– प्रा. रमेश सप्रे
सर्व संतसत्पुरुषांचं एकमुखी सांगणं आहे – ‘आम्ही वागतो त्याप्रमाणे वागू नका. आम्ही जगतो त्याप्रमाणे जगू नका. आम्ही सांगतो (उपदेश करतो) त्याप्रमाणे वागा नि जगा’. किती खरंय हे! ज्ञानोेबा-तुकोबा, एकनाथ-रामदास, शिर्डीचे साईबाबा-अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज-गोंदवल्याचे श्रीब्रह्मचैतन्य महाराज, मिराबाई-जनाबाई यांसारख्या साधुसंतांसारखं जगणं सामान्य प्रापंचिकांना शक्य तरी आहे का? एकवेळ वेशभूषा-केशभूषा जमू शकेल, भस्माचे पट्टे, रुद्राक्षाच्या माळा, भगवी वस्त्रं, दंड-कमंडलू हे सारं जमू शकेल पण या महान संतांसारखी दृष्टी-वृत्ती-कृती जमू शकेल काय? हजारो-लाखो लोकातल्या एखाद्या खर्या संतांचे गुण व जीवनपद्धती यांचं अनुसरण आपल्या जीवनात जमू शकेल पण मग तो स्वतः संतच बनेल.
पण सार्या संतांनी सर्वांना जो उपदेश केला त्याचं जीवनात अनुसरण करणं मात्र अनेकांना जमू शकेल. अशा साधकांना संतांच्या शिकवणुकीचा लाभ तर होईलच पण त्यांच्या जीवनापासून योग्य ती प्रेरणाही मिळेल.
गीतेत भगवंतांनी जे समुपदेशन केलंय त्याप्रमाणे जगणं आपल्याला जमलं अन् तशी जीवनशैली आपण बनवली तर आपल्यालाही शांती – समाधान – आनंद यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. कोणत्याही खर्या संतानं कधीही अतिरेकी, एका टोकाचा उपदेश केलेला नाही. ‘सर्व संसार सोडून रानावनात जा’ असं कोणीही शिकवलं नाही. उलट ‘आधी प्रपंच करावा नेटका| मग परमार्थ विवेका॥ असाच उपदेश सर्वांनी केला. समर्थ रामदासांनी पहिला दासबोध (एकवीस समासी) लिहिला त्यात अशा सर्व त्याग करून घ्यावयाच्या संन्यासाचं वर्णन आहे. श्रीरामकृष्ण परमहंसही ‘पूर्वेकडे जायचं असेल तर पश्चिमेकडे पाठच फिरवावी लागेल’, असं सांगतात. पण असा उपदेश बहुजनांसाठी नसतो तर ज्यांना वैराग्य प्राप्त झालंय, कठोर साधना, उग्र तपश्चर्या ज्यांना करावयाची आहे त्यांच्यासाठी असे कठोर नियम (आचारसंहिता) सांगितलेले आहेत.
एरवी प्रपंच व परमार्थ यांची सांगड घाला. प्रापंचिक कर्तव्यं नि आध्यात्मिक उपासना यांचा समन्वय (सिंथेसिस) करा. यांच्यात (प्रपंच-परमार्थ यांच्यात) संवाद साधा – सेतु बांधा असंच सर्व संतमहापुरुषांनी सांगितलंय.
‘हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा’ असे सांगणारे ज्ञानदेव पुढे लगेच म्हणतात ‘असोनी संसारी जिव्हे वेगु करी’ म्हणजे संसारातही कर्तव्यकर्म करतच रहा पण तो करताना वैतागू – कंटाळू नकोस तर ‘हाती काम – मुखी नाम’ या भावनेनं सारी कर्मं करत रहा. हीच संतवाणी आहे नि असंच समुपदेशन भगवंतांनी गीतेत केलंय. असो.
आपले सोहिरोबा.. त्यांनी ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे’ असं सांगतानाच – ‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ आणि ‘अनुभवावीण मान हालवू नको रे’ हेहि सांगितलंय याचा विसर पडायला नको.
‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे|’ असं सांगून ‘सदासर्वदा नाम मूखी असू दे|’ असं भक्तीचं सोपं नामस्मरण हे साधन सांगणारे समर्थ रामदास तर अनेक ठिकाणी विवेकाचं (ज्ञानाचं) महत्त्व सांगतात. ‘यत्न तो देव जाणावा’ असा कर्मयोग शिकवताना जगाच्या नि जीवनाच्या भयंकर परिस्थितीचं वर्णन करून आग्रहानं सांगतात – ‘प्रसंग हा तुफान रे| प्रयोग प्रयत्न मान रे| अखंड सावधान रे॥ अशा शिकवणुकीला आपण प्रपंचाविरुद्ध, जीवनाला – जीवनातील सुखदुःखांना – तोंड देण्याऐवजी पलायन करायला शिकवणारी असं समजायचं का?
भगवंतानं सुद्धा सदासर्वदा माझं स्मरण कर (तस्मात् सर्वेषु कालेषु माम् अनुस्मर) हे सांगताना ‘युध्य च’ (आणि युद्ध कर) हेही तितकंच ठासून सांगितलं. नाम घेत, टाळ कुटत, टाळ्या वाजवत सतत ‘देव देव’ कर असं सुचवलं सुद्धा नाही. जेव्हा जेव्हा परमार्थाविषयी सांगितलं तेव्हा तेव्हा लगेच प्रपंचासाठी आवश्यक गुण कोणते, जीवनात आनंदी बनण्यासाठी उपाय कोणते हेही सांगितलं.
अर्जुनानं ‘चंचल मन स्थिर कसं करायचं?’ असं विचारल्यावर ‘अभ्यास व वैराग्य’ हाच मन स्थिर करण्याचा मार्ग हे निश्चयपूर्वक सांगितलं. त्याचप्रमाणे ‘सर्वकाळी नामात रहा.. ईश्वर स्मरणात रहा..’ हे सांगून झाल्यावर लगेचच स्पष्ट शब्दात हेही सांगितलं –
‘अभ्यासयोगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना |’
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिंतयन् ॥
गीतेतील अनेक श्लोक अनेकांना निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात. पू. गोंदवलेकर महाराजांना हा श्लोक सर्वांत प्रिय होता. ते गंमतीनं म्हणायचे – ‘भगवंताच्या (श्रीविष्णूच्या) आठव्या अवतारानं सांगितलेल्या गीतेच्या आठव्या अध्यायातील आठवा श्लोक आठवा. हे सांगताना श्रीमहाराजांना केवळ शब्दांचा खेळ करायचा नव्हता. तर खरंच त्यांना हा श्लोक खूप आवडत असे. त्यांचं एकूण चरित्र व कार्य नीट पाहिल्यास त्यांचा अभ्यास व चिंतनावर नामस्मरणाइतकाच भर होता हे सहज ध्यानात येईल.
या श्लोकाच्या आरंभी ‘अभ्यास’ व अखेरीस ‘चिंतन’ हे शब्द आले आहेत. एका अर्थानं ‘अभ्यास’ व ‘चिंतन’ यांच्या संपुटात हा श्लोक आलाय. दोन हात जोडून झालेल्या ओंजळीला (अंजुली) संपुट असंही म्हणतात. आयुर्विम्याच्या संदेशात जशी दोन हातांच्या संपुटात संथ शांत तेवणारी जीवनज्योती सांभाळलेली असते तशी ‘परम दिव्य पुरुषाची (परमात्म्याची)’ प्राप्ती अभ्यास व चिंतन या दोन साधनात सामावलेली असते. फार अर्थपूर्ण आहे हा श्लोक.
भगवंताला जीवनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं समुपदेशन इथं करायचंय.
१. अभ्यासयोगयुक्तेन ः अभ्यासयोगाच्या माध्यमातून किंवा साह्यानं असा सरळ अर्थ आहे. भगवंतांनी ‘अभ्यासयोग’ हा सर्व जीवनाला व्यापणारा शब्द मुद्दाम वापरलाय. ज्ञानयोग, बुद्धियोग हे याच अर्थाचे शब्द इतर ठिकाणी गीतेत वापरले आहेतच.
पण ‘अभ्यास’ शब्दात ‘अभि’ अन् ‘आस’ असे दोन शब्द येतात. त्यांचा अर्थ चांगल्या शुभ किंवा कल्याणकारी गोष्टीविषयी तळमळ किंवा ध्यास. सर्व ताणतणाव, दुःखंसंकटं, व्याधी, रोग, व्यथावेदना यातून सुटका म्हणजे मुक्ती. म्हणजेच सुख, संतोष, समाधान, आनंद यांची प्राप्ती म्हणजे मुक्ती! हे मानवी जीवनाचं सर्वोपरी (सर्वश्रेष्ठ), अंतिम ध्येय आहे किंवा असलं पाहिजे. त्यासाठी ‘अभ्यास’ हेच महत्त्वाचं साधन आहे हे भगवंताला सांगायचं आहे.
जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ‘अभ्यासाशिवाय काहीही साध्य वा सिद्ध होत नाही. संगीतक्षेत्रात जो अभ्यास ‘रियाज’ म्हणून ओळखला जातो त्याला कुस्तीच्या क्षेत्रात ‘तालीम’ म्हणतात. यालाच खेळात ‘सराव’ म्हणतात तर आध्यात्मिक उपासनेत ‘साधना’ म्हणतात. एकूण कोणत्याही क्षेत्रात महान कामगिरी करण्यासाठी, उच्च कौशल प्राप्त करण्यासाठी ‘अभ्यासा’ला पर्याय नाही.
वैज्ञानिकांचे शोध; कलावंतांच्या कलाकृती; प्रतिभावंत लेखक-कवींच्या रचना; क्रिडापटूंनी केलेले उच्चांक, व्यावसायिकांनी मिळवलेली कौशल्यं(प्रोफेशनल स्किल्स) इ. सर्व साधण्यासाठी अखंड अभ्यास हवा. पण याहिपेक्षा मनःशांती, अक्षय आनंद यांची प्राप्ती करण्यासाठी अभ्यास (तपश्चर्या) हवी. आनंदाशी जोडलं गेल्याशिवाय (खरं तर सत्चित् आनंदाशी, सच्चिदानंदाशी) ‘योग’ सिद्धच होत नाही. म्हणून ज्या अभ्यासातून अतिरेकी स्पर्धा, मत्सर, सत्तासंपत्तीची अभिलाषा निर्माण न होता आनंद, सेवा, प्रेम यांची निर्मिती होते त्यालाच ‘अभ्यासयोग’ म्हटलं जातं. यालाच परमेश्वर किंवा ‘दिव्य परम पुरुषाची’ प्राप्ती असंही म्हणतात. मुक्ती म्हणतात ती हीच!
२. चेतसा न अन्यगामिना ः ‘चेतस्’ म्हणजे बुद्धी, चित्त किंवा आपल्यातील चेतना. ‘न अन्यगामिना’ याचा अर्थ चित्त दुसरीकडे न जाऊ देता अभ्यास करायला हवा. एकाग्रचित्तानं साधना करायला हवी. मनाच्या किंवा बुद्धीच्या एकाग्रतेचं महत्त्व प्रत्येक महामानवाच्या जीवनात दिसून येतं. अर्जुन, एकलव्य हे एकाग्रतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. द्रोणाचार्य, अर्जुन नि इतर राजकुमार अरण्यातून जात असताना एका कुत्र्याच्या भुंकण्यानं सर्वांना त्रास होऊ लागला. कुत्र्याला दूर हाकलून दिल्यानंतर काही वेळानं तेच कुत्रं पुन्हा समोर आलं पण यावेळी त्याच्या तोंडात उभे बाण मारून त्याचं भुंकणं बंद केलं गेलं होतं. रक्ताचा थेंबही आलेला दिसत नव्हता. त्या कुत्र्याला तोंड उघडताही येत नव्हतं नि बंदही करता येत नव्हतं. इतक्या अद्भुत प्रकारानं शरसंधान कुणी केलं होतं? कोण होता तो अद्वितीय धनुर्वीर? जाऊन पाहतात तो एक रानातला भिल्ल युवक गुरू द्रोणांच्या मातीच्या मूर्तीसमोर बसून त्यांच्याकडून म्हणजेच अंतःप्रेरणेनं धनुर्विद्या शिकत होता. आपल्या जवळ कोणी येऊन उभं राहिलंय याचंही भान त्याला नव्हतं. याला म्हणतात मनबुद्धीचित्ताची एकाग्रता (चेतसा न अन्यगामिना).
द्रौपदी स्वयंवरातला तो अतिशय अवघड पण अर्जुनानं जिंकला तो अशा एकाग्रतेतूनच. खालील पाण्यात पाहून वरती उंचीवर वेगानं फिरणार्या मत्स्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा हे खूपच अवघड काम होतं. धनुर्विद्येतील कौशल्य पुरेसं नव्हतं तर हा पण जिंकण्यासाठी हवी होती संपूर्ण एकाग्रता.
अलिकडच्या काळातील महापुरुष स्वामी विवेकानंद चित्ताच्या एकाग्रतेला खूप महत्त्व देत असत. ‘मला पुढचा जन्म असला अन् समजा देवानं मला विचारलं की या जन्मात कोणत्या विषयांचा अभ्यास करायला आवडेल? तर मी ठामपणे सांगेन- फक्त एकाग्रता (कॉंन्संट्रेशन)! ती साधली की कोणताही विषय शिकणं अवघड राहणार नाही.’
३) अनुचिंतयन् ः ‘पुन्हा पुन्हा अखंड चिंतन करणं’ असा अनुचिंतयन् या शब्दाचा साधा अर्थ आहे. नुसतं क्षणभर किंवा तात्कालिक विचार करून चालत नाही. एखादी समस्या सुटेपर्यंत अनेक पद्धतींनी विचार करावा लागतोच पण समस्येचं समाधान झाल्यावरही ती पुन्हा निराळ्या स्वरूपात उद्भवणार नाही यासाठी चिंतन सुरू ठेवावं लागतं. अभ्यास, चित्ताची एकाग्रता व अखंड चिंतन ही परमेश्वर प्राप्तीची म्हणजेच मुक्तीची त्रिसूत्री आहे.
या तीन्ही गोष्टी अर्जुनाच्या जीवनातील काही प्रसंगात दिसून येतात. द्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांना (कौरव-पांडवांना) रोज एक कामगिरी सांगितली होती. पहाटे नदीवर स्नानासाठी जाताना प्रत्येकाला दिलेलं मडकं बरोबर घेऊन जायचं. स्नान झाल्यावर ते नदीच्या काठावर ठेवायचं नि ओंजळीत पाणी घेऊन ते भरायचं. भरलं की ते घेऊन सरळ गुरुदेवांकडे जायचं नि आपल्या त्या दिवसाचा अभ्यास सुरू करायचा. आपला पुत्र अश्वत्थामा यालाही एक मडकं दिलं होतं. गुरुपुत्र म्हणून तो नदीच्या वरच्या प्रवाहात स्नान उरकायचा. अर्जुनाला शिकण्याची एवढी तळमळ असायची की तो भरभर स्नान उरकून ते मडकं पूर्ण भरून त्यातील पाण्याचा एकही थेंब न सांडता धावत धावत गुरुदेवांकडे यायचा. त्याचं चित्त सगळं मडक्यातील पाणी न सांडणं, गुरुदेवांना शरण जाऊन नवे पाठ शिकणं, अधिकाधिक ज्ञान मिळवणं याकडेच असायचं. पण रोज पहावं तर अश्वत्थामा त्याच्यापूर्वी पोचून त्याचं अध्ययन सुरू झालेलं असायचं. अर्जुनानं एके दिवशी लपून पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात खरा प्रकार आला. गुरुदेवांनी अश्वत्थाम्याला दिलेल्या मडक्याचं तोंड खूप मोठं होतं त्यामुळे ते लवकर भरायचं. उलट इतरांना दिलेल्या मडक्यांचं तोंड अगदी लहान असल्यानं ते भरायला अधिक वेळ लागायचा. असा भेदभाव का? असा प्रश्न त्याच्या नुसता मनातच आला नाही तर त्यानं तो गुरुदेवांना विचारलाही – गुरुदेवांनी प्रसन्न होऊन त्यालाही अश्वत्थाम्याच्या मडक्यासारखंच मडकं दिलं. दुसर्या दिवसापासून अर्जुन अश्वत्थाम्यापेक्षाही आधी पोहोचू लागला. त्यानं विद्याही जास्त ग्रहण केली. धनुर्विद्येच्या अभ्यासाचा ध्यास, दुसरा कोणताही विचार मनात न येऊ देणारी एकाग्रता आणि आपल्यासमोरील अडचणीचा विचार करून मार्ग शोधण्यासाठी केलेलं अखंड चिंतन(अनुचिंतन) यामुळे अर्जुन एक न भूतो न भविष्यति असा धनुर्धारी झाला हे सर्वांना माहीत आहेच.
सामान्य माणसाच्या जीवनातही अशी असामान्य एकाग्रचित्तता आढळते. एक साधा बाण बनवणारा लोहार. पण बाण बनवताना त्याचं टोक (अग्र) अधिकाधिक अणकुचिदार, तीक्ष्ण (शार्प) बनवताना तो एवढा बुडून जायचा की समोरून वाजत गाजत गेलेल्या भव्य मिरवणुकीकडेही त्याचं थोडंसुद्धा लक्ष गेलं नाही. त्याची ही एकाग्रता पाहून साक्षात् दत्तात्रेयांनी त्याला गुरू मानून नमस्कार केला.
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. हे गुण भगवंत केवळ परमेश्वरप्राप्तीसाठी सांगताहेत असं नाही तर अखंड आनंदप्राप्तीसाठीही हे तितकेच उपयोगी आहेत. हेच प्रभावी समुपदेशन भगवंताच्या या उद्गारात आहे.
लो. टिळक, स्वामी विवेकानंद, पू. गोंदवलेकर महाराज ही समकालीन महान् कार्य करणारी मंडळी- लो. टिळक व स्वामीजी तसेच लो. टिळक व श्रीमहाराज यांच्या निरनिराळ्या भेटीत चर्चा झाल्यावर दोघांनी ही परस्परांना आपल्या क्षेत्रात येऊन कार्य करण्याची विनंती केली. स्वामी विवेकानंद व पू. गोंदवलेकर महाराज यांनी जेव्हा लो. टिळकांना आध्यात्मिक क्षेत्रात येण्याविषयी सुचवलं तेव्हा लोकमान्यांनी त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची विनंती केली. त्यावेळी ठरलं एकच की आपापलं कार्यक्षेत्रच बरं. कारण दोन्हीकडे यशस्वी होण्यासाठी व जीवन कृतार्थ करण्यासाठी समान गुणांचीच आवश्यकता आहे. त्या गुणांपैकी तीन अर्थातच आहेत- अभ्यास..एकाग्रता..नि चिंतन!