११ सदस्यीय अस्थायी कार्यकारिणी घोषित
गोवा सरकारने राज्यातील मराठीप्रेमींच्या दीर्घकालीन मागणीची नोंद घेत ‘गोवा मराठी अकादमी’ ही स्वायत्त संस्था निर्माण करण्यासाठी पावले उचलली असून तिचे एकंदर स्वरूप ठरवण्यासाठी तसेच घटना इ. बनविण्यासाठी प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांची अकरा सदस्यीय अस्थायी कार्यकारिणी जाहीर केली आहे. येत्या तीन महिन्यांत या संस्थेची उभारणी करण्याचे लक्ष्य या कार्यकारिणीपुढे ठेवण्यात आले आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून गोव्यातील नामवंत कवी पुष्पाग्रज तथा अशोक नाईक तुयेकर, कादंबरीकार चंद्रकांत महादेव गवस, ज्येष्ठ कलारसिक व लेखक श्री. जनार्दन वेर्लेकर, दै. नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, दै. तरूण भारतचे ज्येष्ठ प्रतिनिधी श्री. सागर जावडेकर, लोकसाहित्याच्या अभ्यासक व लेखिका सौ. पौर्णिमा केरकर, प्रसिद्ध कवी श्री. आनंद मयेकर, साहित्यिक श्री. दशरथ परब, मांद्रे येथील ‘साहित्य संगम’ चे प्रा. गजानन मांद्रेकर, प्रा. वल्लभ केळकर, पत्रकार श्री. तुषार टोपले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गोवा सरकारमधील ज्येष्ठ अधिकारी श्री. शशांक ठाकूर हे या नव्या अकादमीचे सदस्य सचिव असतील.
स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीदिनी आपण नव्या मराठी अकादमीची घोषणा करीत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले होते. त्यानंतर संध्याकाळी राजभाषा संचालनालयाने या नव्या अकादमीची ही अस्थायी कार्यकारिणी अधिसूचित केली. ही कार्यकारिणी थेट मुख्यमंत्र्यांनाच आपल्या कार्याचा अहवाल देईल.
रायबंदर येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या जुन्या इमारतीत सध्या या नव्या गोवा मराठी अकादमीचे कार्यालय उघडण्यात येणार असून संस्थेच्या कार्याला गती येताच तिचे अन्यत्र स्थलांतर केले जाईल.
पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमी सर्वसामान्य जनतेला खुली करण्याची मराठीप्रेमींची मागणी वारंवार धुडकावून लावली गेल्याने तसेच आमदार विष्णू वाघ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अकादमीच्या पदाधिकार्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून नव्या मराठी अकादमीच्या स्थापनेची शिफारस केली होती. त्यानुसार ही अकादमी स्थापन करण्यात आली आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाला नव्या गोवा मराठी अकादमीसाठी कार्यालय सुसज्ज करण्याचे आदेश देण्यात आले असून येत्या काही दिवसांत तेथून नव्या अकादमीचे काम सुरू होईल असे समजते.
ही अकादमी सर्वांची असेल : प्रा. सामंत
नव्या गोवा मराठी अकादमीची स्थापना सरकारच्या माध्यमातून जरी होत असली, तरी पेडण्यापासून काणकोणपर्यंतच्या संपूर्ण गोमंतकातील मराठीप्रेमींना त्यात सामावून घेतले जाईल. मराठी संस्कृतीशी संबंधित असलेल्या सर्व क्षेत्रांतील ज्येष्ठ आणि तरूण अशा सर्व वर्गांतील कार्यकर्त्यांचा यामध्ये सहयोग घेतला जाईल अशी प्रतिक्रिया नव्या गोवा मराठी अकादमीचे नूतन अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी ‘नवप्रभा’ पाशी व्यक्त केली. गोव्याच्या गावोगावी तळागाळातील सर्वसामान्य मराठीप्रेमींपर्यंत या अकादमीचे कार्य पोहोचवले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.