– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा
आपला भारत देश हा एक गरीब पण विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. आपण सदैव आपल्या गत संस्कृतीचे गोडवे गात व कोणे एके काळी या देशात कसा सोन्याचा धूर निघत होता याचेच कोडकौतुक करत जगत असतो.
तसे पाहिले तर आपला देश खरोखरच ‘महान’ आहे, पण आपले राज्यकर्ते स्वतःच्या कर्तबगारीने व फक्त स्वहिताचाच विचार करून या देशाला कायम ‘लहान’ कसा बनवावा याचाच विचार करतात. त्यामुळे सर्व आघाड्यांवर यशस्वी वाटचाल करूनसुद्धा आपला देश हा जगाच्या नकाशावर तसा वरच्या स्तरावर अजूनही पोचू शकलेला नाही. फक्त ‘भ्रष्टाचार’ व ‘क्रिकेट’ या दोनच गोष्टींत आपण अव्वल राहण्याचा प्रयत्न करू शकतो. अन्य क्षेत्रांत नाही!
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे हल्लीच लोकसभेत आपल्या केंद्रीय क्रीडामंत्री सरबानंद सोनोवल यांनी दिलेली माहिती. गेल्या तीन वर्षांत फक्त विदेशी प्रशिक्षकांवर आपल्या या गरीब देशाने आपल्या खेळांचा व खेळाडूंचा स्तर उंचावण्यासाठी जवळजवळ २५७० कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. एकेकाळी हॉकी या खेळात आपले कित्येक वर्षे ऑलिंपिकचे सुवर्णपदक हमखास मिळवायचो.
कधी काळी खाशाबा जाधव यांनी कुस्तीत एका कास्यपदकांच्या केलेल्या कमाईवर आपण कित्येक वर्षे काढली. हळूहळू आपण वस्ताद असलेल्या हॉकी या एकमेव खेळातही आपण एकदम पिछाडीवर पडू लागलो. सद्यपरिस्थितीनुसार आपला भारत देश भाग घेत असलेल्या एखाद्या स्पर्धेमध्ये तळाच्या जागेसाठी खेळायची नामुष्की कैकवेळा आपल्या वाट्याला आली आहे व त्याबद्दल कोणाला ना खेद ना खंत.
अगदी हल्ली आपण नेमबाजी, कुस्ती आदी खेळांत ऑलिंपिकमध्ये काही पदके मिळवली आहेत, पण आपल्या या १२० कोटींच्या महाकाय अशा देशात पदकांची लूट करणारे खेळाडू का जन्माला येत नाहीत, हे एक कोडेच आहे. हल्ली आपण आशियाई, कॉमनवेल्थ किंवा अगदी लुसोफोनियासारख्या दुय्यम दर्जांच्या स्पर्धांत वर्चस्व स्थापन करून मिरवण्याची संधी घेतो.
खरे म्हणजे आपल्या देशात खेळांच्या असोसिएशनची सर्व सूत्रे जोपर्यंत त्या खेळाविषयी काहीही गंध नसलेल्या आपल्या राजकारण्यांच्या हातात आहे, तोपर्यंत कोणीही कितीही आटापिटा केला, तरी आपण या जागतिक किंवा ऑलिंपिक स्पर्धांत काहीही भरीव असे करूच शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे असे प्रश्न मनाला सतावतात व त्यामुळे त्यांचा उहापोह घेणे अपरिहार्य ठरते.
१) सध्याच्या परिस्थितीत आपल्या देशात क्रिकेट या खेळाचे इतके अवाजवी स्तोम माजले आहे की ९५ टक्के लोक आपला राष्ट्रीय खेळ म्हणून क्रिकेटकडे बोट दाखवतील. बहुतेक क्रिकेट खेळाडू पैशांच्या राशीवर अक्षरशः लोळतात, पण त्यांना मिळणार्या पैशांच्या मोबदल्यात हे खेळाडू खरोखरच खेळांत किती समरस होतात हा प्रश्न अनुपस्थित होतो. पुष्कळवेळा एकाद्या सामन्यात जेव्हा त्यांच्याकडून एखादी भिकार अशी कामगिरी घडते. त्यावेळी त्यांच्या देहबोलीतून कसलीही खंत वा खेद जाणवत नाही. आमच्यासारखे प्रेक्षक मात्र हळहळत असतात.
या क्रिकेट खेळातही आपल्या देशात इतके दिग्गज खेळाडू होऊन गेले, पण प्रत्येकवेळी जेव्हा प्रशिक्षक नेमण्याचा प्रश्न येतो, तेव्हा फक्त परदेशीच प्रशिक्षकांवर कोटी कोटी रुपये खर्च करून आपण नक्की काय साधतोय याचा विचार कधी केला आहे काय? आणि हे परदेशी प्रशिक्षक सचीन, धोनी, द्रविड यांसारख्या दिग्गज खेळाडूंना नक्की कसले प्रशिक्षण देतात याचे नेहमी मला कुतूहल वाटते आणि ग्रेग चॅपेलसारख्या दिग्गज खेळाडूंची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती भिकार कामगिरी होती हे सर्वांच्या लक्षात असेलच. पण जगातील सर्वांत श्रीमंत अशी ‘बीसीसीआय’ ही संस्था हा खर्च करीत असल्याने आमच्यासारख्या लोकांना त्याची झळ पोचत नाही.
२) पण जेव्हा ऑलिंपिक किंवा इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात पदके कमावण्यासाठी जनतेचे करोडो रुपये आणि विशेषतः ते विदेशी प्रशिक्षकांवर उधळले जातात, तेव्हा साहजिकच या सार्या प्रकाराची नोंद घ्यावीसी वाटते. जे लोक या क्रीडासंस्थांवर पदाधिकारी म्हणून ठाण मांडून बसले आहेत, त्यापैकी किती जणांना त्या खेळांत गंध आहे हा संशोधनाचा विषय ठरावा आणि बहुतेक पदाधिकारी हे राजकारणीच असल्यामुळे ते स्वतःचे उखळ पांढरे करण्यातच धन्यता मानतात.
पुष्कळ वेळा असे घडले आहे की ऑलिंपिक स्पर्धेत पाठवलेल्या आपल्या खेळाडूंपेक्षा कितीतरी जास्त संख्येने हे पदाधिकारी पाठवले जातात. जर खरोखरच आम्हाला ऑलिंपिकमध्ये किंवा जागतिक क्रिडास्पर्धांत भविष्यकाळात काही पदके मिळवायची असतील तर फक्त विदेशी प्रशिक्षकांवर काही हजार कोटी उधळण्यापेक्षा आपल्या खेळाडूंना चांगला आहार, चांगल्या मुलभूत सुविधा व सरावासाठी चांगले ट्रॅक्स उपलब्ध करून द्या.
खेळाडूंची इच्छाशक्ती व पदके मिळवण्यासाठी लागणारा आत्मविश्वास उंचावण्यासाठी देशी तज्ज्ञांची मदत घ्या. तेव्हाच आपणस जागतिक दर्जाचे ऍथलिट्स तयार करू.
अन्यथा आपल्या देशांतर्गत किंवा लुसोफोनिया सारख्या दुय्यम स्पर्धांत पदकांची लूट करूनच आपण स्वतःचे समाधान करून घेऊ.
३) स्वतंत्र होऊन ६७ वर्षे होऊनसुद्धा आपले राज्यकर्ते अजूनपर्यंत लोकांना जगण्यासाठी मूलभूत सुविधा (पाणी, वीज, घरे, शौचालये इ.) सबंध देशाला पुरवू शकलो नाहीत.
राज्यकर्ते मात्र स्वतःची व आपल्या अनेक पिढ्यांची तरतूद करण्यात मग्न आहेत आणि या सर्वांची कमतरता असूनसुद्धा आपण अनेक गोष्टींवर पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहोत. महासत्ता बनण्याच्या आपल्या लालसेपोटी आपण अंतराळ मोहिमेवर अक्षरशः हजारो कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. हवामान विषयक अंदाज बांधता यावेत यासाठी अनेक उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.
तरीपण जेव्हा उत्तराखंडासारख्या किंवा त्सुनामीसारख्या दुर्घटना घडतात. त्याची साधी चाहूलही आपणाला लागत नाही. आता तर मंगळावर स्वारी करून आपण नक्की काय साधणार याचा काही बोध होत नाही.
तेव्हा आपल्यासारख्या गरीब देशाने एक-दोन पदकांच्या लालसेपोटी किंवा अंतराळ मोहिमांत श्रीमंत व प्रगत देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी एवढा अवाढव्य खर्च करणे संयुक्तिक आहे याचा काय विचार होणे अगदी जरुरीचे वाटते. राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे पैसे गरीब लोकांना जगण्यासाठी लागणार्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगात आणावेत.