अखेर अपेक्षेनुसार लोकसभेच्या उपसभापतीपदी अभाअद्रमुकचे ६७ वर्षीय नेते एम. थंबीदुराई यांची काल बिनविरोध निवड झाली. यामुळे या पदावर दोन वेळा निवडून येणारे ते पहिले नेते ठरले आहेत.
या पदासंदर्भात लोकसभेत काल गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ठराव मांडला व त्याला विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी अनुमोदन दिले. आवाजी मतदानाने त्यांची ही निवड झाली. सर्व सदस्यांनी बाके वाजवून त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
थंबीदुराई याआधी १९८५ ते १९८९ या कालावधीत उपसभापतीपदी होते. यावेळी या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज सादर झाला होता. भाजप व कॉंग्रेससह ११ पक्षांनी त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तामिळनाडूतील करूल मतदारसंघातून ते पाच वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.
या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बहुआयामी व्यक्तीमत्व’ अशा शब्दात थंबीदुराई यांचे वर्णन केले. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांच्या निवडीबद्दल स्वागत केले. सभापती सुमित्र महाजन यांनीही थंबीदुराई यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.