राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी तीन स्टेडियम उभारणार

0
91

क्रीडामंत्री तवडकर : युवा धोरण चार महिन्यांत मार्गी
राज्यात एक नवे फुटबॉल स्टेडियम, एक हॉकी स्टेडियम व एक इनडोअर स्टेडियमसह अन्य साधनसुविधा राज्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर उभी होणार असल्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी काल क्रीडा खात्यावरील मागण्यांवर बोलताना सांगितले.
ज्या ज्या मतदारसंघात मैदानांची आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. सर्व क्रीडा क्लबस्‌ना प्रोत्साहन देण्यात येत असते. कोचिंगवर भर देण्यात येत आहे. १५४ प्रशिक्षक राज्यात असल्याचे ते म्हणाले. १ लाख २० हजार मुले गोव्याभरात क्रीडा स्पर्धांत सहभागी झाले. दिलीप सरदेसाई पुरस्कार देण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देण्यात न आलेला जिवबादादा केरकर पुरस्कार यापुढे देण्यात येणार आहे. क्रीडा गुणामुळे दहावीला ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीला ४०८ विद्यार्थी या गुणांमुळे उत्तीर्ण झाले, अशी माहिती त्यांनी दिली. युवा धोरण तीन-चार महिन्यांत मार्गी लागेल, असे तवडकर यांनी यावेळी सांगितले.
पदक खरेदीत घोटाळा नाही
लुसोफोनियासाठीची पदके खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा जो आरोप होतो आहे हे खोटे आहे. ही पदके सरकारी दुकानातून खरेदी करण्यात आली होती असा खुलासा तवडकर यांनी केला. टॅक्सी राज्याबाहेरून का आणल्या याचे उत्तर देताना आठ दिवस २४ तास या टॅक्सी हव्या होत्या. राज्यातून त्या तशा उपलब्ध होऊ न शकल्याने त्या बाहेरून आणल्याचे तवडकर म्हणाले. लुसोफोनियामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची साधनसुविधा राज्यात उभी राहिली. त्यामुळेच आता राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यासाठीची नवी समिती लवकरच स्थापन होईल. शिवाय राज्यात डुरांड कप व इंडियन सुपर लिग आयोजित करण्यासाठीचीही तयारी संबंधितांनी दाखवली आहे. या स्पर्धा फातोर्डे येथील स्टेडियमवर होणार आहेत.