केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूत पद्धतीचा अवलंब
केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी दक्षिण भारतातील मच्छिमारांनी हाय स्पीड ट्रॉलर्सद्वारे बुल ट्रॉलिंग पद्धतीने मच्छिमारी करण्याचे सत्र अवलंबिल्याने त्यांच्या राज्यांसह गोव्यातील सागरी क्षेत्रात मत्स्य दुष्काळ निर्माण होण्याची भीती राज्यातील काही मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी माहिती देताना मांडवी मच्छिमारी सोसायटीचे अध्यक्ष मिनिनो फर्नांडिस म्हणाले की वरील राज्यांतील मच्छिमार ४५० अश्व शक्तीचे मोटर मच्छिमारी बोटींना बसवून मच्छिमारी करतात. त्याच्या तुलनेत गोमंतकीय मच्छिमार फक्त १५० अश्वशक्तीचे मोटर ट्रॉलर्सना बसवतात. ४५० अश्व शक्तीचे मोटर बसवलेल्या ट्रॉलर्सची गती खूप जास्त असते. त्याशिवाय हे मच्छिमारी बूल ट्रॉलिंगद्वारे मच्छिमारी करतात. ट्रॉलर्सचा भयानक वेग व बूल ट्रॉलिंगसाठीची वेगळी जाळी यामुळे समुद्रातील मत्स्यधनाला धोका निर्माण होतो. बोटींच्या वेगामुळे मासळीची अंडी नष्ट होतात. छोटी मासळीही मारली जाते. शिवाय बूल ट्रॉलिंग पद्धतीमुळे मोठ्या मासळीबरोबरच छोटी मासळीही जाळीत सापडून मरण पावते. त्यामुळे मत्स्यधनाचे मोठे नुकसान होते. बूल ट्रॉलिंग तसेच ४५० अश्वशक्तीचे मोटर बसवणे यावर कायद्याने बंदी आहे. गोमंतकीय मच्छिमार त्यापासून दूर असतानाच कर्नाटक, केरळ, आंध्र, तामिळनाडू या राज्यातील मच्छिमार गोव्याच्या समुद्री हद्दीत येऊनही वरील पद्धतीने मच्छिमारी करत असल्याने गोव्याच्या समुद्री हद्दीतील मत्स्यधनाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्याबाबत आम्ही मच्छिमारी खाते तसेच मच्छिमारी मंत्री यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र, त्याबाबत खात्याने कोणतीही पावले उचलली नसल्याचे मिनिनो फर्नांडिस यांनी सांगितले. याबाबत आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना एक निवेदन सादर करून या समस्येत लक्ष घालण्याची त्याना विनंती करण्यात येणार असल्याचे फर्नांडिस यानी सांगितले.