पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादातून छुपे युद्ध सुरू केले आहे. त्यांना थेट युद्ध करण्याची ताकद राहिली नसल्यानेच ते असे करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लेह येथे भारतीय लष्कर व हवाई दलासमोर बोलताना सांगितले.
पंतप्रधान बनल्यानंतर मोदी यांच्याकडून पाकिस्तानवर करण्यात आलेली ही पहिलीच टीका आहे. आपल्या शपथविधी सोहळ्यात मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही निमंत्रित केले होते.
पंतप्रधान म्हणाले की, भारत दहशतवादामुळे प्रत्यक्ष युद्धापेक्षाही जास्त नुकसान सोसत आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघना संदर्भात ते बोलत होते. परवा पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे आठ जवान जखमी झाले होते.
सीमेवरील राज्यांचे प्रश्न
विकासाने सुटतील
जम्मू काश्मीर तसेच इशान्य भारतातील सीमेवरील राज्यांच्या समस्या विकासाने सुटतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते कारगिल येथे जाहीर सभेत बोलत होते. मोदी काल एका दिवसाच्या लडाख दौर्यावर होते. आपले सरकार जम्मू काश्मीर राज्यातील विस्थापितांना सन्मानाने परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. काश्मीरमधील पशमिना उद्योगाचा विकास करणार असल्याचेही ते म्हणाले. जम्मू काश्मीर राज्यातील रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार लवकरच ८ हजार कोटी रुपये मंजूर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी दौर्यात दोन जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन केले.