(योगसाधना – २४४)
(स्वाध्याय – १२)
– डॉ. सीताकांत घाणेकर
योगशास्त्राचा प्रचार व प्रसार जगभर झाला आहे आणि होतो आहे. व्हायलाच हवा. कारण हे एक असे शास्त्र आहे की मानवाच्या सर्वांगीण जीवनविकासाकरिता अत्यंत सोपे व उपयुक्त असे शास्त्र आहे. सर्वांगीण विकासाचे विविध पैलू म्हणजे – शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक… विश्वात सर्व तर्हेच्या समस्यांना असा विकास अत्यंत आवश्यक आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे योगाभ्यास भारताच्या बाहेरील देशात- पौव्रात्य व पाश्चिमात्य- झपाट्याने होत आहे. भारतात मात्र अपेक्षित उत्साह दिसत नाही. ही गोष्ट अत्यंत खेददायक आहे. यापुढे जाऊन बघितले तर आणखी एक दुःखदायक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे हा योगाभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हायला हवा, पण तो तसा होत नाही. त्यामुळेच सर्व बाबतीत प्रगती दिसत नाही. बहुतेक करून योगमार्गाच्या काही विशिष्ट पैलूंचाच प्रचार केला जातो. उदा. आसन, काही क्रिया, प्राणायाम इ. अनेकांना इतर योगमार्ग व त्यांच्या विविध पैलूंची माहिती देखील नसते. म्हणून काही मर्यादितच फायदे दृष्टिक्षेपात येतात.
बहुधा, शारीरिक पैलूंवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे शारीरिक कवायत केली जाते आणि त्याला नाव दिले जाते योगा. अमेरिकेमध्ये तर योगाचा नवा अवतार जन्माला आलेला आहे – ‘‘पॉवर योगा’’. उद्या हा देश योगाचा पेटंटसुद्धा करेल!
भारतातही अनेक शहरात ‘‘योग व्यायामशाळा’’ आहेत. खरे म्हणजे आपणच एका अत्युच्च पायरीवर असलेल्या या शास्त्राला खालच्या पायरीवर आणलेले आहे.
आपल्या ज्ञानी ऋषींनी योगाभ्यास म्हणजे योगसाधना करायला सांगितली होती. त्यांना तो सूक्ष्म अर्थ अभिप्रेत होता. या योगतज्ज्ञांमध्ये महर्षी पतंजलीपासून हल्लीचे योगपुरुष विवेकानंद… सगळेच आहेत. सर्वजण सांगतात की योगाचे चारही मार्ग आवश्यक आहेत आणि अष्टांगयोगातील यम-नियमांचा अभ्यास अत्यावश्यक आहे.
या नियमांतील चौथा नियम म्हणजे स्वाध्याय. हा स्वाध्याय – ‘स्व’चा अध्याय प्रत्येकाने करायलाच हवा. याचेही विविध पैलू आहेत. सुरुवातीच्या अभ्यासानंतर योगसाधकाला ज्ञान होते की ‘स्व’ म्हणजे ‘मी’ एक ‘आत्मा’ आहे आणि तो परमात्म्याचा एक अंश आहे. पण योगाभ्यास न करणार्यांना अभिप्रेत असलेले म्हणजे ‘मी’ म्हणजे ‘शरीर’ आहे. त्यामुळे शरीराबद्दल वेगवेगळी माहिती लक्षात येते- माझे नाव, वडलांचे नाव, आडनाव, राष्ट्रियत्व, धर्म, पेशा, समाजातील स्थान, आर्थिक स्थिती… वगैरे. यात काही गैर नाही. पण गरज आहे ती म्हणजे त्या सर्व संदर्भांचा सूक्ष्म विचार व चिंतन करण्याची.
इथे मुख्य विचार म्हणजे मला जे हे सर्व प्राप्त झाले किंवा झाले नाही- तर असे कां? याचा स्वाध्याय करता करता लक्षात येते ते म्हणजे माझे अनेक जन्मांचे कर्म आणि इथेच कर्म मार्ग व ज्ञान मार्ग यांचा अभ्यास सुरू होतो. या अभ्यासानंतर समजते की विश्वाची रचना पूर्वनियोजित आहे. त्याचाही कुणीतरी रचयिता आहे. मग त्याला सृष्टिकर्ता म्हणा किंवा भगवंत वा देव म्हणा. त्याचे काही नियम आहेत- निसर्गनियम. त्याप्रमाणेच चालणे अत्यंत आवश्यक आहे. अपेक्षित कर्म केले की त्याचे फळ चांगले मिळतेच. विपरित केले की दुःख भोगावे लागते. जसे म्हणतात ना – ‘पेराल तसे उगवेल’.
चिंतन केल्यानंतर विचार येतो की हे सर्व कर्म नोंद करून ठेवतो कोण? तो आहे तरी कुठे? आपल्याला तर कोणीच दिसत नाही. म्हणूनच अनेक दुष्कर्मे रात्रीच्या काळोखात किंवा निर्जन ठिकाणी केली जातात जसे चोर्या, दरोडे, लाचखोरी, खून, बलात्कार… यांची उत्तरे मिळण्यासाठीच अभ्यास आवश्यक आहे.
आपण म्हणतो जगात अनेक धर्म आहेत. खरे म्हणजे जगात एकच धर्म आहे- मानवता! जे आहेत ते त्यापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसे हिंदू धर्म, ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, पारसी, बौद्ध, जैन, शिख इ. प्रत्येक धर्मानुसार कर्माची नोंद कोण ठेवतो हे वेगवेगळ्या तर्हेने सांगतात.
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे ही नोंद ‘चित्रगुप्त’ ठेवतो. पू. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात- ‘हा चित्रगुप्त प्रत्येक व्यक्तीचे ‘‘गुप्त चरित्र’’ लिहितो. हे गुप्त चरित्र म्हणजे कॉन्फिडेनशियल रिपोर्ट.. सी.आर… जसा प्रत्येक विभागात ठेवला जातो तसा. पण हा रिपोर्ट मोठा ऑफिसर आपल्या वातानुकूलीत केबिनमध्ये बसून लिहितो. हा रिपोर्ट बदललाही जातो. उदा. आपला आपला मित्र, नातेवाईक पैसे घेऊन… वगैरे किंवा काही वेळा मंत्रीमहोदयांच्या सांगण्यावरूनही विशिष्ट बदल होऊ शकतो. या रिपोर्टवरून त्या ऑफिसरची पगारवाढ, प्रमोशन अवलंबून असतं.
इथे चित्रगुप्त – गुप्त चरित्र मानवाच्या हृदयात बसून रेकॉर्ड करतात आणि त्यात कुणीही, केव्हाही फेरफार करू शकत नाही. हेच गुप्त चरित्र प्रत्येक व्यक्तीचे संचित व त्याप्रमाणे प्रारब्ध ठरवत असते. तत्त्ववेत्ते सांगतात की स्वतः भगवंतदेखील यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत.
इसाई धर्माप्रमाणे हा रिपोर्ट- गार्डीयन एंजल लिहितो. तो हृदयात स्थित आहे. इस्लाम धर्माप्रमाणे दोन फरीश्ते – अंकिर व मुनकिर- रिपोर्ट लिहितात. उजव्या खांद्यावर बसून अंकिर शुभकर्म लिहितो व डाव्या खांद्यावर बसून मुनकिर दुष्कर्म लिहितो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वर्गात किंवा नरकात, जन्नत किंवा जहन्नुममध्ये आत्मा निघून जातो.
या सर्व गोष्टी सामान्य मानवाच्या आकलनापलीकडच्या आहेत. सामान्य ज्ञानाने हे सर्व कुणालाही समजणारे नाही. यासाठी जरुरीचे आहे – आणखी अभ्यास, संपूर्ण ज्ञान!
अशा या ज्ञानाचा सारांश एवढाच की आपली प्रत्येक कृती कुणीतरी अदृश्य शक्ती नियमित क्षणोक्षणी टिपतच असते. त्यामुळे आवश्यक आहे- सत्कर्म! तथाकथित सुशिक्षितसुद्धा रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना, त्यांना अनेक कायदे माहीत असूनही तोडतात- उदा. सीट-बेल्ट लावणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, पार्किंग, सिग्नल बघून वाहन चालविणे, झेब्रा क्रॉसिंगबद्दलचे नियम… पण तिथे एखादा शिपाई असला तरच आम्ही कायदा पाळतो व सज्जन असल्याचा आव आणतो.
अनेक देशांत कायदापालन होते त्याचे मुख्य कारण म्हणजे सगळीकडे असणारे कॅमेरे, कडक शिक्षा व समाजाबद्दल कर्तव्याची जाण.
खरेच ज्यावेळी आम्हा सर्वांना जाणीव होईल की आपले कर्म हर क्षणी टिपले जाते व त्याप्रमाणे माझे उर्वरित किंवा मृत्युनंतरचे जीवन ठरते. त्यावेळी प्रत्येक व्यक्ती सज्जनच बनेल. निदान योगसाधकांनी तरी ही जाणीव करून घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे. याचसाठी नियमित ऋषींना अभिप्रेत शास्त्रशुद्ध स्वाध्याय आवश्यक आहे.