सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माहिती आयुक्तपदी असणार्या व्यक्तीला कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे सध्याची प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरातीद्वारे माहिती आयुक्तांची नियुक्ती करणार असल्याचे माहितीमंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले.
सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती उपलब्ध असलेले इंग्रजीतील पुस्तक सांख्यिकी खात्याने प्रकाशित केले आहे. त्याचा कोंकणी व मराठीतील अनुवादही प्रकाशित करण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले. वेतन आयोगाच्या शिफारसींचे सर्व वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांनी पालन करावे म्हणून सरकार काळजी घेईल, असेही त्यांनी आमदार विष्णू यांच्या मुद्यावर स्पष्ट केले.
मुद्रण व लेखन व व्यवहार खात्यातील १० पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. उरलेली २० पदेही लवकरच भरली जातील, असे आश्वासन देऊन मंत्र्यानी सुमारे ९५ लाख रुपये किंमतीचे नवे आधुनिक छपाई मशीन लवकरच उपलब्ध केले जाईल, असेही सांगितले.
सरकारी जाहिरातींच्या वाटपात पक्षपात : आलेक्स
राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे सरकारी जाहिरातींचे वाटप करताना पक्षपात केला जात असून विशिष्ट वर्तमानपत्रांना अधिक जाहिराती दिल्या जातात, अशी टीका कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल विधानसभेत केली. माहिती व प्रसिद्धी खात्याने गतवर्षीपासून विविध वर्तमानपत्रांना दिलेल्या सरकारी जाहिरातींसंबंधीचा प्रश्न काल आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारला होता. माहिती व प्रसिद्धी खात्याच्या मागण्यांवरील कपात सूचनेवरील चर्चेवेळी त्यांनी हा विषय उपस्थित करताना माहिती व प्रसिद्धी खात्याचा कारभार सुधारण्याची मागणी केली.