऊ पुढचे म्हणून मोकळे झाले.
‘‘हे बघा काकासाहेब, जर कोंबड्यात अँटिबायोटिक्स तर मग चिकन खाल्ल्यावर ती आमच्या रक्तात शिरतात मग वेगळी अँटिबायोटिक्स घ्यायची गरजच काय? सर्व पेशंटांनी चिकन खायचे अगदी डोसप्रमाणे… भरपूर प्रमाणात म्हणजे चिकन पोटात, आजार दूर! डॉक्टरांची गरजच ती काय?’’
कुणास ठाऊक काकासाहेबांना हे समजून घ्यायला थोडाफार उशीर झालाय. रामभाऊनी यावर किती पैसे वाचवले असणार याचे गणित करायचा प्रयत्न करत ते घरी रवाना झाले. यदा कदाचित तापाने काकासाहेबांच्या घरी एंट्री घेण्याचा प्रयत्न केला तर ते यादी व हत्यारे घेऊन तयार आहेत. तुम्हीही आहात ना!
वाचकहो, उपाय काहीही असो, चिकनच्या खमंग वासाने व प्रोटिनयुक्त खाण्याने रामभाऊच्या घरातील सगळे रोगी ठणठणीत झाले. थोडाफार खोकला आहे… पण तो झांडू निपटून घेईल असे रामभाऊ म्हणत होते.
महिन्यापूर्वी कट्ट्यावर खमंगदार चर्चा घडली होती – सदाभाऊच्या तोंडून ऐकायला मिळाली. बातमी अशी होती – भारत सरकारच्या पाहणीनुसार असे आढळून आले आहे की – चिकन खाल्यामुळे मुलींना मासिकपाळी लवकर यायला लागली आहे. एरवी १२-१३ व्या वर्षी मासिकपाळी सुरू होत होती. ती आता ९ वर्षांवर येते. मेनोपॉज जो ४५-५० वर यायचा तो पस्तीशीत दिसू लागलाय. यावर मोठ्या प्रमाणात काथ्याकूट चालू आहे, असे सदाभाऊच म्हणाले. पॉल्ट्रीमध्ये चांगल्या मांसाच्या कोंबड्या बनवणे चालू आहे. त्याकरता त्यांना हार्मोन्स दिले जाते. हे हार्मोन्स चिकनबरोबर मुलीच्या, बायकांच्या रक्तात जाते. त्यांच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागलेत. तेव्हा बायकांनी चिकन खायचे सोडलेय!
हे ऐकून गजूअण्णाचे डोके भणभणायला लागले. कालपासून त्याचेही रक्त सळसळत होते. उड्या मारायला लागले होते. काहीतरी वेगळे घडत होते. सुंदर स्त्री समोर आली की जीव घामाघूम होत होता. कपाळावर घाम ओथंबून जायचा. हृदय नुसते धडधडत होते. काहीतरी नक्की होत होते. पण काय याचा थांगपत्ता लागत नव्हता. सदाभाऊच्या बोलण्याने चिकन हा विषय डोक्यात भिनला गेला होता. त्यालाही वेगळे कारण होते.
श्रावण सुरू होण्याअगोदर सौ. म्हणाली चिकन खाऊ. शेजार्यांकडे चांगला गावरान कोंबडा होता. बिचार्या कोंबड्यांची बोंबाबोंब चाललेली असायची. सगळ्या कोंबड्यांचा हाच एकटा कृष्ण होता. सौंनी शेजारणीकडे चौकशी करून सौदाही करून टाकला होता. श्रावण सुरू व्हायच्या अगोदर चार दिवस घरात खमंगदार चिकनचा बेत पार पडला होता.
गजुअण्णाची ट्युबलाइट पेटली. हो, अगदी त्याच्या दुसर्या दिवसापासून गजुअण्णाच्या काळजात धडधडायला लागले होते. त्यांनी त्या गावरान कोंबड्याचे काळीज भाजून खाल्ले होते. आता अण्णाची खैरियत नव्हती. त्याच्या रक्तात गावरान कोंबड्याचे रक्त खेळत होते. अण्णाच्या डोळ्यासमोर – तो कोंबडा इतर कोंबड्या मागे धावत असल्याची चित्रे दिसत होती. गजुअण्णांनी डोक्यावर हात ठेवून चक्क जमिनीवर बसकण मारली – घरामागे कोंबड्याने बांग दिली!
…………