स्मिता तळवलकर गेल्या. गेली चाळीस वर्षे रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजविणार्या स्मिताताई हे जग सोडून गेल्या. गेली सहा वर्षे त्या कर्करोगाशी झगडत होत्या. मध्यंतरी त्यांनी त्यावर मात केल्यासारखीही वाटत होती. ‘दुर्गाबाई जरा जपून’ या अशोक पाटोळे लिखित नाटकात त्यांनी रंगभूमीवर मोठ्या थाटात पुन:पदार्पणही केले होते. या नाटकात त्यांची व सतीश पुलेकरांची जोडीही चांगलीच जमली होती. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णी दिग्दर्शीत ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते’ या २०१३ सालच्या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लोकांना आवडली होती. जून २०१४ सालात प्रदर्शित झालेला ‘भातुकली’ हा स्मिताताईंचा शेवटचा चित्रपट. काहीसा रहस्यमय असलेल्या या चित्रपटातील स्मिताताईंनी अजिंक्यदेवांच्या आईच्या भूमिकेत खरोखरच कमाल केली होती. एककल्ली अजिंक्य देवला समजून घेणारी स्मिताताईंची ती आई लोकांच्याही पसंतीला उतरली होती. स्मिताताईंनी या मोहमयी दुनियेत जवळ जवळ चार दशके व्यतीत केली. केवळ व्यतीत केली अशी नव्हे तर या दुनियेवर आपला वेगळा असा ठसा उमटविला.स्मिताताईंनी जवळ जवळ १७ वर्षे दूरदर्शनवर बातम्या देण्याचे काम केले. त्या काळात इतर वाहिन्या नसल्यामुळे दूरदर्शनला भरपूर प्रेक्षकवर्ग असायचा. यामुळेच स्मिताताई घराघरांत पोहचल्या आणि याचीच परिणती मग, त्यांच्या मालिका व चित्रपट कारकिर्दीत झाली. ‘घरकुल’ ही त्यांची पहिली मालिका तर १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तू सौभाग्यवती’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. पण त्या खर्या गाजायला लागल्या त्या ‘अवंतिका’ व ‘ऊनपाऊस’ या मालिकांमधून. या दोन मालिकानी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. मालिकांबरोबरच स्मिताताईंनी चित्रपटांकडेही लक्ष देण्यास सुरवात केली. विशेष अनुभव पदरी नसतानाही त्या चित्रपट निर्मितीत उतरल्या. त्या काळात मराठी अभिनेत्री सिने निर्मितीत उतरण्याचे धाडस करत नव्हत्या. सीमा देवने हे धाडस केले होते; पण ते आपला पती व ख्यातनाम अभिनेता रमेश देवच्या साथीने. सीमा व रमेश देवना अनुभवही बराच होता. त्या मानाने स्मिताताईंना अनुभव होता तो केवळ ‘तू सौभाग्यवती’ व ‘गडबड घोटाळा’ या दोनच चित्रपटांचा. तरी त्यांनी ‘कळत नकळत’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचे मनाशी पक्के ठरविले. विक्रम गोखले, सविता प्रभुणे, आश्विनी भावे, अशोक सराफ, निळू फुले अशा दिग्गज कलाकारांना घेऊन स्मिताताईंनी आपल्या अस्मिता चित्रामार्फत या चित्रपटाची निर्मिती केली. वैवाहिक नातेसंबंधावर आधारित असलेल्या या चित्रपटाने व्यावसायिक यशाबरोबर पुरस्कारही मिळविले होते. ‘कळत नकळत’च्या सर्वांगीण यशानंतर स्मिताताईंनी ‘चौकट राजा’ची निर्मिती केली. हा चित्रपट म्हणजे एक जबरदस्त आव्हान होते. मतिमंद माणसाभोवती फिरणार्या या चित्रपटात स्मिताताईंनी भूमिका केली होती. या मतिमंद माणसाची मैत्रिण म्हणून स्मिता चांगलीच शोभली होती. या मतिमंद माणसाच्या जवळकीमुळे नवरा स्मितावर संशय घेतो. त्यावेळची द्विधा मानसिक अवस्था स्मिताने यथार्थपणे ऊभी केली होती. दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ व दिलीप कुलकर्णीसारखे नामवंत कलाकार असूनसुद्धा लक्षात राहते ती स्मिताच. आपण ही भूमिका अक्षरश: जगतो असे स्मिताने त्यावेळी एका मुलाखतीत सांगितले होते. ‘चौकट राजा’ हा आपला आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट अशी कबुलीही तिने दिली होती. या चित्रपटाने लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही प्राप्त केली होती. त्या सालचा मराठी चित्रपटाकरता असलेला राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. मतिमंद माणूसही माणूस असतो हे या चित्रपटाद्वारे स्मिताला दाखवायचे होते आणि त्यात ती यशस्वी ठरली होती. ‘चौकट राजा’ नंतर तिने विवाहबाह्य संबंधावर आधारित ‘सवत माझी लाडकी’ हा चित्रपट निर्माण केला. एक मध्यमवयीन डॉक्टर व त्याची युवा प्रेमिका यांच्या संबंधावर आधारित हा चित्रपट होता. हा डॉक्टर विवाहित असूनसुद्धा बाहेर प्रेमाच रंग कसे उधळतो हे दाखविण्याबरोबरच त्या प्रेमिकेला डॉक्टरांची बायको सवत म्हणून कशी घरात आणते व त्याचे पर्यवसान काय होते हेही दाखविले होते. मोहन जोशी, नीना कुलकर्णी, प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, सुधीर जोशी यांच्या भूमिकांनी नटलेल्या या चित्रपटातून विवाहबाह्य संबंध कोणते वाईट परिणाम करू शकतात हे प्रभावीपणे दाखविले होते. त्यानंतर ‘शिवरायाची सून ताराबाई’ या ऐतिहासिक चित्रपटात स्मिताने येसुबाईची भूमिका केली होती. तिची भूमिका गाजूनही चित्रपटाचे यश मर्यादीतच राहिले होते. त्यानंतर स्मिताने १९९० साली ‘तू तिथे मी’ या सर्वांगसुंदर चित्रपटाची निर्मिती केली. मोहन जोशी, सुहास जोशी यांच्या अप्रतिम भूमिकांनी हा चित्रपट नटला होता. म्हातारपणात आई-वडिलांना वेगळे करणारा त्यांचा मुलगा यावर हा चित्रपट गाजलेला होता. मोहन जोशी व सुहास जोशी यांनी या वृद्ध जोडप्याच्या भूमिकांचे संपूर्ण कंगोरे प्रभावीपणे ऊभे केले होते. प्रशांत दामले हाही या चित्रपटात भाव खाऊन गेला होता. दिग्दर्शक संजय सुरकरांनी या वृद्ध जोडप्याच्या व्यथा यथार्थपणे टिपल्या होत्या. या चित्रपटावर पुरस्कारांची खैरात झाली होती. या चार चित्रपटांच्या यशामुळे स्मिताला जबरदस्त आत्मविश्वास प्राप्त झाला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी निर्माती म्हणून तिची त्याकाळी ख्याती झाली होती. या ख्यातीत भर पडली ती ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटाची. मुलींनी संध्याकाळी सातच्या आत घरात यायला हवे असा संदेश देणारा चित्रपट काहींच्या टीकेचे लक्ष्य बनला होता. संजय सुरकर दिग्दर्शित या चित्रपटात भारती आचरेकर, विभावरी देशपांडे, मकरंद अनासपुरे यांच्या लक्षणीय भूमिका होत्या. काहीसा बोल्ड असा हा चित्रपट २००४ साली बराच हीट ठरला होता. या चित्रपटाबाबत बोलताना स्मिताताईंनी या चित्रपटाद्वारे समाजात चालत असलेल्या स्वैराचारावर आपण प्रकाश टाकला होता असे म्हटले होते. संजय सुरकर या दिग्दर्शकाबाबत स्मिताताई नेहमीच आत्मियतेने बोलत असत. ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटाचे यश हे संजयचे यश असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. २००६ साली प्रदर्शित झालेला ‘आनंदाचे झाड’ हा स्मिताताईंनी निर्माण केलेला शेवटचा चित्रपट. आनंदाने जगा असा संदेश देणारा हा चित्रपट अपेक्षेपेक्षा हीट ठरू शकला नाही. या चित्रपटाबरोबर स्मिताने २५ मालिकांची निर्मिती केली. अर्धांगिनी, सुवासिनी, कथा एक आनंदिची, राऊ, उंच माझा झोका सारख्या त्यांच्या मालिका त्याकाळी तुफान गाजल्या होत्या. ‘आनंदाचे झाड’ या चित्रपटानंतर स्मिताने अभिनयावर लक्ष केंद्रित केले. चेकमेट, अडगुळ मडगुळ, टोपी घाल रे, एक होती वाडी, श्यामचे वडिल, या गोल गोल डब्यातला इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘जन्म’ हा गोमंतकीय चित्रपट निर्माते तपन आचार्य यांनी निर्माण केलेला चित्रपट बघण्याचा योग २०१० च्या इफ्फीमध्ये आला होता. चित्रपटात प्रमुख भूमिका नसूनसुद्धा आई व मुलींना सल्ले देणार्या स्त्रीरोग तज्ञाची भूमिका स्मिताताईंनी समर्थपणे ऊभी केली होती. रंगभूमीवरही त्या सक्रिय होत्या. ‘गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ या नाटकातील त्यांची जनाबाईची भूमिकाही त्याकाळी खूपच गाजली होती. पण नंतर मालिका व चित्रपटात व्यस्त झाल्यामुळे त्यांचे रंगभूमीकडे थोडे फार दुर्लक्षच झाले होते याची खंत त्यांना नेहमीच सलत होती. ही खंत कमी करण्याकरता म्हणून त्यांनी ‘दुर्गाबाई जरा जपून’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर पुन:पदार्पण केले होते. स्मिताताई जिद्दी व मानसिकदृष्ट्या किती खंबीर होत्या याचे दर्शन या नाटकात घडायचे. कर्करोग सारख्या दुर्धर रोगाची रुग्ण असूनसुद्धा स्मिताताईंनी ही भूमिका प्रभावीपणे ऊभी केली होती. बर्याच प्रसंगात त्या टाळ्याही घेत असत. दूरदर्शनवरची एक वृत्तनिवेदिका पासून सुरू झालेला स्मिताताईंचा प्रवास रंगभूमी, मालिका करत करत चित्रपट निर्मितीपर्यंत पोचला. चित्रपटनिर्मिती करत असताना त्यांनी या निर्मितीच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक बाबी शिकून घेतल्या होत्या. निर्मिती म्हणजे एक जबरदस्त आव्हान असते असे त्या म्हणायच्या. कर्करोगातून थोडेफार सावरल्यानंतर त्यांना परत चित्रपट निर्मितीचे वेध लागले होते. पण प्रकृती आस्वास्थामुळे त्या ही जबाबदारी पार पाडू शकल्या नाहीत. स्मिताताईंनी अनेक कलाकार घडविले, अनेक कलाकारांना आव्हानात्मक भूमिका दिल्या. ‘कळत नकळत’ मध्ये सविता प्रभुणे, ‘चौकट राजा’ मधला दिलीप प्रभावळकर, ‘तू तिथे मी’ मधला मोहन जोशी अशी काही उदाहरणे वागनीदाखल देता येईल. २०१० साली स्मिताताईंना व्ही. शांताराम पुरस्काराने भूषविले गेले होते. त्या नेहमीच हसतमुख असायच्या. चित्रपट वा मालिका निर्मिती करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. पण त्यांनी न डगमगता काम केले. स्त्री असूनसुद्धा त्या कधीच कचरल्या नाहीत. १९९० साली ‘राऊ’सारखी मालिका निर्माण करत असताना अडचणींचा डोंगर उभा राहिल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पण त्यांनी कधीच हिंमत हारली नाही. म्हणूनच ‘राऊ’ ही एक अजरामर मालिका ठरली. तसे पाहिल्यास आजच्या काळात ५९ वय मरण्याचे वय म्हणता येणार नाही. म्हणूनच स्मिताताईंचे हे असे अकाली जाणे मनाला खुपते. त्यांची सर्जनशीलता पाहिल्यास आणखी दहा-पंधरा वर्षांचे आयुष्य मिळाल्यास त्यांनी आणखी काही आशयघन मालिका व चित्रपटांची निर्मिती केली असती यात शंकाच नाही. बालरंगभूमीलासुद्धा त्यांनी चांगलेच योगदान दिले होते. लहान मुलांकरता त्यांनी काही चटपट्या नाटकांची निर्मिती केली होती. स्मिताताईंच्या जाण्याने खर्या अर्थी पोकळी निर्माण झाली आहे यात संदेश नाही. आजही क्लासिक चित्रपटांची गिनती केली जाते तेव्हा स्मिताताईंचे कळत नकळत, चॉकलेट राजा, तू तिथे मी व सातच्या आत घरात या चार चित्रपटांचा समावेश केला जातो. कोणत्याही स्त्री अभिनेत्री-निर्मातीला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. म्हणूनच स्मिताताईच्या स्मृतींना अभिवादन करताना तिच्यावर चित्रित केलेले ‘चौकट राजा’ मधले ‘हे जीवन सुंदर आहे…’ हे गाणे याद यायला लागते. या महान अभिनेत्री-निर्मातीच्या स्मृतींना विनम्र प्रणाम! ……….