– विश्वास मेहेंदळे
स्मिताचा आणि माझा परिचय १९७३ – ७४ पासूनचा. दूरदर्शनच्या एका पौराणिक नाटकात काम करण्यासाठी स्मिता दूरदर्शन केंद्रात आली होती. तेव्हा ती बारावीत शिकत होती. दूरदर्शनवर वृत्तनिवेदक होण्यासाठी पदवीधर ही पात्रता असणे आवश्यक होते आणि स्मिता तर बारावीत होती. परंतु स्मिताचे व्यक्तिमत्त्व, शब्दोच्चार या बाबी लक्षात घेऊन मी तत्कालीन संचालक पी. व्ही. कृष्णमूर्ती यांच्याकडून वृत्तनिवेदकासाठीची पदवीधर असण्याची अट स्मिताबाबत शिथिल करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश येऊन स्मिताला दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून संधी मिळाली, परंतु केवळ वृत्तनिवेदिका एवढेच करिअरचे क्षेत्र मर्यादित न ठेवता एक गुणवान अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि नाटक तसेच चित्रपट निर्माती हा लौकीक स्मिताने प्राप्त केला. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मराठी चित्रपट महामंडळाची पदाधिकारी म्हणून निवडणूक लढवून, निवडून येऊन उत्तम कामगिरी बजावली.
काही वर्षांपूर्वी स्मिता पाटीलसारखी गुणवान अभिनेत्री आपल्यातून निघून गेली आणि आता स्मिता तळवलकर या आणखी एका गुणवान अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला. या दोघींनीही वृत्त निवेदिका म्हणून काम केले होते आणि त्यांचा या पदाच्या निवडीत कोठे तरी सहभाग देता आला हे भाग्यच म्हणावे लागेल. स्मिता पाटीलच्या निधनाने व्यक्तिश: मोठे दु:ख झाले होते आणि आज स्मिता तळवलकरच्या निधनाचे दु:ख सहन करता येण्याजोगे नाही.
त्या पिढीतील भक्ती बर्वे, चारूशिला पटवर्धन, स्मिता पाटील आणि आता स्मिता तळवलकर या चारही वृत्तनिवेदकांची दूरदर्शन प्रेक्षकांना कायम आठवण राहील. अतिशय लोकप्रिय असणार्या या वृत्तनिवेदिका आपल्या वयाच्या साठीत निघून जाव्यात हे दूरदर्शन माध्यमाचे मोठे दुर्भाग्य म्हणायला हवे. वृत्तनिवेदन करताना शब्दोच्चार, शब्दांची ङ्गेक तसेच आनंदाची किंवा दु:खाची बातमी यात वाचताना करावा लागणारा ङ्गरक या बाबींवर विशेष लक्ष द्यावे लागते. स्मिताने या बाबी उत्तमरित्या आत्मसात केल्या होत्या. त्याचा ङ्गायदा तिला नाट्यनिर्मिती आणि चित्रपट क्षेत्रातही झाला. अत्यंत हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अशी स्मिता तळवलकरची ओळख होती. कोणत्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही असा तिचा प्रयत्न असायचा. पतीच्या निधनानंतर ‘सुख दु:खे समे कृत्वा, लाभा लाभो जया जयौ’ इतक्या निरपेक्ष भावनेने ती जगाकडे पाहताना दिसे. खळाळते हास्य हा ही तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक गुणविशेष. दूरदर्शन वृत्तनिवेदिका म्हणून काम करताना क्वचित प्रसंगी उशिरा आल्यास कोणी बोलले तर तिने कधी उलट उत्तर दिले नाही.
वृत्तनिवेदिका म्हणूनच नव्हे तर नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमांमध्येही स्मिताने स्वतंत्र ठसा उमटवला. तिच्या ‘अस्मिता चित्र’ निर्मित एक-दोन मालिकांमध्ये काम करण्याची संधी लाभली. त्या दरम्यानचा एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे. त्या मालिकेचे चित्रीकरण पुण्याजवळील सिंहगड परिसरातील दादा कोंडकेंच्या स्टुडिओत सुरू होते. एक दिवस चित्रीकरण संपले आणि आम्ही बाहेर पडलो. त्या दिवशी स्मिताने गाडी आणली नव्हती. अशा परिस्थितीत मी आणि उषा बॅनर्जी (साठे) ही सहकलाकार पुण्याला कसे पोहोचणार हा विचार स्मिताच्या मनात आला. अर्थात, आम्हा दोघांनाही हा प्रश्न पडलाच होता. परंतु स्मिताने सांगितले, ‘चला, काही तरी मार्ग निघेल’. वाटेत एका हॉटेलमध्ये तिने आमच्या आहाराची व्यवस्था केली. त्यानंतर मुख्य रस्त्यावर येऊन येणार्या रिक्षावाल्यांना आम्हाला पुण्यापर्यंत सोडवण्याची विनंती करू लागली. रिक्षावाले स्मिताला दूरदर्शन वृत्तनिवेदिका, अभिनेत्री तसेच निर्माती म्हणून ओळखत होते. त्यातील एका रिक्षावाल्याने आम्हाला पुण्यात आणून सोडले. पुण्यात पोहोचल्यावर स्मिताने दिलेले पैसे घेण्यास त्या रिक्षावाल्याने नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, ‘तुम्ही अभिनयाने आमच्या आयुष्यात एवढा आनंद निर्माण केला आहे की त्याचे मोल करता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला इथपर्यंत घेऊन येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच. त्यामुळे या प्रवासाचे पैसे घेण्याचा आग्रह करू नका’. त्याचे हे उद्गार स्मिताच्या जनमानसातील लोकप्रियतेचे प्रत्यंतरच होते.
स्मिता कधी कोणाशी भांडताना, वाद घालताना दिसली नाही. एखादी गोष्ट पटली नाही तर ‘जाऊ द्या हो’ असे म्हणून तो विषय तिथेच सोडून द्यायची. ती इतरांशी नेहमी मोकळेपणाने बोलत असे. सध्या ‘सेलिब्रिटी’ हा शब्द बराच प्रचलित झाला आहे. स्मिता तळवलकर ही त्या काळातील सेलिब्रिटीच होती.परंतु तिला आपण या क्षेत्रातील कोणी मोठे आहोत असा गर्व नव्हता. कोणी परिचिताने भेळ खायला बोलावले, जेवायला बोलावले तर वेळ असल्यास ती जात असे. स्मिताला लोकांमध्ये मिसळायला आवडत असे. गाडी चालवताना ट्रॅङ्गिकमध्ये अनेकजण तिला ओळखायचे. अशा वेळी हसून प्रतिसाद देणे, शक्य असल्यास काही बोलणे असा तिचा प्रयत्न असायचा. या गुणांमुळेच अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून मोठे यश मिळवूनही स्मिता सामान्य माणसासारखे आयुष्य जगू शकली. अत्यंत हसतमुख स्मिता गेली तीन-चार वर्षं कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत होती. या काळात ती कधी तरी चित्रपटगृहात, नाट्यगृहात आणि दूरदर्शन केंद्रातही भेटायची. परंतु त्या त्या वेळी आपले दु:ख, केमोथेरपीच्या यातना बाजूला ठेवून आस्थेने चौकशी करायची. तिच्या त्या भेटीने मन उल्हसित व्हायचे. जगण्यावरील विश्वास वृध्दींगत व्हायचा आणि ती जगण्याची एक वेगळी उमेद देऊन जायची.दूरदर्शनमधील सुहासिनी मुळगावकर, भक्ती बर्वे, चारूशिला पटवर्धन, स्मिता पाटील यांच्यानंतर स्मिता तळवलकरचे जाणे मन विषण्ण करणारे आहे. आपण अशा प्रकारे दु:खी आहोत हे तिने पाहिले असते तर खळखळून हसली असती आणि म्हणाली असती, ‘जाऊ द्या हो’… अशी ही वेगळं रसायन असलेली स्मिता आज आपल्यातून निघून गेली. यादगार कलाकार आणि दिलखुलास व्यक्ती म्हणून ती नेहमीच आपल्या स्मरणात राहील.