योगगुरू बीकेएस अय्यंगर यांचे निधन

0
161

जागतिक कीर्तीचे योग गुरू आणि ‘अय्यंगर स्कूल ऑफ योगा’चे संस्थापक बीकेएस अय्यंगर यांचे काल सकाळी पुण्यातील इस्पितळात अल्प आजारानंतर निधन झाले.
९६ वर्षीय अय्यंगर यांना आठवडाभरापूर्वी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. बुधवारी पहाटे ३.१५ वा. त्यांची प्राणज्योत मालवली. भारत सरकारने त्यांना पद्मविभुषण किताब देऊन गौरविले होते. त्यांच्या पश्‍चात पूत्र व कन्या असा परिवार आहे.
अय्यंगर हे जगातील सुरुवातीच्या अवघ्याच योग शिक्षकांपैकी एक गणले जातात. त्यांनी योगविषयक अनेक पुस्तकांचे लेखनही केले आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगगुरू रामदेव बाबा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दु:ख व्यक्त केले. चीनमध्ये अय्यंगर यांचे अनेक अनुयायी आहेत. तेथूनही मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजल अर्पण करण्यात आली. काल दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१९१८ साली बेलूर – कर्नाटक येथे जन्मलेले अय्यंगर १९३७ साली पुण्यात आले. तेथे त्यांनी योग प्रसार सुरू केला.१९७५ ताली ‘योगविद्या’ संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेच्या देशात तसेच विदेशात शाखा आहेत. अय्यंगर यांनी अनेक प्रख्यात व्यक्तींना योग प्रशिक्षण दिले आहे. यात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, तत्वज्ज्ञ जे. कृष्णमूर्ती, जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक यहुदी मेनुहीन यांचा समावेश आहे.
त्यांनी योगविषयक १४ पुस्तकांचे लेखन केले. ‘अय्यंगर योग’ विषयीची ही पुस्तके १७ भाषांत अनुवादीत झाली आहेत. चैत्यन्यपूर्ण वक्तिमत्त्व असलेले अय्यंगर यांना कला, नृत्य, रंगभूमी, क्रिकेट अशा विषयांतही रस होता.