जसवंत सिंग कोमात

0
107

डोक्याला दुखापत; प्रकृती चिंताजनक
भाजपचे एकेकाळचे महत्त्वाचे नेते जसवंत सिंग हे काल कोमात गेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. शुक्रवारी घरात पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
माजी संरक्षण मंत्री, ७६ वर्षीय सिंग यांना काल दुपारी १ वा. लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले. आपल्या घरी बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर त्यांना घरचे इस्पितळात घेऊन आल्याचे सांगण्यात आले. तातडीचा उपाय म्हणून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे समजते. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपकरणांवर ठेवले आहे. या घटनेबाबत समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून विचारपुस केली. लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सिंग यांची इस्पितळात भेट घेतली. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही जसवंत सिंग यांची भेट घेतली. बारमेर राजस्थान येथे १९३८ साली जन्मलेले सिंग हे भाजपच्या पहिल्या पीढीतील नेत्यांपैकी होते. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांचे ते खास होते. नऊ वर्षे लष्करात सेवा बजावलेल्या सिंग यांनी वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण, अर्थ, विदेेश व्यवहार अशी महत्त्वाची खाती सांभाळली होती. चार वेळा लोकसभेवर तर पाच वेळा राज्यसभेवर ते निवडून गेले होते.
यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर बारमेर येथून ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते व पराभूत झाले होते.