उपचारासाठी अडीच ते ४ लाख रु. मिळणार : पार्सेकर
सरकारच्या नव्या आरोग्य विमा योजनेचा प्रत्येक गोमंतकीयाला लाभ होणार असून ३ सदस्य असलेल्या कुटुंबाला अडीच लाख रुपये तर ४ व त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबाला ४ लाख रुपयांपर्यंतचा उपचार घेण्यासाठी लाभ होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल विधानसभेत आपल्या खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना केली.
या योजनेसाठी सरकारी इस्पितळांबरोबर राज्यातील महत्वाच्या खाजगी इस्पितळांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ‘कार्ड’ मिळवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला ५ वर्षेपर्यंतचा वास्तव्याचा दाखला सादर करणे सक्तीचे आहे. नोंदणी करतेवेळी ३ सदस्यीय कुटुंबाला ३०० रुपये तर ४ व त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबाला ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मागास जाती व जमातींसाठी हप्त्यांमध्ये ५० टक्के सवलत असेल, अशी माहिती पार्सेकर यांनी दिली.
देशातील ही अशा प्रकारची पहिली अभिनव योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिक्लेम योजनेसाठी रुग्णांना उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत होता. आता ती गैरसोय दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
दंत महाविद्यालयात लवकरच २४ तास सेवा
आपल्या सरकारच्या काळात वैद्यकीय शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी जागा वाढविणे शक्य झाले. त्याचप्रमाणे निमवैद्यकीय क्षेत्रातही महत्वाची सुधारणा करून एमएससी नर्सिंग शिक्षणाचीही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे नर्सिंग संस्थेत शिकविण्यासाठी गोव्या बाहेरील लोकांची गरज भासणार नाही. लवकरच दंत महाविद्यालयात २४ तास सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
कॅन्सर केअरसाठी ५० कोटी मंजूर
कॅन्सर केअर विभाग उघडण्यसाठी केंद्र सरकारने ५० कोटी रुपये मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्डिओलॉजीच्या सुपर स्पेशलिटी विभागात ७०२ प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती देऊन त्यात ‘ओपन हार्ट’ सर्जरीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पेडणे, कासावली, चिखली, कुडचडे, शिरोडा, नावेली, पीर्ण येथे नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.