छाननीनंतरच सरकारी विदेश दौरे : मुख्यमंत्री

0
103

अंतर्गत पर्यावरण पर्यटनावर अधिक भर देणार
सरकारी विदेशी दौर्‍यांचे ऑडिट होणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. विजय सरदेसाई यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारच्या मंजुरीशिवाय विदेशी दौरे होणार नसल्याचेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. पुरस्कृत विदेश दौर्‍यांच्या संदर्भात धोरणात्मक मंजुरी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुमारे वीस कोटी रुपये खर्चून बोंडला अभयारण्याची सुधारणा करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल विधानसभेत दिली. या कामासाठी सल्लागार नियुक्त केल्याची माहिती देऊन आपले सरकार अंतर्गत पर्यावरण पर्यटनावर अधिक भर देणार असल्याचेही परुळेकर यांनी सांगितले.
विदेश दौरे लाभदायक
साडेनऊ कोटी रुपये खर्चून मये पर्यटन स्थळाचा विकास करण्याची घोषणाही परुळेकर यांनी केली. कळंगुट परिसरातही १२ ते १३ कोटी रुपयांची कामे केल्याची माहिती त्यांनी दिली. विदेशी दौर्‍यांवर यापूर्वीच्या सरकारने १६ कोटी रुपये खर्च केला आहे, असे सांगून दौर्‍यांवर सरकारने केलेल्या खर्चाचे परुळेकर यांनी समर्थन केले. कोणत्याही कार्यक्रमासाठी आगाऊ पैसे देण्याची प्रथा आपण मोडल्याचे त्यांनी सांगितले. वारसा उत्सवाचे आयोजन करणार्‍या कंपनीकडून ३५ लाख रुपये आपल्या सरकारने वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कार्निव्हल, शिगमोत्सव, बोंदेरां या उत्सवांचा सरकारने चांगला उपयोग केल्याचे परुळेकर यांनी सांगितले.
पर्यटक संख्येत १२% वाढ
राज्यात येणार्‍या देशी व विदेशी पर्यटकांच्या संख्येत बर्‍याच प्रमाणात म्हणजे प्रथमच १२.४७ टक्के वाढ झाल्याची माहिती देऊन त्यात आणखी वाढ करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असेल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. २०१३ मध्ये देशी विदेशी मिळून ३१ लाखांवर पर्यटक गोव्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व किनारे स्वच्छ करण्याचे काम चालूच असते, असे ते म्हणाले. दक्षिण व उत्तर गोव्यासाठी किनारे स्वच्छ करण्यासाठीचे कंपन्यांना कंत्राट दिल्याची माहिती त्यांनी दिली. सप्टेंबरपासून काम सुरू होईल. स्वच्छतेच्या बाबतीत सरकार समाधान नसल्यास कंत्राट रद्द केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
गृहआधार योजनेच्या पत्रावर मुख्यमंत्री व महिला आणि बालकल्याण मंत्र्याचा फोटो का? असा प्रश्‍न विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फोटो असल्याने काहीच बिघडत नसल्याचे सांगितले.