सल्लागाराला ३८ आठवड्यांचा अवधी
गोव्याचा पर्यटनविषयक मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला विष्णू वाघ यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
गोव्यात ऐतिहासिक महत्त्वाची किती स्थळे आहेत व त्यांच्या विकासासाठी पर्यटन खात्याने कोणती पावले उचलली आहेत असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला होता.
यावेळी वाघ म्हणाले की, राज्यातील मंदिरे व चर्चेसवर विद्युत रोषणाई करण्याचे काम सोडून पर्यटन खात्याने आणखी काहीही केलेल नाही. मंदिरांसह अन्य पर्यटन स्थळांवर स्नानगृहे व शौचालये आदी सोयींचाही अभाव असल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.
यावेळी परुळेकर यांनी पर्यटन विषयक मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी खात्याने सल्लागार कंपनीला ३८ आठवड्यांचा अवधी दिला असल्याची माहिती दिली. मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम गेल्या महिनाभरापूर्वीच सुरू झाले असल्याचे ते म्हणाले.
हा प्लॅन तयार करताना लोकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील काय, असा प्रश्न वाघ यांनी केला असता आमदार, जि. पं. सदस्य, पंच आदींच्या काही सूचना असल्या तर त्या अवश्य विचारात घेतल्या जातील असे परुळेकर यांनी सांगितले. यावेळी वाघ म्हणाले, की राज्यात कित्येक किल्ले आहेत त्या किल्ल्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. नीलेश काब्राल व लवू मामलेदार यांनीही यावेळी किल्ल्यांची दुरुस्ती होण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यावर परुळेकर म्हणाले की, किल्ल्यांची जबाबदारी ही पुरातत्व खात्याची जबाबदारी आहे.