पोंबुर्फा येथील टपाल कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत आहे व कोणत्याही क्षणी कोसळू शकते. सदर इमारत पोंबुर्फा कोमुनिदादीच्या मालकीची आहे. गेली कित्येक वर्षे कोमुनिदादची कार्यकारिणी समिती कार्यरत नसल्यामुळे इमारतीची हेळसांड झाली आहे. कार्यालयातील महत्वाचे जुने दस्तऐवज पावसात भिजून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इमारतीचे अर्धे छप्पर कोसळलेले आहे व राहिलेले छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहे.
टपाल खाते कार्यालयातील कर्मचारी वर्ग व नियमीत येणार्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करीत आहे अशा लोकांच्या भावना आहेत. मोठी दुर्घटना होण्याअगोदर, टपाल खात्याने सदर कार्यालय सुरक्षित ठिकाणी हलविण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.