विधानसभा वृत्त

0
107

पर्वरीतील बांधकामे बंद ठेवणे शक्य नाही : मुख्यमंत्री
पर्वरी येथील बांधकामे बंद ठेवणे शक्य नाही. तेथील पायाभूत व्यवस्थेच्या बाबतीत वेगळा उपाय करण्याचे मुख्यमंत्री मनोहर परींकर यांनी आश्‍वासन दिले. त्यानंतरही पाणी, वीजपुरवठा व कचरा समस्येवर तोडगा निघेपर्यंत पर्वरी भागात व्यापारी व निवासी प्रकल्पाना परवाने न देण्याची मागणी करणारा आपला ठराव आमदार रोहन खंवटे यांनी मागे घेतला.
गोपिनाथ मुंडेंच्या नावे इतर मागासवर्गीय योजनेचा ठराव
दिवंगत लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या नावाने इतर मागासवर्गीयांसाठी योजना राबविण्यासंबंधी आमदार विष्णू वाघ यांनी मांडलेला ठराव काल विधानसभेत संमत करण्यात आला. योजनेचे स्वरुप लवकरच निश्‍चित करण्याचे आश्‍वासनही यावेळी समाजकल्याणमंत्री महादेव नाईक यांनी दिले.
राज्यातील नद्या व खाड्यांचे संवर्धन करणार : मांद्रेकर
राज्यातील नद्या व खाड्यांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्‍वासन जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी दिल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडलेला ठराव मागे घेण्यात आला. वरील विषय एका खात्यापुरता मर्यादित नसून अनेक खात्यांची ती जबाबदारी आहे. त्यासाठी आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने सरकार काम करणार असल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले.
तळवलकर व ठाकूर यांना श्रद्धांजली
मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री व प्रख्यात मराठी चित्रपट निर्माती स्मिता तळवलकर व अर्थतज्ज्ञ तथा सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करणारा ठराव काल विधानसभेत संमत केला.
विष्णू वाघ यांनी मांडलेल्या या ठरावावर मुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांची भाषणे झाली.
वीजवाहिन्यांखालील भंगार अड्डे काढणार : मुख्यमंत्री
विजेच्या तारांखाली उभारण्यात आलेले नवीन भंगार अड्डे सात दिवसांच्या आत काढून टाकण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांच्या लक्षवेधी सूचनेवर दिले. जुन्या अड्ड्यांच्या पूनर्वसनासाठीचा कार्यक्रम तयार करण्याचे काम चालू असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
कोडार भागात उभारलेल्या एका भंगार अड्यामुळे तेथील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे डॉ. सावंत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.