येथील व्यापार्यानी सोपो करवाढीवरून आपला विरोध तीव्र करताना काल भर बाजाराच्या दिवशी संपूर्ण मार्केट बंद ठेवून आपला विरोध व्यक्त केला. शहरातील इतर बाजारपेठ चालू असल्याने लोकांचे तेवढे हाल झाले नाही. परंतु मच्छीबाजार पूर्णपणे बंद असल्याने मासळीपासून मुकावे लागले.
काल सकाळीच मार्केटमधील विक्रेते मार्केट परिसरात गोळा झाले होते. ‘बुरे दिन तो देखे अच्छे दिन कब आयेंगे’ ‘सोपो कंत्राटाची सखोल चौकशी करा’ ‘सोपो कर वाढ मागे घ्या’, असे लिहिलेले फलक घेऊन सगळे व्यापारी दुपारपर्यंत बाजार परिसरात फिरत होते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान सर्व विक्रेत्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून नगरपालिकेवर धडक मोर्चा नेला. मुख्य बाजारपेठेपासून सुरू झालेला हा मोर्चा नगरपालिकेसमोर थांबला. पंचसदस्य नरेंद्र परब, ऍड्. यतीश नाईक, ऍड्. सायमन परेरा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर मामलेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नगरपालिका व नगरसेवकाच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी यावेळी नगरपालिका परिसर निनादून गेला.
विक्रेत्यांना उद्देशून केलेल्या भाषणात ऍड्. सायमन परेरा यांनी नगरपालिका मंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांचाही निषेध केला. आपल्या भाषणात ते म्हणाले की सरकार एका बाजूने भ्रष्टाचार निपटून काढण्याची भाषा बोलते तर दुसर्या बाजूने सोपो कंत्राटाच्या नावाखाली चाललेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याला प्रोत्साहन देत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नगरपालिकेने स्ट्रीट वेंडर ऍक्ट २०१४ त्वरित लागू करावा व जनतेच्या सोपोच्या नावाखाली चाललेली पिळवणूक थांबवावी. जोपर्यंत नगरपालिका मंडळ सदर कायदा लावत नाही तोपर्यंत सोपाकर कुणीही भरू नका. ऍड्. यतीश नाईक व स्वाती केरकर यांचीही भाषणे झाली. प्रतिनिधीने काही विक्रेत्यांकडे वार्तालाप केला असता नगरपालिकेबद्दलचा त्यांनी राग कडव्या शब्दात व्यक्त केला. सोपो करवाढ होणे म्हणजे मालाचा दर वाढणे, परिणामी स्वस्त वस्तू महाग दरात ग्राहकांना विकावे लागणे. त्यामुळे सोपोकर वाढीची झळ विक्रेत्यांबरोबर सामान्य ग्राहकांलाही बसते, असे एका विक्रेत्याने सांगितले.
‘सोपो’ कंत्राटाची चौकशी करा : मामलेदार
फोंड्याच्या सोपो कर वादात आपण व्यापार्यांच्या बाजूने असल्याचे फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनी सांगितले. या कंत्राटाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. पूर्वी ६५ लाख रु. चे कंत्राट होते, तेव्हा ५ रु. प्रति चौ. मी. सोपो कर होता आता कंत्राट ४६ लाख रु. ना दिले गेले लव सोपो कर १० रु. प्रति चौ. मी. करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.